कोरोनाचे सुपरस्प्रेडर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे देखील रुग्ण वाढत चालल्याने राज्याची चिंता वाढली आहे. तसेच जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचे चित्र गेल्या चार दिवसांत दिसू लागल्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले. लोकांनी निर्बंध पाळले नाहीत तर लॉकडाऊन अटळ असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊनचे ढग अधिक गडद झाले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन नेत्यांकडून वारंवार केले जात आहे मात्र अगदी त्याच्या उलट राजकीय नेत्यांच्या सभा, कार्यक्रमांना होणारी गर्दी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रण देत आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोना बाधित झालेचे समोर आले आहे. त्या नेत्यांनी अनेक कार्यक्रमांना, विवाह सोहळ्यांना हजेरी लावल्याने खर्‍या अर्थाने ते कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरले आहेत.



राजकीय नेतेच खरे कोरोनाचे सुपर स्प्रेडर

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका टळल्यानंतर गत दोन महिन्यांपासून देशाची खर्‍या अर्थाने कोरोनापूर्व काळाकडे वाटचाल सुरु झाली असतांना ओमायक्रॉनची एन्ट्री झाली. कोरोनाच्या या विषाणूचा डेल्टापेक्षा कितीतरी अधिक पटीने फैलाव होत असल्याने अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये दैनंदिन लाखो रुग्ण आढळून येत आहेत. परिणामी तेथील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा कमालीचा ताण आला आहे. भारतामध्येही ओमायक्रॉनने हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याचे गत पाच दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतात घातलेल्या थैमानाच्या कटू आठवणी अजूनही अनेकांच्या स्मृतीतून गेल्या नसतांना आता ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणे अटळ मानले जात आहे. कोरोना आणि नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचत कोरोनाच्या रूग्णांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. अशात राज्यात राजकीय कार्यक्रम आणि बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते. आता या नेत्यांनाच कोरोनाची लागन झाली आहे. आता या नेतेमंडळींना कोरोना झाल्यामुळे त्यांना भेटलेले दुसरे नेत्यांची चिंता वाढली आहे. बहुतांश वेळा राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. अहमदनगरमध्ये भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या लग्नात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार गिरीश महाजन, भाजप नेते राम शिंदे अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. सर्वात गंभीर बाब म्हणजे, राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोना बाधित झाले आहेत. यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सागर मेघे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शेखर निकम, आमदार इंद्रनील नाईक, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री दिपक सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ मोठ्या सभा, रॅली आदी कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मोठ्या सभांना होणारी गर्दी पाहिली की काळजात धस्स होतं. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी हजारोंच्या संख्येने लोक त्यात सहभागी झाले होते. यामुळे राजकीय नेतेच खरे कोरोनाचे सुपर स्प्रेडर बनले असल्याचे चित्र आहे. 

राजकीय नेत्यांना भान ठेवावे लागेल

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईत रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढलेला पाहायला मिळतोय. या पार्श्‍वभूमीवर आता महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात राज्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण दोन लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयआयटी कानपूरच्या तज्ञांनी सांख्यिकी मॉडेलचा वापर करुन केलेल्या संशोधनानुसार, फेब्रुवारी महिन्यात तिसर्‍या लाटेचा पिकं परियड असेल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. एकीकडे अशी भयावह परिस्थिती निर्माण होत असली तरी दुसरीकडे लोकांमध्ये बेफिकरीवृत्ती वाढली आहे. मास्क, फिजिकल डिस्टसिंग, सॅनेटायझर अनेकांच्या जीवनातून हद्दपार झाल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात सर्वत्र दिसून येत आहे. ही बेफिकरी तिसर्‍या लाटेला आमंत्रण देणारी ठरु शकते. ही सर्व परिस्थिती पाहता भारताने पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मात्र दीड-दोन वर्षांनंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असतांना आता पुन्हा एकदा लॉकडाऊन परवडेल का? याचा विचार प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. आजवरचा अनुभव पाहता युरोपमध्ये धुमाकुळ घतल्यानंतर कोरोना भारतात हातपाय पसरतो. आता सध्यस्थितीला कोरोनाची चौथी लाट संपूर्ण युरोपला विळखा घालून बसली आहे. यामुळे ती तिसर्‍या लाटेच्या रुपाने भारतात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. युरोपात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर भारतानेही लवकरच सावध होऊन कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे याची कटाक्षाने अमंलबजावणी करावी लागेल. राजकीय नेत्यांनीही नजिकच्या काळात सभा, संमेलने घेणे टाळली पाहिजे. कारण आता जर आपण पुन्हा चुक केली तर त्याची आधीपेक्षा मोठी किंमत चुकवावी लागेल, याचे भान राजकीय नेत्यांना ठेवावे लागेल. यासाठी त्यांनी कोरोनाचे सुपर स्प्रेडर होवू नये, हेच राज्य व देशाच्या हिताचे ठरेल!

Post a Comment

Designed By Blogger