तिसर्‍या लाटेत दिलासा!

देशात कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेत सलग चौथ्या दिवशी १ लाखांपेक्षा जास्त दररोजच्या केसेस समोर आल्या आहेत. दररोज झपाट्याने वाढत असलेली रुग्णांची संख्या तिसर्‍या लाटेत पहिल्यांदा १.८० लाखांपर्यंत पोहोचली आहे. पॉझिटिव्हिटी रेट तब्बल १३.२९ टक्के झाला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे २ लाखांपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. एकीकडे रुग्णसंख्या झापाट्याने वाढत असली तरी देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत रुग्ण गंभीर आजारी पडत नाहीत, असे चित्र आहे. चार महानगरांतील रुग्णालयांत दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ऑक्सिजन बेड ९० टक्के तर, आयसीयू बेड ९८ टक्के रिकामे आहेत. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आतापर्यंत समोर आलेल्या केसेसनुसार, ओमायक्रॉनमुळे फुप्फुसांना कमी इजा होते. म्हणूनच ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडत नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आलेला नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्यामुळे संपूर्णयंत्रणा कोलमडून पडली होती. मात्र यामुळे जर कुणी कोरोनाकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, हे विसरता कामा नये.ओमायक्रॉनमध्ये डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त म्युटेशन

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्व परिस्थिती पुर्वपदावर येतांना दिसत असताना ओमायक्रॉनने धडक दिली. कोरोनाचा हो व्हेरिअंट कैकपटीने पसरत असल्याने अवघ्या काही रुग्णसंख्या झपाट्याने वाढून तिसर्‍या लाटेला आमंत्रण मिळाले. ओमायक्रॉनमध्ये डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त म्युटेशन होते ज्यामुळे जगात दहशत निर्माण झाली आहे. २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत पहिला रुग्ण आढळून आल्यापासून आठवडाभरात भारत, अमेरिका, जर्मनी, फ्रान्ससह जगातील २९ देशांमध्ये ओमाक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. कोविड-१९ विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या जलद म्युटेशनमुळे संपूर्ण जगाला काळजीत टाकले आहे. हा नवीन व्हेरिएंट डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जाते. डेल्टा आणि ओमायक्रॉन हे डबल डेंजरस असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टा मिळून कोरोनाची त्सुनामी आणत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येत चिंतेत भर टाकलेली असतानाच आता डब्लूएचओने हा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाची त्सुनामी प्रचंड काम करणार्‍या आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आणेल असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल असा इशाराच त्यांनी दिला आहे. कोरोनाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. एन. च्या. अरोरा यांनी कोरोनाच्या पीक पिरिअडबद्दल माहिती देतांना म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्यात पीक येवू शकते. आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांच्या एका गटानेही हिच शक्यता वर्तविली आहे. ओमायक्रॉनचा जागतिक डेटा आणि गेल्या ५ आठवड्यांतील अनुभव दर्शवितो की, बहुतेक ओमायक्रॉन संक्रमण सौम्य आणि लक्षणे नसलेले असतात. याचवेळी, रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण गंभीर आजारी आहेत किंवा त्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. ओमायक्रॉनमुळे हॉस्पिटलायझेशन दर फक्त १-२ टक्के आहे. डेल्टा वेव्ह दरम्यान, हॉस्पिटलायझेशन दरापेक्षा हा आकडा खूपच कमी आहे. 

ही लाट दुसर्‍या लाटे इतकी गंभीर नसेल!

दिल्लीचे उदाहरण पाहता सध्या येथे रोज २० हजार रुग्ण आढळत आहेत. दुसर्‍या लाटेदरम्यान गेल्या वर्षी मेमध्ये एवढेच रुग्ण आढळत तेव्हा १८,४७३ ऑक्सिजन बेड, ५३७१ आयसीयू बेड व १८५२ व्हेंटिलेटर बेड भरलेले होते. या लाटेत एवढेच रुग्ण आढळत असतानाही आश्चर्य म्हणजे फक्त १४९१ ऑक्सिजन बेड, २७५ आयसीयू बेड व ९१ व्हेंटिलेटर बेड भरलेले आहेत. म्हणजे दिल्लीत अजून ९१ टक्के ऑक्सिजन बेड, ९४ टक्के आयसीयू बेड व ९५ टक्के व्हेंटिलेटर बेड रिकामे आहेत. देशात कोरोनाची तिसरी लाट आली असली तरी ही लाट दुसर्‍या लाटे इतकी गंभीर नसेल, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी मिनी लॉकडाऊन लागू केला असून अनेक बाबतीत कडक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील ४ न्यायमूर्ती व १५० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. संसदेत नियमित चाचणीदरम्यान सुमारे ४०० कर्मचारी कोरोना संक्रमित आढळले. त्यामुळे या महिनाअखेरीस सुरू होणार्‍या बजेट अधिवेशनावर संकटाचे सावट आहे. दरम्यान, वाढता संसर्ग लक्षात घेता अवर सचिव स्तराखालील ५० टक्के कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने गर्भवती महिला आणि दिव्यांग कर्मचार्‍यांना कार्यालयात न येण्याची सवलत देत घरून काम करण्यास सांगितले आहे. राज्य व केंद्र सरकार अख्यारित येणारे कार्यालयांमध्ये मोठ्या प्रामणात रुग्ण आढळून येत असतांना दुसरीकडे देशभरात तब्बल ७०० ते ८०० डॉक्टर्स पॉझिटीव्ह आढलले आहेत. त्यांना ७ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यानंतर कोणत्याही टेस्टशिवाय त्यांना ड्यूटी जॉईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही एक गंभीर बाबच म्हणावी लागेल. जेंव्हा डॉक्टर्स स्वत: निरोगी राहतील तेंव्हाच आरोग्य यंत्रणा देखील मजबूत राहिल, हे लक्षात घ्यायला हवे. सरकार व्हेंटिलेटर, हॉस्पिटल, ऑक्सिजन, बेड, बिल्डिंग सर्व काही पैसे देऊन खरेदी करु शकतात, मात्र डॉक्टर्स पैसे देऊन एका झटक्यात खरेदी केले जाऊ शकत नाहीत. याकरीता आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही, याची जबाबदारी सर्वांची आहे. मी दोन्ही डोस घेतले आहेत, मला काहीच होणार नाही अशा आविर्भावात वावरणे मोठ्या संकटाला आमंत्रण देणारे ठरु शकते. आजच्या घडीला तिसरी लाट सुरु झाली असली तरी गंभीर रुग्णांचे अत्यत्प आहे. मात्र भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जावू न देणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे.

Post a Comment

Designed By Blogger