भारतवंशियाचे पाऊल चंद्रावर!

मानवाला अगदी प्राचीन काळापासून चंद्राचे विशेष आकर्षण राहिले आहे. चंद्र आणि माणसाचे नाते खूपच वेगळे आहे. साहित्यिक व कविकुलाचा हा लाडका, प्रेमीयुगुलांच्या भावबंधांचा साक्षीदार मानला जातो. चंद्राची तुलना प्रियसीसोबत करत अनेक गाणी लिहिली गेली आहेत. आजी-आजोबांच्या गोष्टीत तर ‘चांदोबा’ असतोच. तिकडे सातासमुद्रापारच्या शेक्सपिअरच्या साहित्यातही चंद्र डोकावतोच. पाश्चात्त्य जगात काही विज्ञान काल्पनिकांमध्ये चंद्राचा उल्लेख झाला आहे. तसेच काही हॉलीवूडपटांमध्येही चांद्रमोहिमा दाखविण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या अंतराळवीरांनी यशस्वीरित्या चांद्र मोहिमा राबविल्या आहेत. आतापर्यंत एकाही भारतीयाने चंद्रावर पाऊल ठेवले नसले तरी चार भारतीय अंतराळात गेले आहेत. यामध्ये सर्वात आधी राकेश शर्मा त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विलियम्स आणि राजा चारी हे अंतराळात गेले होते. आता प्रथमच एका भारतवंशीय अंतराळवीराची एका चांद्र मोहिमेसाठी निवड झाली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा ने आपल्या नियोजित चांद्रमोहिमेसाठी १० प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांची निवड केली आहे. यामध्ये भारतीय मूळ असलेले यूएस एअर फोर्सचे लेफ्टनंट कर्नल अनिल मेनन यांचाही समावेश आहे. 



चंद्रावर अद्याप एकही भारतीय अंतराळवीर गेलेला नाही

अमेरिकेची अंतराळ संस्था नासा येत्या काही काळात चंद्रावर यान पाठविणार आहे. यावेळी पुन्हा एकदा मनुष्य पाठविण्यात येणार आहे. अंतराळवीर चंद्रावर आधीपेक्षा सर्वाधिक वेळ व्यतित करणार आहेत. तेथून ते मंगळ ग्रहावर लक्ष ठेवणार आहेत. नासाने यासाठी १० अंतराळवीरांची निवड केली आहे. यामध्ये भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन यांचे देखील नाव आहे. मून मिशनसाठी १२ हजार जणांचे अर्ज आले होते. ज्यामधून केवळ १० जणांची निवड या अभियानाकरता झाली आहे.अनिल यांच्यासह निकोल एयर्स, मार्कोस बेरियोसो, ल्यूक डेलाने, जेसिका विटनर, डेनिज बर्नहॅम, जॅक हॅथवे, क्रिस्टोफर विलियम्स, क्रिस्टीना बिर्चो आणि आंद्रे डगलस यांचीही निवड झाली आहे. चांद्रमोहिमेच्या आधी दोन वर्षे या सर्वांना कठोर प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर या अंतराळवीरांना आधी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन, तेथून चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहेत. जर अनिल मेमन हे मून मिशनमधून चंद्रावर पाऊल ठेवण्यात यशस्वी झाले तर ते पहिले भारतीय वंशाचा व्यक्ती ठरतील जे चंद्रावर पाऊल ठेवण्यात यशस्वी होईल. अंतराळात आजवर पाच भारतीय दाखल होऊन चुकलेले असले तरी चंद्रावर अद्याप एकही भारतीय अंतराळवीर गेलेला नाही. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर होते. शिवाय भारतीय मूळ असलेल्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स,राजा चारी आणि सिरीशा बंदला यांनीही अंतराळ वारी केली आहे. आता अनिल मेनन यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीयाचे पाऊल चंद्रावर पडू शकते. अनिल यांचे वडील भारतीय, तर आई युक्रेनियन असून ते अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये वाढले आहेत. मेनन यांनी १९९९ मध्ये हार्वर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये न्यूरोबायोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. २००४ मध्ये कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटी अनिलने मॅकेनिकल इंजीनियरिंग केली. स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमध्ये डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. मेनन हे २०१८ मध्ये एलन मस्कच्या अंतरिक्ष कंपनी स्पेसएक्सचा भाग राहिले आहेत. तसेच डेमो-२ अभियानादरम्यान मानवाला अंतराळात पाठवण्याच्या मिशनमध्ये मदत केली होती. इतकंच नाही तर भविष्यातील अभियानांसाठी मानव प्रणालीची मदत करणाच्या चिकित्सा संघटनेची निर्मितीही त्यांनी केली. अनिल मेनन हे पोलिओ लसीकरणाचा अभ्यास आणि समर्थनासाठी रोटरी एम्बेसेडर म्हणून भारतात एक वर्ष वास्तव्यालाही होते. 

भारतीयांसाठी मोठ्या अभिमानाची बाब 

अमेरिकन वायुसेनेत मेनन यांनी फ्लाईट सर्जन म्हणून ४५ वी स्पेस विंग आणि १७३ वी फ्लाईट विंगमध्ये सेवा दिली आहे. ते १०० पेक्षा अधिक उड्डाणात सहभागी झाले. तसेच क्रिटिकल केयर एयर ट्रान्सपोर्ट टीमचा भाग बनून त्यांनी अनेक रुग्णांची वाहतूक केली. जानेवारी २०२२ मध्ये आंतराळवीर म्हणून प्रशिक्षणाला सुरुवात ते करतील. हे प्रशिक्षण २ वर्षांपर्यंत चालेल. अंतराळवीर उमेदवार प्रशिक्षण पाच प्रमुख श्रेणींमध्ये मोडते यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या जटिल प्रणालीचे संचालन आणि देखभाल, स्पेसवॉकसाठी प्रशिक्षण, जटिल रोबोटिक्स कौशल्ये विकसित करणे, प्रशिक्षण जेट सुरक्षितपणे ऑपरेट करणे आणि रशियन भाषा कौशल्ये आदींचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांना अंतराळ स्थानकावर संशोधन करणे, व्यावसायिक कंपन्यांनी तयार केलेल्या अवकाशयानावर अमेरिकन मातीतून प्रक्षेपण करणे, तसेच नासाच्या ओरियन स्पेसक्राफ्ट आणि स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेटवरील चंद्रासह गंतव्यस्थानांवर खोल अंतराळ मोहिमेसाठी नियुक्त केले जाऊ शकते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर २०२५ मध्ये पहिली महिला आणि एक पुरुष यांना चंद्रावर पाठवले जाणार आहे. चंद्रपृष्ठावर गुरुत्वाकर्षण कमी आहे, तिथे प्राणवायू किंवा पाणी नाही, असे असले तरी चंद्रावर मानवी मोहिमांच्या पलिकडे जावून थेट मानवी वस्ती उभारण्याची स्वप्ने अनेक वर्षांपासून पाहिली जात आहेत. इलॉन मस्क यांची स्पेस एक्स या कंपनीने या प्रकल्पावर काम देखील सुरु केले आहे. या दृष्टीने ही मोहिम अत्यंत महत्वाची मानली जात आहे. आजवर अनेक चंद्रमोहिमा झाल्या पण चंद्रावर उतरून तिथून पुन्हा पृथ्वीवर उतरण्याच्या अनुभवाची सर कशालाच नाही. आज ५० वर्षानंतर नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी सज्ज होते आहे. या मोहिमेसह भविष्यातला मानवाचा चंद्रावरचा वावर हा केवळ काही मिनिटांचा किंवा तासांचा नसेल. एक झेंडा रोवून, पाऊलठसा उमटवून परत येण्यात आता काहीच हशील नाही. आता तिथे जायचे ते मुक्कामासाठीच, ही माणसाची महत्त्वाकांक्षा आहे. संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्वाची असलेल्या या मोहिमेत एका भारतवंशियाचा समावेश होतोय, ही सर्व भारतीयांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे.

Post a Comment

Designed By Blogger