भाजपातून घाऊक आऊटगोईंग

उत्तर प्रदेश विधनसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखेची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. गत चार दिवसात तीन मंत्र्यांसह भाजपच्या १४ आमदारांनी पक्ष सोडला आहे. निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे उदंड पीक येणे हे आता आपल्यासाठी नवे राहिलेले नाही. पक्षात अन्याय झाला, आमच्या समाजावर अन्याय झाला, नीतीमूल्यांशी तडजोड, असे मोठं मोठे शब्द वापरले जात असले तरी राजकारण्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नसते. भाजपाने अशाच प्रकारे अन्य पक्षातील नेते फोडून आतापर्यंत अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. आयाराम गयाराम नेत्यांना स्वत:चे स्वार्थ साधायचे असल्याने ते इकडून तिकडे उड्या मारतात. आताही उत्तर प्रदेशात तेच घडत आहे. भाजपच्या छावणीतील काही प्रमुख शिलेदार बाहेर पडण्याचे मुख्य कारण योगी आदित्यनाथ यांची कार्यशैली किंवा भाजपावरील मतदारांची नाराजी ही कारणे सांगितली जात असली तरी त्यास दुसरा पैलू देखील आहे. सध्याच्या या घडामोडी पाहता पाचही राज्यांमध्ये युपीची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



भाजपातील नाराज नेतेमंडळी समाजवादी पक्षाच्या गळाला

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून भाजपामागची डोकेदुखी वाढली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाला लागलेली नेत्यांची गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेटचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भाजपात राजीनामा सत्र सुरुच झाले आहे. मागील तीन दिवसात मौर्य यांच्यासह आतापर्यंत ३ मंत्री, ७ आमदारांना भाजपाला रामराम ठोकला आहे. ११ जानेवारीला स्वामी प्रसाद मौर्य, आमदार भगवती सागर, रोशनलाल वर्मा, बृजेश प्रजापति, १२ जानेवारीला मंत्री दारा सिंह चौहान, आमदार अवतार सिंह भडाना, १३ जानेवारीला मंत्री धर्म सिंह सैनी, आमदार विनय शाक्य, मुकेश वर्मा आणि बाला अवस्थी यांनी भाजपाला रामराम केला आहे. विशेष म्हणजे तिन्ही मंत्र्यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली. समाजवादी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनासोबत घेत निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार्‍या निवडणुकीपूर्वी भाजपा आमदार, मंत्र्यांनी पक्षाची साथ सोडल्याने पक्ष नेतृत्व चिंतेत आहे. भाजपातील नाराज नेतेमंडळी प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाच्या गळाला लागतील असे संकेत मिळत आहेत. स्वामीप्रसाद मौर्य, दारासिंह चौहान व धरमसिंह सैनी यांच्या राजीनाम्यावरुन इकता धुराळा उडला असला तरी त्यांचा राजकीय प्रवास असाच आयाराम गयाराम सारखा राहिला आहे. स्वामीप्रसाद मौर्य हे १९९१मध्ये जदकडून आमदार झाले. नंतर त्यांनी बसपत प्रवेश केला व पुन्हा २०१७ मध्ये भाजपत दाखल झाले. दारासिंह चौहान हे दोन वेळा बसपकडून राज्यसभेवर गेले. त्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये भाजप प्रवेश केला. २०१७ मध्ये आमदार झाले. धरमसिंह सैनी हे ३ वेळा बसपकडून आमदार राहिले. २०१७ मध्ये भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आमदार व मंत्रीपदाची लॉटरी लागली. यातील एक महत्वाची बाब म्हणजे, स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मुलासाठी भाजपकडे तिकीट मागितले होते. परंतु त्यांना आधीच ते नाकारण्यात आले होते. त्याचबरोबर स्वामी प्रसाद यांनी आपल्या काही समर्थकांना देखील तिकिटे मागितली होती. मात्र भाजपाने कुणालाही तिकीट दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर खरे म्हणजे स्वामी प्रसाद मौर्य यांच्याकडे राजकीय बंडखोरी करण्याखेरीज पर्यायच उरला नाही. त्यामुळे ते भाजपमधून बाहेर पडले. 

नेत्यांच्या मुलांना भाजप नेतृत्व तिकीट देण्यास अनुकुल नाही

भाजपने प्रभावी नेत्यांच्या मुलांना अपवाद वगळता तिकिटे नाकारलेली आहेत. कल्याण सिंग यांचे चिरंजीव राजेंद्रसिंग हे एटा मधून खासदार आहेत आणि राजनाथ सिंग यांचे चिरंजीव आमदार आहेत. मात्र बाकीच्या नेत्यांना बाकीच्या नेत्यांच्या मुलांना भाजप नेतृत्व तिकीट देण्यास फारसे अनुकुल दिसत नाही. त्यामुळे भाजपमधून बाहेर पडताना अनेक नेते सामाजिक न्यायाचे कारण देत असले तरी प्रत्यक्षात आपल्या निकटवर्तीयांना आणि समर्थकांना तिकीटे मिळणार नाहीत याची खात्री पटल्यामुळे त्यांना राजकीय बंडखोरी करण्यावाचेन दुसरा पर्याय उरलेला नाही हेच स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील प्रस्थापितविरोधी अर्थात अँटी इन्कंबन्सी मत लक्षात घेता भाजपमध्ये साधारण ७० ते ८० विद्यमान आमदारांवर देखील टांगती तलवार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागांपैकी भाजपचे ३३८ आमदार आहेत. यापैकी ७० ते ८० उमेदवार जर भाजप बदलणारच असेल तर आपल्याला त्या पक्षात भवितव्य नाही असे समजून अनेक आमदार अधिकृतरीत्या तिकीट कापले जाण्यापूर्वीच बाहेर पडणे पसंत करत आहेत. याचे चित्र भाजपमध्ये गळती भाजपमध्ये बंडखोरी या स्वरूपामध्ये उमटवले जात असण्याची रणणीती विरोधी पक्षांकडून खेळली जात तर नाही ना? याचाही विचार करावा लागेल. असे असले तरी राजकीय फोडाफोडीच्या खेळात तूर्तास तरी अखिलेश यांचे पारडे जड दिसते.  समाजवादी पक्ष अतिशय आक्रमकपणे व्यूहरचना आखत असताना भाजपने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर एबीपी सी-व्होटरने केलेल्या एका सर्व्हेत भाजपाला दिलासा मिळेल, अशी माहिती आहे. उत्तर प्रदेशात कोणाची सत्ता येईल असा प्रश्न तिथल्या लोकांना विचारण्यात आला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५० टक्के लोकांनी राज्यात भाजपचे सरकार कायम राहील, असे मत व्यक्त केले आहे. तर २८ टक्के लोकांनी समाजवादी पक्षाचे सरकार येईल, असा अंदाज व्यक्त केला. बहुजन समाज पक्षाला सत्ता मिळेल असे ९ टक्के लोकांना वाटते. ६ टक्के लोकांना काँग्रेसचे सरकार येईल, असे वाटते, हा भाजपाला दिलासाच म्हणावा लागेल. उत्तर प्रदेशातील राजकारण अशा रीतीने जाती-पातींमध्ये विस्कट असताना, गोव्यासारख्या छोट्या राज्यातही भाजपच्या गोटात सारेच आलबेल म्हणावे, अशी परिस्थिती नाही. तेथील भाजप नेते मायकेल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर गोव्यातील भाजपचे एकेकाळचे तारणहार दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या चिरंजीवांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये वादंग माजले आहेत. एकंदरीत या निवडणुका आयाराम-गयाराम गाजवणार आणि लढती अटीतटीच्या होणार हे निश्चित.

Post a Comment

Designed By Blogger