नव वर्षाचे स्वागत करतांना...

वाईट काळ लवकरात लवकर जावा, त्याची आठवणही येऊ नये, अशी मानवी स्वभावाची इच्छा असते. निसर्ग नियमांत हे शक्य नाही. २०२१ या वर्षाच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. सरत्या वर्षात खूप काही घडून गेले. हा काळ सर्वाधिक आव्हानांचा होता. २०२१मध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले, यात लाखों लोकांचा जीव गेला. २०२१ हे संपूर्ण वर्ष वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींनी व्यापले होते. भारताच्या तीनही समुद्र किनार्‍यांवर येऊन गेलेली चक्रीवादळे, त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये दोन वेळा आलेली मध्यमस्वरूपाची वादळे, केरळ, तामिळनाडू या राज्यांना बसलेला पावसाचा तडाखा, ऑक्टोबर महिन्यात उत्तराखंडामध्ये पावसाने धुमाकूळ घातला. केदारनाथ, बद्रीनाथ या भागातील अनेक लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. २०२१ या वर्षाची आठवण अनेक जण कधीच काढू इच्छिणार नाही. यावर्षाचे अशा काही घटना घडून गेल्या ज्यांच्या स्मृती कधीही मिटणार नाहीत. असंख्य आठवणींना गोंदवून काही चांगल्या, काही वाईट, कधीही न विसरणार्‍या आठवणी मनात, डोळ्यात साठवून गेलेले हे वर्ष कोरोनाची दुसरी लाट, लसीकरण, व सरतेशेवटी ओमायक्रॉनच्या दहशतीच्या नावावर नोंदवले गेले. मात्र २०२१ मध्ये निर्माण झालेली आव्हाने २०२२ मध्ये धडे देणारी आहेत. त्यावर भविष्याचा पाया घडेल. आता प्रत्येकाचा जीवनाविषयीचा संकल्प आणखी दृढ झाला आहे, हे विसरुन चालणार नाही.



कोरोना आणि शेतकरी आंदोलनाची सर्वाधिक चर्चा 

इतिहासाच्या कालखंडात काही वर्षे अशीही होती, जेव्हा भीषण युद्ध किंवा मोठ्या नैसर्गिक संकटामुळे संपूण मानवजातीचे अस्तित्व पणाला लागले होते. अशा वर्षांमध्ये आता २०२० व २०२१ ची नोंद अवश्य होईल. मात्र सर्वात कठीण आव्हानेच आपणास सर्वात बळकट भविष्याचा पाया घालण्याची संधी देते. या काळाने आपणास लॉकडाऊनमधून बाहेर पडतांना किती वेगाने स्थिती पूर्वपदावर आणू शकतो, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. सरते वर्ष दोन गोष्टींमुळे सर्वाधिक गाजले ते म्हणजे, कोरोना आणि शेतकरी आंदोलन! २०२१मध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने लाखों लोकांचा जीव घेतला. ऑक्सिजन, बेड, रेमीडिसीव्हरच काय तर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभे राहवे लागले. याच वर्षात जवळपास पूर्ण वर्षभर लाखों शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांना विरोध करत राहिले. याचे पडसाद राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील उमटले. याच दरम्यान केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या पुत्राने लखीमपूर येथे गाडीने शेतकर्‍यांना चिरडल्याच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या हिंसाचारत ४ शेतकर्‍यांसह ८ लोक मारले गेले. मात्र सरतेशेवटी विजय शेतकर्‍यांचाच झाला. केंद्र सरकारने तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. २०२१मध्ये पेगासस प्रकरण देखील प्रचंड चर्चेत राहिले. जुलैमध्ये जगातील १७ माध्यम संघटनांनी दावा केला होता की, भारतासह अनेक देशांच्या सरकारांनी पत्रकार, राजकारणी, मानवाधिकार कार्यकर्त्यांचे फोन पेगासस स्पायवेअरने हॅक केले. हा वाद इतका वाढला की सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी समिती स्थापन केली. ऑगस्ट महिन्यात पेंडोरा पेपर्स लीकने जगातील अनेक नामवंत आणि नेत्यांनी परदेशात मालमत्ता लपवल्याचे उघड केले. यात १.२ कोटी कागदपत्रे होती. त्यात ९० देशांतील शेकडो राजकारण्यांचा समावेश असलेल्या आर्थिक फेरफाराची कागदपत्रे उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतातील अनिल अंबानी, विनोद अदानी, सचिन तेंडुलकर आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह ३०० हून अधिक प्रतिष्ठित लोकांची नावे समोर आली आहेत. अनेक देशांतील ६०० हून अधिक पत्रकारांनी अनेक महिन्यांत ही माहिती गोळा केली. यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. शेतकरी आंदोलानादरम्यान टूलकीटचा मुद्दाही चर्चेत राहिला. बंगळुरूच्या २१ वर्षीय दिशा रवीला शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिटचे संपादन करून ते प्रसारित केल्याबद्दल फेब्रुवारीत तुरुंगात टाकण्यात आले होते. राज्याच्या राजकारणात मोठी उथलपुथल निर्माण करणारे प्रकरण म्हणजे अँटिलिया समोर सापडलेली स्पोटके. २४ ते २५ फेब्रुवारीच्या रात्री मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि धमकीची नोट सापडली होती. हे प्रकरण इतके वाढले की त्यात पोलीस आयुक्त परमबीरसिंग वादात सापडले तर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेंव्हापासून ते तुरुंगात आहेत. सरत्यावर्षात एका दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिनकुमार रावत यांच्यासह काही अधिकार्‍यांचा एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. 

मावळत्या वर्षाच्या सर्व कटू आठवणींना बाजूला सारूया 

सरत्या वर्षात केवळ वाईट घटना घडल्या असे म्हणता येणार नाही. २०२१मध्ये काही चांगल्या घटनाही घडल्या. देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्केतून बाहेर येण्याचे स्पष्ट संकेत २०२१मध्ये मिळाले. सरते वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत लाभदायी ठरले. कारण २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्यपदके जिंकून गुणतालिकेत ४७ वे स्थान मिळवले. ७ ऑगस्टला टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने केलेल्या भालाफेकीमध्ये १३ वर्षांनंतर देशाला सुवर्णपदक मिळाले. त्यासह पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनी पदक जिंकले. त्यापाठोपाठ पॅरालिम्पिकमध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्यपदके जिंकली. २०२१ हे वर्ष सर्वाधिक नैसर्गिक संकटांचे वर्ष राहिले आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. याच वर्षाच देशातील अनेक शहरांमध्ये पूराचे संकट ओढवले. केरळमध्ये पाऊस झाला. तामिळनाडूचे चेन्नई शहर जलमय झाले होते. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. प्रसिद्ध देवस्थान असलेल्या तिरूपती बालाजीच्या परिसरात ढगफुटी झाल्यासारखे चित्र होते. महाराष्ट्रात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोकणामध्ये दोन वेळा चक्रीवादळे आली. अगदी आता वर्ष संपतावेळीही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. मात्र एकामागून एक येणार्‍या संकटांची मालिका सुरु असतांना त्यावर मात करुन पुढे वाटचाल सुरुच राहिली. आता २०२१ संपले असून आजपासून २०२२ हे नववर्ष सुरु होत आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्सवावर यंदाही कोरोना महामारीचे सावट आहेच. देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचे तज्ञांचे मत आहे. मात्र हे नवं वर्ष आशेची किरण घेवून येत आहे. भारतासह जगभरात सुरु असलेल्या लसीकरणामुळे कोरोनाचे संकट लवकरच संपेल व या नवीन वर्षातच कोरोनापुर्वी प्रमाणेच परिस्थिती पहायला मिळेल, अशी आशा आहे. २०२१ ला निरोप देताना येणारे २०२२ हे नूतन वर्ष कसे असेल? या प्रश्नाने अनेकांच्या मनात काहुर माजविले असले तरी, मावळत्या वर्षाच्या सर्व कटू आठवणींना बाजूला सारत येणार्‍या वर्षाच्या तयारीला लागले पाहिजे. सरत्या वर्षाचा लेखा-जोखा मांडतांना ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत याचा संकल्प करून नवी उमेद, नव्या आशा-आकांक्षा, घेऊन येणार्‍या नव्या वर्षाची, नाविन्याची कास धरत त्याचे जल्लोषात स्वागत करुया. नवी स्वप्न साध्य होण्यासाठी योग्य आखणी करुन त्या मार्गाने चालतांना परिश्रम यांची शिकस्त करण्यासाठी मनाची तयारी करुया. नव वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

Post a Comment

Designed By Blogger