देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांचे तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर क्रॅश होवून अपघाती निधन झाल्याने देशाची मोठी हानी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९ मध्ये स्वातंत्र्य दिनी सीडीएस पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली. त्यानंतर रावत यांची पदावर नियुक्ती करण्यात आली. डिसेंबर २०१९ मध्ये रावत यांनी सीडीएस म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने रावत यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशासोबतच देशाबाहेरही बिपिन रावत यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. अशांत परिसरात उत्तम सेवा देणारे अधिकारी ही त्यांची ओळख. चीन, पाकिस्तान सारख्या देशांना परखड भाषेत उत्तर देण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे. आपल्या लष्करी सेवेदरम्यान बिपिन रावत यांना अनेक पुरस्कारही मिळालेत. लष्करात अनेक पदके त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. देशाच्या वीर सपूताचा अपघाती मृत्यू संपूर्ण देशाला चटका लावून गेला आहे.
लहानपणीच भारतीय लष्करात जाण्याचे स्वप्न
तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला. जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्वर पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मूळचे उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथील असलेल्या बिपिन रावत यांनी लहानपणीच भारतीय लष्करात जाण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचे बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेले. आपणही देशासाठी लष्करी सेवा द्यावी यासाठी बिपीन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. या अकादमीमधील त्यांची चमकदार कामिही पाहून त्यांना स्वार्ड ऑफ ऑनर हे पहिले सन्मानपत्र मिळाले. त्यानंतर बिपिन रावत यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर बिपिन रावत यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. १६ डिसेंबर १९७८ रोजी बिपिन यांचे लष्करात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांना भारतीय लष्कराच्या गोरखा १ रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये पहिल्यांदा लष्करी जवान म्हणून संधी मिळाली. इथूनच त्यांचा लष्करामधील कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. इथे त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केले. परदेशांमध्येही त्यांनी त्यांचे नेतृत्त्व कौशल्य दाखवून दिले. १३ वर्षांपूर्वी अशांत कांगोमध्ये ते कार्यरत होते. संयुक्त राष्ट्राच्या शांतता फौजेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यांनी या फौजेचा चेहरामोहरा बदलला. रावत यांना कांगोत तैनात करण्यात आले त्यावेळी तेथील शांतता फौजेकडे लोक संशयाने पाहायचे. लोकांच्या डोळ्यांत सैन्याबद्दलचा राग स्पष्ट दिसायचा. सैन्य येऊन आपल्या आयुष्यात काहीच बदल झालेला नाही, अशी लोकांची मानसिकता होती. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक व्हायची. ऑगस्ट २०१८ मध्ये रावत कांगोमध्ये पोहोचले. त्यावेळी ते ब्रिगेडियर होते. त्यांनी परिस्थिती लक्षात घेतली. नव्याने काम सुरू केले. बंडखोरांना वेसण घालण्यासाठी रावत यांच्या नेतृत्त्वाखालील सैन्याने बळाचा वापर सुरू केला. अशांत परिसरात मशीनगन्स आणि तोफा तैनात केल्या. सर्वसामान्य नागरिकांची सुटका केली आणि बंडखोरांनावर हल्ले करण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा कौशल्यपूर्ण वापर केला. लोकांच्या मनात असलेले सैन्याबद्दलचे गैरसमज दूर झाले. त्यांच्या मनात आशा निर्माण झाली. कांगो सैन्य आणि बंडखोर यांच्यामध्ये गोळीबार सुरू असताना ७ हजार जण अडकून पडले. सामान्य लोकांचा जीव धोक्यात सापडला. त्यांची यशस्वी सुटका रावत यांच्या नेतृत्त्वाखालील सैनिकांनी केली. लोकांच्या मनात सैन्याबद्दल आदराची भावना निर्माण करण्यात रावत यशस्वी ठरले.
देशातले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस)
लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झालेले जनरल बिपिन रावत हे देशातले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) होते. लष्कर, वायूदल आणि नौदल यांच्या कामकाजात समन्वय साधणे तसेच देशाची लष्करी ताकद वाढवणे, हे सीडीएसचे प्रमुख काम आहे. संरक्षणमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असल्यामुळे लष्कराच्या तीनही विभागातील कामांवर त्यांना लक्ष ठेवावे लागते. त्यांच्याकडे डिफेन्स एक्विजिशन कौन्सिल (डीएसी) आणि डिफेन्स प्लॅनिंग कमिशन (डीपीसी) या संरक्षण मंत्रालयातील महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी असते. संरक्षण मंत्रालयात ते लष्कर विभागाचे सचिव (डीएमए) असतात. त्यांच्या कार्यकाळात तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय साधण्याचे शिवधणुष्य त्यांनी लिलया पेलले. यामुळे आपला देश परकीय शक्तींशी समर्थपणे मुकाबला करु शकला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तांत्रिक बिघाडाची शक्यता वायुदलाकडून तपासण्यात येत आहे. या अपघाताचे नेमके कारण ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’तून समोर येईलच; परंतु देशातील सुरक्षित हेलिकॉप्टरचा अशा प्रकारे अपघात झाल्याने वायुदलातील अधिकारी व तज्ज्ञांनादेखील धक्का बसला आहे. कारण सर्वसाधारणत: एमआय १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येते. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिने असतात. या हेलिकॉप्टरसाठी उत्कृष्ट वैमानिकांची निवड होते व त्यांना अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर बारीक तपासणी होते. त्यासाठीदेखील वायुदलातील उत्कृष्ट कर्मचारी निवडण्यात येतात व त्यांच्याकडे मेंटेनन्सची जबाबदारी असते. इंजिन खराब झाले किंवा आपत्कालीन स्थिती आली तर सुरक्षित लँडिंग करण्याबाबत एमआय १७ व्ही ५ च्या वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा सरावदेखील होतो. वेळ कमी असताना प्रवाशांना कसे वाचवायचे, यात हे वैमानिक निपुण असतात. असे असतांनाही सीडीएस बिपिन रावत यांचा झालेला अपघाती मृत्यू निश्चितपणे चिंताजनक आहे. याचे कारण पुढे समोर येईलही मात्र आज आपण एका वीराला गमविले आहे, हेच अंतिम सत्य आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो!
Post a Comment