देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटीवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात असतानाच आता नव्या रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनीवाढ झाली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षाही अधिक वेगाने ओमायक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार होतो. त्यामुळे कमीत कमी कालावधीत कोरोना पुन्हा एकदा थैमान घालू शकतो याचा अंदाज घेत सरकार सतर्क झाले आहे. ओमियोक्रॉनची वाढती संख्या ही धोक्याची घंटा असून तिसर्या लाटेची सुरुवात असल्याचे काहींचे मत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही ओमायक्रॉनने थैमान घातले आहे. ओमायक्रॉन विषाणूचे नवे रुग्ण वाढत असताना जगभर कोरोनाचे रुग्ण बुधवारी सलग दुसर्या दिवशी १० लाखांच्या वर नोंदले गेले. फ्रान्समध्ये एका दिवशी १,७९,८०७ नवे रुग्ण नोंदले गेले व ही युरोपमधील सगळ्यात जास्त संख्या आहे. फ्रान्ससोबत इटली, ग्रीस, पोर्तुगाल आणि इंग्लंडमध्येही कोरोना रुग्णांच्या रोजच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली आहे.
जानेवारीपासून बूस्टर डोस
कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने प्रशासनाचे टेन्शन वाढवले आहे. आरोग्य मंत्र्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक रुग्ण हे दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. ओमायक्रॉनचे दिल्लीमध्ये २६३, महाराष्ट्रात २५२, गुजरात ९७, राजस्थान ६९, केरळ ६५, तेलंगणा ६२ रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेने आता एक धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन हे डबल डेंजरस असल्याचे म्हटले आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टा मिळून कोरोनाची त्सुनामी आणत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येत चिंतेत भर टाकलेली असतानाच आता डब्लूएचओने हा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाची त्सुनामी प्रचंड काम करणार्या आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आणेल असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल असा इशाराच त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातही वाढती रुग्णसंख्या ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. एका दिवसात कोरोना रुग्ण दुपटीने वाढल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. रुग्णवाढ झपाट्याने होत असल्याने राज्यात पुन्हा काही कठोर निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबईमध्ये जमावबंदी लागू केल्यानंतर आता जमावबंदी आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या जागांमध्ये किंवा बंदिस्त जागांमध्ये पार्टीचे अथवा कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी घालण्यात आली आहे. ३० डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधील, रेस्तराँ, हॉटेल्स, ओपन स्पेस किंवा बंदिस्त जागांमध्ये नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे किंवा पार्टींचे आयोजन करता येणार नाही. लसीकरणाच्या आधारे कोरोनावर पूर्पणणे नियंत्रण आणता येईल अशी अपेक्षा असतानाच कोरोनाचे नवे व्हेरियंट नवे आव्हान निर्माण करत आहेत. यामुळे अनेक देशांनी पूर्वतयारी करत निर्बंध लावण्यासही सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात जागतिक रुग्णसंख्या ११ टक्क्यांनी वाढली असून अमेरिका आणि फ्रान्स यांनी बुधवारी सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. भारताने अत्यंत सावध भुमिका घेतली असून १५ ते १८ वर्ष वयोगटातील युवांसह एकाहून अधिक व्याधीने ग्रस्त व ६० वर्षांहून अधिक वय असलेले नागरिक, आरोग्यसेवक व अन्य कोरोना योद्ध्यांना जानेवारीपासून बूस्टर डोस देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.
.....तर आधीपेक्षा मोठी किंमत चुकवावी लागेल
ओमायक्रॉन किंवा कोरोनाच्या अन्य विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक आहे असे भारत, अमेरिका, इंग्लंडसहित अनेक देशांचे मत आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दीड-दोन वर्षांनंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असतांना आता पुन्हा एकदा लॉकडाऊन परवडेल का? याचा विचार प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. आपला शेजारी देश असलेल्या चीनने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या शियान शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. चीनमधील शियान शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे. यावरुन लक्षात येते की ओमियोक्रॉनचे संकट किती घातक ठरणारे आहे. आजवरचा अनुभव पाहता युरोपमध्ये धुमाकुळ घतल्यानंतर कोरोना भारतात हातपाय पसरतो. आता सध्यस्थितीला कोरोनाची चौथी लाट संपूर्ण युरोपला विळखा घालून बसली आहे. यामुळे ती तिसर्या लाटेच्या रुपाने भारतात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपल्याकडे सर्वजण पूर्णपणे निर्धास्त व बेफिकीर झाल्याचे दिसून येत आहेत. जणू काही कोरोना नष्टच झाला आहे. या आविर्भावात जवळपास सर्वांनी आपला जीवनक्रम सुरु केला आहे. ही खरी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. कारण गत दोनवेळेचा अनुभव असाच काहिसा आहे. यामुळे किमान आता तरी भुतकाळात झालेल्या चुका टाळता येवू शकतात. युरोपात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतानेही लवकरच सावध होऊन कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे याची कटाक्षाने अमंलबजावणी करावी लागेल. राजकीय नेत्यांनीही नजिकच्या काळात सभा, संमेलने घेणे टाळली पाहिजे. कारण आता जर आपण पुन्हा चुक केली तर त्याची आधीपेक्षा मोठी किंमत चुकवावी लागेल, याचे भान प्रत्येकाला ठेवावेच लागणार आहे.
Post a Comment