हजारो लेकरं पुन्हा अनाथ!

‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. सिंधुताईंचा आजवरचा प्रवास अतिशय खडतर होता. जन्मापासूनच सिंधुताईंना मोठा संघर्ष करावा लागला. नवर्‍यानं घराबाहेर काढल्यानंतर सिंधुताईंनी गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म दिला. तिची दगडाने तोडलेली नाळ आणि मुलीचा टाहो त्या अखेरपर्यंत विसरल्या नाहीत. लहान बाळ हाती घेऊन त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या जीवनावर आधारीत ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्यांना आदरानं माई असे म्हटलं जाई. माईंच्या जीवनाची सुरुवात ‘नकुशी’ने झाल्यानंतर त्यांनी एका अग्नीदिव्याप्रमाणे संघर्ष केला. केवळ स्वत:चंच नव्हे तर हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं. अशा या ‘अनाथांच्या माय’ असलेल्या सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास संपला असला तरी त्यांच्या कार्याचा ठसा मात्र कायम राहणार आहे. 



एका अग्नीदिव्याप्रमाणे संघर्ष

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव येथे झाला होता. त्यांच्या आईवडिलांना मुलगी नको होती, म्हणून त्यांनी त्यांचं नाव चिंधी असं ठेवलं होतं. त्यांचे वडील गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि माई शाळेत जाऊन बसायच्या. मूळच्या बुद्धिमान असल्या तरी माईंना जेमतेम चौथीपर्यंत शिकता आलं. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न वयाने २६ वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. त्यांचा संघर्ष लग्नानंतरही कायम राहीला. घरी प्रचंड सासुरवास होता. नवर्‍यानं घेतलेल्या संशयानंतर त्यांना गावानंही वाळीत टाकलं. सासरमधून मारून बाहेर काढल्यानंतर माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही. मग माईंवर भीक मागायची वेळ आली. जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा जवळ रेल्वे लाईनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला पण नंतर त्या मागे फिरल्या. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. या संघर्षाच्या काळात त्या जळगावला देखील काही दिवस वास्तव्याला होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी जळगावमधील पंचमुखी हनुमान मंदीराबाहेर भीक मागून पोट भरल्याची आठवण त्यांनीच एकवेळा सांगितली होती. आयुष्यातल्याच संघर्षानं सिंधुताई या समाजसेवेकडे वळल्या. अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांनी १९९४ मध्ये पुरंदर तालुक्यात कुंभारवळण गावात ममता बाल सदन या संस्थेची स्थापना केली. या ठिकाणी सिंधुताईंनी अनाथ मुलांना आसरा दिला. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. अनेकांना त्यांनी आपल्या पायावर उभं करून आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर योग्य जोडीदार सोधून त्यांनी मुलांची लग्नही लावून दिली.

...तिच माईंना खरी श्रध्दांजली ठरेल

सिंधूताई यांनी बाल निकेतन हडपसर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह, अभिमान बाल भवन. गोपिका गाईरक्षण केंद्र. ममता बाल सदन, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन न शिक्षण संस्था अशा अनेक संस्था सुरू केल्या. माईंनी आपल्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी मिळावी या हेतूने ’मदर ग्लोबल फाउंडेशन’ची स्थापना केली. आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथांचा सांभाळ करणार्‍या माई प्रत्येकाला आपल्याशा वाटत. त्यांना भेटणार्‍या प्रत्येकाची त्या आपुलकीनं विचारपूस करत. त्यांच्या या स्वभावागुणानं हजारो नाती त्यांनी कायम जोडून ठेवली. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याआधी २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. २०२१मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या की,  माझी प्रेरणा, माझी भूक ही पोटाची, भाकरीची. मी भाकरीला धन्यवाद देतो कारण भाकरीच मिळत नव्हती. माझ्या लेकरांना भाकरी मिळावी म्हणून रानोरान फिरले. लोकांनी मला सहकार्य केलं. त्यावेळी देणार्‍यांचे, त्या काळात ज्यांनी माझी झोळी भरली त्यांचे आणि मला जगण्याचं बळ दिलं त्या माझ्या लेकरांचा या पुरस्कारावर अधिकार आहे, उरलासुरला माझा, अशीही भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली होती. अनाथ मुलांनी शिक्षण पूर्ण करावं, स्वतःच्या पायावर उभं रहावं, इथल्या मुलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं, हेच माईंचे स्वप्न राहिलं. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांचं लग्नकार्यही विधीवत पार पाडण्याचं काम माईंनी अखेरच्या श्‍वासापर्यंत केलं. माईंच्या निधनाने पुन्हा एकदा हजारो लेकरं अनाथ झाली आहे. मात्र माई जे कार्य सोडून गेल्या आहेत ते आपण सर्वांनी पूर्ण केले तर तिच माईंना खरी श्रध्दांजली ठरेल...!

Post a Comment

Designed By Blogger