टेलीप्रॉम्प्टरवरील अनावश्यक वाद का बौध्दिक दिवाळखोरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा समिटमध्ये सहभागी झाले होते. ही एक व्हर्च्युअल समिट होती, यात काही समस्या आल्याने त्यांना भाषण थांबवावे लागले. या समिटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडिओ क्‍लिपसंदर्भात, दावा केला जात आहे की, पंतप्रधानांना टेलीप्रॉम्प्टरमध्ये आलेल्या अडचणीमुळे आपले भाषण थांबवावे लागले. यावर राहुल गांधींनीही भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी हे शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या गुणांमुळे त्यांना उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रत्येक भाषणाची चर्चा होतेच त्यात नवीन अस काही राहीलेलं नाही! मात्र त्यांची काही भाषणे विशेषत: आंतराराष्ट्रीय पातळीवरील भाषणांच्या वेळी ते टेलीप्रॉम्प्टरचा वापर करतांना आढळतात. अर्थात ते चुकीचेही नाही. कारण आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर बोलला जाणारा प्रत्येक शब्द आणि शब्द महत्वाचा असतो. बोलण्याच्या ओघात काहीही बोलणे येथे चालत नाही यामुळे अनेक बडे राजकीय नेते टेलीप्रॉम्प्टरचा वापर करतात. मात्र पंतप्रधान मोदींच्या टेलीप्रॉम्प्टर वापराबाबत सोशल मीडियामध्ये उडलेला धुराळा म्हणजे मोदी व्देश आणि त्यातून निर्माण झालेली बौध्दिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल.



भाषणसाठी टेलीप्रॉम्पटरचा वापर नवा नाही 

टीव्हीवरील बातम्या देणारा निवेदक किंवा देणारी निवेदिका सर्व बातम्या पाठ कशी करते हा प्रश्न नेहमी अनेकांना पडतो. मात्र त्या बातम्या पाठ केलेल्या नसतात तर टेलीप्रॉम्प्टरच्या मदतीने जसेच्या तशा वाचून दाखविल्या जातात. टेलीप्रॉम्प्टर म्हणचे पुर्वी छोटासा टिव्ही स्वरूपाचा एक इलेट्रॉनिक डिव्हाईस असायचा त्यावर ठळक शब्दांमध्ये बातमी स्क्रोल (पुढे सरकत जाणे) होत असे. कालांतराने अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक बदल झाले व सुरुवातील वृत्त निवेदकांसमोरील भला मोठा टेलीप्रॉम्प्टर लहान आकारात राजकिय नेत्यांच्या भाषणावेळी पोडीयमवर आला. यावेळी टेलीप्रॉम्प्टरचे स्वरुप पुर्णपणे बदलेले आहे. आता टेलीप्रॉम्प्टर म्हणजे एक पारदर्शक आरसा स्वरुपातील एलसीडी मॉनिटर आहे. जो ४५ अंशांवर ठेवलेला असतो. त्यावर लिखीत भाषणाचे शब्द ५६ ते ७२ फॉन्टसाईजमध्ये भाषणकर्त्याला दिसतात. भाषणावेळी एक ऑपरेटर टेलीप्रॉम्प्टरला नियंत्रित करतो म्हणजे भाषणकर्त्याचा बोलण्याचा वेग, पॉज आदींवर नियंत्रण ठेवतो. पारदर्शी असणारे हे टेलीप्रॉम्प्टर पोडीयमच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरावर ठेवलेले असतात. यामुळे भाषणकर्ता त्यातून वाचून दाखवत असेल तरी समोरच्यांचा वाटते की वक्ता त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्स्फुर्त भाषण करित आहे. यामुळे वक्त्याचे चांगले इंप्रेशन पडते व भाषणातील एकही मुद्दा सुटत किंवा चुकत नाही. टेलीप्रॉम्पटरचा वापर टेक्स्ट वाचण्यासाठी कॅमेर्‍यासमोर केला जातो. यामुळे समोर बसलेल्या लोकांना, आपण कशापद्धतीने बोलत आहोत, याची भनकही लागत नाही आणि आपण न थांबता आपले बोलणे पूर्ण करू शकतात. राजकीय नेते ज्या पद्धतीच्या टेली प्रॉम्प्टरचा वापर करतात, ते पारदर्शक काचेसारखे असते. हे प्रेक्षकांना सामान्य काचेसारखे वाटते, परंतु स्टेजवर असलेल्या व्यक्तीला सर्वकाही स्पष्टपणे दिसते. या टेलिप्रॉम्प्टरचे नियंत्रण स्क्रीन पाहणार्‍या व्यक्तीकडे असते, यामुळे मजकुराचा वेग सहजपणे वाढवता अथवा कमी करता येतो. नरेंद्र मोदी हे टेक्नोसॅव्ही पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. भाषण करतांना ते टेलीप्रॉम्प्टरचा वापर मोठ्या खुबीने करतात.  त्यांच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या कार्यकाळा दरम्यान त्यांचा अमेरिका दौरा टेलीप्रॉम्प्टरमुळे चर्चेत आला होता. कारण त्यावेळी त्यांनी अस्ललिखित इंग्रजीत भाषण ठोकले होते. ते नेहमी हिंदीत भाषण करण्यास प्राधान्य देतात मात्र त्यांनी अमेरिका दौर्‍यात इंग्रजीत भाषण केल्याने त्यावर मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी टेलीप्रॉम्प्टरचा वापर केला होता. यामुळे हे केवळ वाचून भाषण करतात, अशी टीका राजकीय विरोधकांकडून करण्यात आली. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून टेलीप्रॉम्प्टरचा वापर

आताही पुन्हा एकदा नरेंद्र मोदी, टेलीप्रॉम्प्टर आणि वाद एकत्र आले आहे. यावेळी निमित्त ठरले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा व्हर्च्युअल समिटचे! पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते आणि अचानक टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीसे गडबडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग बोलता बोलता अचानक थांबले. काय बोलायचं ते त्यांना सुचेना त्यामुळे ते स्क्रिनच्या उजवीकडेही पाहू लागले. गडबड उडालेल्या मोदींनी कानात हेडफोन लावून आपलं भाषण ऐकू येतं आहे का हे विचारून वेळ सावरून नेण्याचा प्रयत्न केला. हेच सगळं असलेला साधारण मिनिटभराचा व्हीडिओ ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नाही अशी टीका सोशल मीडियावर होऊ लागली आहे. मात्र मोदी देशातील कोणत्या राजकीय व्यासपीठावरुन भाषण करत नव्हते तर ते एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर होते, हे देखील लक्षात घ्यायला हवे. मुळात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मोठे नेते टेलीप्राम्प्टरचा वापर करतात. हे तंत्र अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी वापरले. परंतु बराक ओबामा यांनी ज्या पद्धतीने ते वापरले, इतके त्यापूर्वी कोणीही वापरले नसेल. २००९ मध्ये, न्यूयॉर्क टाइम्समध्ये ‘द (व्हेरी) स्क्रिप्टेड प्रेसिडेंट’ या मथळ्यासह एक लेख प्रकाशित झाला. या लेखात ओबामांनी टेलिप्रॉम्प्टरचा कसा वापर केला याबाबत तपशीलवार चर्चा केली आहे. त्यावर काहींचे म्हणणे होते की ओबामा लोकांपर्यंत आपला मुद्दा पोहचवण्यासाठी टेलिप्रॉम्प्टरचा योग्य वापर करीत आहेत. काहींचा यास विरोध होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन देखील टेलीप्रॉम्प्टरचा नेहमी वापर करतात. यासह अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्‍लिंटन, हिलरी क्‍लिंटन, जापानचे माजी पंतप्रधान पंतप्रधान शिंजो अबे यांच्या सारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेतेही टेलीप्रॉम्प्टरचा वापर करत असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात देशात झालेले १० मोठे बदल सांगितले आणि आता कठीण काळ संपल्याचे सांगितले. तसेच, भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, असे सांगत त्यांनी गुंतवणुकदारांना आवाहनही केले. इतक्या  महत्वाच्या बाबींवर पंतप्रधानांवर भाष्य केलेले असतांना केवळ टेलीप्राम्प्टरमुळे ते अळखडले यावर देशभरात चर्चा होत असेल तर त्याला बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षणच म्हणावे लागेल.

Post a Comment

Designed By Blogger