सोशल दहशतवादावर ‘स्ट्राईक’

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे भारताला आतापर्यंत मोठी किंमत चुकवावी लागली आहे. पाकिस्तान भारतात दहशतवाद आणि अविश्‍वास पसरवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय लष्कराने हजारो पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आता पाकिस्तान इंटरनेटद्वारे भारतात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मोदी सरकारने या सोशल दहशतवादावर ‘स्ट्राईक’ करत पाकिस्तानला दणका दिला आहे. भारताविरोधात प्रसार केल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानातून चालविल्या जाणार्‍या ३५ यू ट्यूब वाहिन्यांसह दोन इन्स्टाग्राम खाती, दोन ट्विटर खाती, दोन फेसबुक खाती आणि दोन संकेतस्थळांवर बंदी घातली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या वाहिन्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या सुमारे एक कोटी २० लाख इतकी, तर त्यावरील व्हिडीओज्ची पाहिलेल्यांची संख्या १३० कोटींहून अधिक आहे. त्यांच्यावरून पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, सीडीएस अजित डोवाल, लष्करप्रमुख एमएम नरवणे, भारतीय सैन्यदले, जम्मू-काश्मीर, शेतकरी आंदोलन, अयोध्येतील राममंदीर, भारताचा परराष्ट् व्यवहार, जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू यांच्याबाबत खोडसाळ, खोटा प्रचार केला जात होता. त्याशिवाय फुटीरवादी विचारसरणीला खतपाणी घालून कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे काम केले जात होते.भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न

आज सोशल मीडिया अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा जीवनावश्यक सवयींचा भाग बनत चालला आहे. सोशल मीडियामुळे स्वत:चे मत व्यक्त करण्यास किंवा त्यासंबंधी चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळते खरी; पण त्याचबरोबर सामाजिक सलोखा बिघडवणे, हिंसक कृत्य करण्यास चुकीचे वर्तन करण्यास प्रवृत्त करणे असे प्रकार घडतात, तसेच वैयक्तिक स्वार्थ जपण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होताना दिसतो आहे. त्यामुळे ही समाजमाध्यमे फायद्यापेक्षा नुकसान करणारीच असल्याचा विचार प्रबळ होताना दिसतो आहे. खोट्या माहितीमुळे कधी दंगल होते तर काही वेळा एखाद्या समूहामध्ये भयाची भावना निर्माण होते. काही वेळा अनावधानाने दहशतवादाला खतपाणी घातले जाते. यामुळेच फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावरील फेक अकाउंट्स व फेक माहितीचा मुद्दा अधून मधून चर्चेत असतो. अनेकदा आपल्याही फोनवर अशा प्रकारची माहिती येत असते. फोटोशॉपचा उपयोग करुन बातमी, फोटो मॉर्फ केले जातात. ते खरे आहे असे भासवण्यासाठी हे केले जाते. कोणत्याही माहितीची शहानिशा न करता फेक माहिती तयार केली जाते. एखाद्याची बदनामी करण्यासाठी, प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा मलिन करण्यासाठी, दोन धर्मांमधील तेढ वाढवण्यासाठी, आपसातले शत्रुत्त्व वाढवण्यासाठी, दिशाभूल करण्याच्या उद्देशाने अशी ‘फेकाफेकी’ केली जाते. दोन वर्षापूर्वी फेसबुकच्या वार्षिक अहवालामध्ये २५ कोटी अकाऊंट हे फेक असल्याच समोर आले होते. पूर्वी एखाद्या देशात अजाराजकता माजविण्यासाठी बंदुकांचा वापर होत असे मात्र आता हत्यार म्हणून बंदुकांऐवजी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जावू लागला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून भारतविरोधी अजेंडा चालवणार्‍यांवर सरकार आता कठोर भूमिका घेत आहे. भारताने २ न्यूज वेबसाइट आणि ३५ युट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात ‘नया पाकिस्तान ग्रुप’ अशा नावाचे १५ यूट्यूब चॅनेल असून हे सर्व चॅनेल भारतावर केंद्रीत होते. हे यूट्यूब चॅनेल बातम्यांच्या नावाखाली भारताची प्रतिमा खराब करण्याचे आणि जगासमोर भारताबाबत खोटे पसरवण्याचे काम करत होते. या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेल्या व्हिडीओ आणि फोटोग्राफिक सामग्रीमध्ये पीएम मोदी इंपोज इमरजेंसी, अनुच्छेद ३७० पुन्हा आणणे, तालिबान लष्कर आणि भारताचे संबंध असे अनेक खोटे दावे केले आहेत. असे दावे करुन भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

२० युट्यूब चॅनेल्सपैकी १५ ची मालकी ‘नया पाकिस्तान’ गटाकडे

भारताने बंदी घातलेल्या २० युट्यूब चॅनेल्सपैकी १५ ची मालकी ‘नया पाकिस्तान’ गटाकडे आहे. बंदी घालण्यात आलेल्या इतर चॅनेल्समध्ये ‘द नेकेड ट्रूथ’, ‘४८ न्यूज’ आणि ‘जुनैद हलीम ऑफिशियल’सारख्या चॅनेल्सचा समावेश आहे. यासह पाकिस्तान-आधारित यूट्यूब चॅनेल ‘खबर विथ फॅक्ट’, ‘खबर तेज’, ‘ग्लोबल ट्रुथ’, ‘न्यू ग्लोबलफॅक्ट’ चॅनल, ‘इन्फॉर्मेशन हब’, ‘फ्लॅश हब’, ‘फैसल तरार स्पीच’, ‘अपनी दुनिया टीव्ही’, ‘हकीकत की दुनिया’, ‘शहजाद अब्बास’, ‘मेरा पाकिस्तान विथ साहब’ यांचा समावेश आहे. , ‘खबर विथ अहमद’, ‘एचआर टीव्ही’, ‘सबी काझमी’, ‘सच टीव्ही नेटवर्क’, ‘साकिब स्पीकर्स’, ‘सलमान हैदर ऑफिशियल’, ‘साजिदगोंडल स्पीच्स’, ‘मलीहा हाश्मी’, ‘उम्रादराज गोंडल’, ‘खोज टीव्ही’, ‘खोज टीव्ही- २.०’, ‘कव्हर पॉइंट’, ‘जुनेद फिल्म्स’, ‘नॅशनल स्टुडिओ’, ‘इन्फॉर्मेटिव्ह वर्ल्ड’ यांच्यावर भारतविरोधी आणि प्रक्षोभक आणि खोट्या बातम्या चालवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या चॅनेल्सवरील व्हिडीओमध्ये कलम ३७०, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तालिबान समर्थक काश्मीरमध्ये अशा विषयावरील व्हिडीओंचा समावेश होता, ज्यांना तीन मिलियन व्ह्यूज होते. या सर्व चॅनेल्सचे एकूण सबस्क्राइबर ३.५ मिलियनहून अधिक होते. भारतासंदर्भातील व्हिडीओंना एकूण ५०० मिलियनहून अधिक व्ह्यूज होते, असे तपासामध्ये समोर आले आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भातील खोटे व्हिडीओ या चॅनेल्सवर अपलोड करण्यात आल्याचेही तपासामध्ये उघड झाले. शेतकरी आंदोलनादरम्यान या व्हिडीओंना सुरक्षा यंत्रणांनी फ्लॅग केले होते. शिख्स फॉर जस्टीस नावाच्या गटावर भारताविरोधी मोहीम चालवल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली असून दिल्ली आणि पंजाबमधील आंदोलनामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न या मोहीमेच्या समर्थकांकडून करण्यात आला. तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुसरीकडे, द्वेषयुक्त भाषण, बनावट बातम्या, सार्वजनिक सुव्यवस्था आणि देशविरोधी कारवाया देखील या प्लॅटफॉर्मवर दिसतात. विविध ठिकाणी बसून सोशल मीडियावर मते व्यक्त करणार्‍यांवर नियंत्रण तरी कसे ठेवणार किंवा त्यांना शिस्त कशी लावणार, हा आज एक गंभीर प्रश्न बनला असतांना भारत सरकारने केलेली कारवाई स्वागतार्हच आहे.

Post a Comment

Designed By Blogger