अमेरिकी फेडरल रिझर्व्ह, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदरवाढीचे देण्यात आलेले संकेत आणि त्याच वेळी वाढत्या खनिज तेलाच्या किमती आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे पुरवठ्यातील अडचणी या घटनांचे जगभरातील सर्वच बाजारात प्रतिकूल पडसाद उमटले आहेत. भारतीय शेअर बाजारात मागील पाच दिवसांपासून घसरण दिसत आहे. सोमवार तर भारतीय गुंतवणुकदारांसाठी ब्लॅक मंडेच ठरला. कारण सेन्सेक्स तब्बल १५४५ अंकांनी गडगडला तर निफ्टीही ४६८ अंकांनी कोसळला. परिणामी एका दिवासात गुंतवणुकदारांचे तब्बल ५.३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शेअर बाजारातील मोठ्या पडझडीने गुंतवणूकदार होरपळून निघाले आहेत. जगभरातील प्रतिकूल बाजार घडामोडींचे अनुकरण करीत झालेल्या धूळदाणीत गेल्या चार सत्रांत मिळून गुंतवणूकदारांनी १०.३६ लाख कोटी रुपयांची मत्ता मातीमोल झाली आहे. नव्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास अवघा एक आठवडा उरलेला असताना शेअर बाजारात ही घसरण होताना दिसत आहे. पुढील आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
तब्बल १५ लाख कोटी रुपयांचे बुडाले
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात संपूर्ण जग भरडले जात आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. औद्योगिक क्षेत्र तर पार कोलमडून पडले आहे. परिणामी सर्वंच देशांची अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात आहे. जगभरात मंदींचे वादळ घोंगावत आहे. साधारणत: अशी परिस्थिती आली तर त्याचे विपरित परिणाम शेअर बाजारावर होतात. २००८ साली एकट्या लेहमन ब्रदर्समुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. मात्र यंदा शेअर बाजाराने सर्व तज्ञ व विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत आपली घोडदौड सुरुच ठेवली होती. शेअर बाजाराने गाठलेला हा उच्चांक म्हणजे एक कृत्रिम फुगवटा असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. विश्लेषकांची ही भीती खरी तर नाही ना? यावर पुन्हा एकदा चर्चा सरु झाली आहे. कारण गत आठवडाभरातपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होतांना दिसत आहे. गतसप्ताहामध्येही पुन्हा परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. सप्ताहामध्ये त्यांनी १२,६४३.६१ कोटी रुपयांचे समभाग विकले. त्याचवेळी देशांतर्गत वित्तसंस्थांनी मात्र ५०८.०४ कोटी रुपयांची भाग खरेदी केली. जानेवारी महिन्याचा विचार करता परकीय वित्तसंस्थांनी १५,५६३.७२ कोटी रुपये काढून घेतले, तर देशांतर्गत संस्थांनी ७४३०.३५ कोटी रुपये गुंतविले आहेत. सलग पाच व्यापार सत्रात बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली असून गुंतवणुकदारांना मोठा झटका बसला आहे. गुंतवणुकदारांचे तब्बल १५ लाख कोटी रुपयांचे बुडाले आहेत. एकट्या सोमवारीच गुंतवणुकदारांचे ५.३० लाख कोटी बुडाले आहेत. शुक्रवारी बीएसई लिस्टेड कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप २,६९,६५,८०१.५४ कोटी रुपये इतका होता. तो आज ५,३१,५७६.०५ कोटी रुपयांची घट होऊन २,६४,३४,२२५.४९ कोटी रुपये झाला आहे. आयटी, मेटल, ऑटो, फार्मा आणि रिआलिटीसह सर्वच सेक्टरवर बाजाराचा दबाव असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. सर्वात मोठी घसरण आयटी, मेटल, रिआलिटी आणि ऑटो इंडेक्समध्ये पाहायला मिळत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात सुरू असलेला समभाग विक्रीचा मारा आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेल्या रुपयामुळे देशांतर्गत भांडवली बाजारातील घसरण वाढली. परिणामी सप्ताहाअखेर सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये दबावाखाली व्यवहार सुरू होते.
भांडवली बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता
जागतिक पातळीवर वाढती महागाई आणि कंपन्यांची कमजोर तिमाही आर्थिक कामगिरीमुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त असून समभाग विक्रीला प्राधान्य देत आहेत. जागतिक पातळीवरील विविध प्रतिकूल घटनांसोबतच आगामी अर्थसंकल्पामुळे भांडवली बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेत बॉण्डवर मिळत असलेल्या जादा परताव्यामुळे परकीय वित्त संस्थांकडून झालेली मोठी विक्री, वाढलेल्या खनिज तेलाच्या किमती, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली अस्थिरता यामुळे भारतीय बाजार खाली आला आहे. परिणामी गेले चार सप्ताह सातत्याने वाढत असलेल्या निर्देशांकाला ब्रेक लागला. अर्थसंकल्प जवळ आल्यामुळे बाजार खाली येण्याची शक्यता आता अधिकच आहे. सध्या महागाई हळूहळू डोके वर काढत आहे, त्याचे एक महत्त्वाचे कारण मध्यपूर्वेतील तेलाचे उत्पादन करणार्या कंपन्यांत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीवर ड्रोन हल्ले झाले. त्यामुळे जगावर एक नवीन संकट उभे राहिले आहे. भारताची गरज ७० टक्के पेट्रोल व डिझेल आयात करून भागवावी लागते. भारतातील माल वाहतूक आता मोठ्या प्रमाणावर महामार्गावरून होते. कच्च्या तेलाचे दर (क्रूड) सध्या ८७ डॉलर प्रती बॅरल झाले आहेत. गेल्या ७ वर्षांतील हा उच्चांकी दर आहे. दुसरीकडे सध्याच्या बिकट परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी; तसेच अर्थचक्राला गती देण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर कमी ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांच्या मिळकतीनुसार शेअर बाजाराचा परतावा हा बँकेतील अल्प व्याजदरांपेक्षा चढा दिसत असल्याने, पूर्वीपेक्षा महाग झालेल्या शेअर बाजारानेदेखील आणखी वाढ दर्शविली. शेअर बाजाराचा ‘अर्निंग यिल्ड’ हा बँकेतील अल्प व्याजदरांपेक्षा चढा असल्याने शेअर बाजारात पैशाचा ओघ आला. मात्र, आगामी काळात महागाई दरात प्रमाणबाह्य वाढ होऊ लागल्यास; तसेच मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचे धोरण स्वीकारल्यास शेअर बाजारात केवळ व्याजदर कमी असल्याने होणार्या वाढीवर मर्यादा येतील. अशा वेळेस शेअर बाजार गडगडल्यास, केवळ भावनांच्या जोरावर झोके घेणार्या शेअरच्या भावातील चढ-उतार पाहून कोणत्याही कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी दीर्घावधीमध्ये मिळकतीमध्ये उत्तम वाढ दर्शवू शकणार्या कंपन्यांच्या शेअरचा विचार करणे योग्य ठरू शकेल.
Post a Comment