राज्यातील नगरपंचायत निवडणूक : सरशी कुणाची?

ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण आणि कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या सावटाखाली पार पडलेल्या राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये सर्वाधिक ३८४ जागा भाजपने पटकावत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३४४ जागा जिंकून दुसरा क्रमांक प्राप्त केला. काँग्रेसला ३१६ जागा मिळाल्या असून राज्यात महाविकास आघाडीचे सारथ्य करत असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चौथ्या क्रमांकाच्या २८४ जागा मिळवता आल्या आहेत. भाजपने राज्यभरात सर्वाधिक जागा मिळवल्या मात्र एकूण जागांची गोळाबेरीज करता सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली. असे काहीसे राजकीय ढोल सर्वत्र बडवले जात आहेत. मुळात ही निवडणूक चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. यामुळे याचे तटस्थ मुल्यमापन करण्यासाठी विधानसभेप्रमाणे गोळाबेरीज करुन चालणार नाही. मात्र कुणी काहीही दावे-प्रतिदावे केले असले तरी सर्वाधिक फायद्यात राहिली ती ‘साहेबां’ची राष्ट्रवादी!



राष्ट्रवादीने आपली कामगिरी सुधारली, सेना चौथ्या क्रमांकावर

राज्यातील ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणार्‍या राज्यातील १०६ नगर पंचायतींमधील १ हजार ८०२ जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ आणि १८ जानेवारी २०२२ अशा दोन टप्प्यात मतदान झाले होते. यापैकी ९७ नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन १ हजार ६४९ जागांपैकी १ हजार ६३८ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्यामुळे गाजलेल्या या निवडणुकीवर कोरोनाचेही विघ्न होते परंतु राज्यभरात भरभरून मतदान झाले. निमशहरी महाराष्ट्राचा भाग असलेल्या या राजकीय मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर वर्चस्व मिळविले. मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या. काँग्रेसला तुलनेने फटका बसला आणि तो पक्ष तिसर्‍या क्रमांकावर तर मुख्यमंत्रिपद असलेली शिवसेना मात्र चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. भाजपने २२, काँग्रेस २१ तर शिवसेनेने १७ नगर पंचायतींवर झेंडा फडकविला आहे. सर्वाधिक ३८४ जागा भाजपने जिंकल्या. त्या खालोखाल राष्ट्रवादीने ३४४, शिवसेनेने २८४ तर काँग्रेसने ३१६ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस, या तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्रित लढली, तर भाजप जिंकूच शकणार नाही, असा सतत दावा केला जात असताना जिथे भाजपचा परंपरागत वरचष्मा आहे, अशा ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या एकत्र येण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला; पण असे अपवाद वगळता या तळाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष स्वबळावर लढले. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाला आपआपली ताकद आजमावून पहायची असल्याने या निवडणुकीत चांगलाच रंग भरला गेला. यात सर्वाधिक फायद्यात राष्ट्रवादीच राहिली असल्याने निकालांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. २०१४ ते १८ दरम्यान पार पडलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकांत राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. पहिला क्रमांक भाजपचा तर दुसरा मोठा पक्ष काँग्रेस होता. यावेळी मात्र राष्ट्रवादीने आपली कामगिरी सुधारली असून काँग्रेसला मागे खेचत दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिवसेना मागच्या वेळी चौथ्या क्रमांकावर होती. यंदाही सेना चौथ्याच क्रमांकावर असली तरी त्यांचे संख्याबळ गेल्यावेळापेक्षा कमी झाले आहे. 

बड्या नेत्यांनाही स्वत:च्या कामगिरीचे मुल्यमापन करावे लागणार

मुख्यमंत्री आमचाच... या अट्टहासाचा फायदा कमी आणि नुकसान जास्त, असेच काहीचे राजकीय गणित राहिले आहे. हे निकाल समोर आल्यानंतर शिवसेनेच्या एका गटात नाराजीचे पडघम वाजू लागले आहेत. कारण ही केवळ नगरपंचायतींची निवडणूक नव्हती तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीची रंगित तालीम देखील होती. आधीच शिवसेनेचे बुरुज एक एक करुन ढासळत आहेत. गत दीड वर्षांपासून घरात बसून असलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे कुणाचा फायदा व कुणाचे नुकसान होतेय? हा जरी वादाचा व स्वतंत्र्य संशोधनाचा विषय असला तरी यात राष्ट्रवादीच फायद्यात असल्याचे दिसून येते. आताही नगरपंचायत निवडणूक निकालानंतरही तेच अधोरेखित होतेय. या निवडणुकीनंतर राज्यातील काही बड्या नेत्यांनाही स्वत:च्या कामगिरीचे मुल्यमापन निकालानंतर करावे लागणार आहे. कारण सोयगाव नगरपंचायतीमध्ये प्रतिष्ठा पणाला लावूनही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपची सत्ता टिकवता आली नाही. तिथे अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आली. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वर्चस्वाला त्यांचे राजकीय हाडवैरी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटीलांनी धक्का दिला. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कळवणमध्ये, राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यात, आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना नंदुरबारमध्ये, राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कडेगावमध्ये मतदारांनी धक्का दिला. या नेत्यांच्या भाऊगर्दीत एका चेहर्‍याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा फडकवत दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात दमदार एन्ट्री केली. सर्वपक्षिय पॅनलसह पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला या नवख्या तरुणाचे चांगलीच धोबीपछाड दिल्याने रोहिचे अभिनंदन करायलाच हवे. आता निवडणूक मिरवणुकींचा गुलाल खाली बसला असल्याने निमशहरी भागातील समस्यांकडे नवनिर्वाचित नगरसेवक व त्यांच्या राजकीय आश्रयदात्यांनी लक्ष द्यायला हवे. ही गावे फक्त म्हणायलाच शहरे आहेत. भविष्याचा विचार करून या गावांमध्ये अंतर्गत रस्ते, चौकांचे सुशोभीकरण, सांडपाणी निचरा, कचर्‍याची विल्हेवाट, पाणीपुरवठा, आरोग्यसुविधा, अशा गरजांच्या पूर्ततेकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

Post a Comment

Designed By Blogger