क्रिप्टोचे आभासी मायाजाल

सध्या जगभरात क्रिप्टो करन्सीची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. अनेक देशांमध्ये क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीला अधिकृत मान्यता देण्यात आल्यामुळे भारतात देखील क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करणार्‍यांची संख्या वाढत आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये करण्यात येणार्‍या गुंतवणुकीमधून अल्पवधीत चांगला नफा मिळत असल्याने अनेक जण क्रिप्टो करन्सीकडे गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून पाहू लागले आहेत. मात्र क्रिप्टोचे भारतामधील भविष्य काहीसे अधांतरी दिसत आहे. क्रिप्टोला भारतामध्ये अधिकृत मान्यता देण्यात यावी की नाही, याबाबत सरकारचे धोरण अधांतरी आहे. असे असले तरी भारतामध्ये, ‘क्रिप्टो’ व्यापार २०३० पर्यंत २४१ दशलक्ष (अंदाजे रु. १,७९० कोटी) पर्यंत पोहोचतील, असा अंदाज ‘नॅसकॉम’ या संस्थेच्या अहवालात व्यक्त केला आहे. 'या' देशांमध्ये बिटकॉइन हे एक प्रमुख चलन 

अलीकडच्या काही वर्षात क्रिप्टो करन्सी हा शब्द सर्वसामान्यांनाही चांगलाच परिचित झाला आहे. ‘क्रिप्टो’ या शब्दाचा अर्थ गुप्त असा आहे. क्रिप्टो करन्सी ही एक प्रकारची डिजिटल करन्सी आहे. जी क्रिप्टोग्राफी नियमांनुसार चालते आणि संचलित केली जाते. क्रप्टोग्राफी चा अर्थ कोडिंग भाषेची उकल करण्याची कला असाही सांगितला जातो. जशी जगभरात रुपया, डॉलर, युरो, पाऊंड अशी विविधे चलने आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीजही आहेत. त्यामध्ये बिटकॉईन, एथेरियम, लाईटकॉइन, रिप्पल, टिथर, डॉजकॉइन, शिबाईनु यांच्यासह सुमारे दोन हजारांहून ही अधिक क्रिप्टोकरन्सी जगभरात उपलब्ध आहेत. कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन छापत नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंग द्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. यावर कुण्या एकाची मालकी नसते. सर्व क्रिप्टोकरन्सीमध्ये सर्वात लोकप्रिय झालेली करन्सी म्हणजे बिटकॉईन! बिटकॉइन आपण चलनाप्रमाणे प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही. तसेच त्याला हातही लावू शकत नाही. बिटकॉइन हा एका पर्सनल ई-वॉले मधून दुसर्‍या पर्सनल ई-वॉलेट मध्ये हस्तांतरीत केले जातात. २००९ साली सतोशी नाकामोटो नामक व्यक्ती किंवा लोकांच्या गटाने बिटकॉईनची निर्मिती केल्याचे मानले जाते. जपान, यूएस, दक्षिण कोरिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये बिटकॉइन हे एक प्रमुख चलन म्हणून अधिकृतरित्या मान्यताप्राप्त आहे. तर चीन, रशिया, भारतासह जगभरातील अनेक देशांनी बिटकॉइन असुरक्षीत मानला आहे. त्यामुळे बिटकॉइनसारख्या अन्य क्रिप्टो करन्सीज अद्यापही अधिकृतरित्या व्यवहारात स्थान मिळवू शकले नाही. काही महिन्यांपुर्वी हॅकर्सच्या एका गटाने बिटकॉईनवर डिजिटल दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, स्पेस एक्स कंपनीचे इलॉन मस्क यांच्यापासून थेट अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गजांची नावे समोर आली होती. याला बिटकॉईन स्कॅम म्हणून देखील ओळखले जाते. यामुळे बिटकॉईनची चर्चा जगभर झाली. त्यानंतर इलॉन मस्क यांनी टेस्ला कार खरेदीसाठी बिटकॉईनचा वापर केला जावू शकतो, असे ट्विट केले होते यामुळे बिटकॉईनचे दर अचानक वाढले मात्र अल्पवधीतच मस्क यांनी आपला निर्णय मागे देखील घेतला होता. याची भारतात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. 

याचा वापर घोटाळे, टेरर फंडिंगमध्येही होतो

मध्यतंरी केंद्र सरकारने क्रिप्टोला भारतामध्ये परवानगी द्यावी की नाही द्यावी, अधिकृत परवानगी दिल्यास त्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतात? याचा आढावा घेण्यासाठी एका समीतीची स्थापना केली होती. क्रिप्टोकरन्सीबाबत नेमके धोरण काय असावे, मान्यता दिल्यास त्यावर काय निर्बंध घालण्यात यावेत? याबाबत नुकतीच माजी अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ब्लॉक चेन, क्रिप्टो मालमत्ता परिषद (बीएसीसी) चे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. या बैठकीनंतर बोलताना सिन्हा यांनी म्हटले आहे की, भारतात क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी आणता येणार नाही. मात्र क्रिप्टोकरन्सीमध्ये होणार्‍या गुंतवणुकीबाबत काही नियम व अटी घातल्या जाऊ शकतात. याबाबत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांना सरकारने असे कोणतेही विधेयक मंजूर केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र क्रिप्टो करन्सी बद्दल भारत सरकारचे धोरण नेमके काय असेल? याबाबतही सरकारला ठोस निर्णय घेता आलेला नाही. दुसरीकडे रिझर्व्ह बँक भारताची स्व:ताची डिजिटल करन्सी लाँच करण्याच्या तयारीत आहे. करन्सी लाँच झाल्यानंतर तिचे मूल्य ठरवण्यात येईल, हे मूल्य मात्र भारतीय चलनात असणार आहे. याबाबत बोलताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे की, भारतामध्ये क्रिप्टो करन्सीला परवानगी देणे वाटते तितके सोपे नाही. कारण देशापुढे सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे आता आरबीआयकडून भारताची स्व:ताची डिजिटल करन्सी लाँच करण्याची तयारी सुरू आहे. या डिजिटल करन्सीचे पूर्ण नियमन हे आरबीआयच्या हातात असेल. डिजिटल करन्सी लाँच करताना सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. याचाच अर्थ असा होतो की, भारतामध्ये जरी डिजिटल करन्सीला अधिकृत मान्यता देण्यात आली तरी तीचे मुल्य हे भारतीय रुपयांमध्ये असेल. जगभरातील अनेक अर्थतज्ञांमध्ये क्रिप्टो करन्सीबद्दल दोन विरुध्द मतप्रवाह दिसून येतात. पहिला गटाच्या मतानुसार, क्रिप्टो करन्सी हे जगाचे फ्यूचर आहे. तर दुसर्‍या गटाचे मते बिटकॉइन हा एक बुडबुडा आहे. कारण, यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास यातून केव्हा बाहेर पडायचे याचा नेमका सल्ला देता येत नाही. तसेच, फुगलेल्या मूल्याच्या आधारावर तो आणखी किती फूगणार हाही एक सवाल आहे. प्रत्यक्ष वास्तव रुपात हे चलन नसल्याने त्याची सत्यताही निटशी कळत नाही. याचा वापर घोटाळे, टेरर फंडिंगमध्येही होतो. क्रिप्टोकरन्सीची देवाणघेवाण ट्रॅक करू शकत नाही त्यामुळे कोणी कोणाला दिले याचा काही पत्ता लागत नाही. यामुळे भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होवू शकतात. यामुळे त्यात गुंतवणूक करायची किंवा नाही हे गुंतवणूकदाराने स्वत:च ठरवायचे आहे.Post a Comment

Designed By Blogger