पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही!

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका टळल्यानंतर गत दोन महिन्यांपासून देशाची खर्‍या अर्थाने कोरोनापूर्व काळाकडे वाटचाल सुरु झाली असतांना ओमायक्रॉनची एन्ट्री झाली. कोरोनाच्या या विषाणूचा डेल्टापेक्षा कितीतरी अधिक पटीने फैलाव होत असल्याने अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये दैनंदिन लाखो रुग्ण आढळून येत आहेत. परिणामी तेथील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा कमालीचा ताण आला आहे. भारतामध्येही ओमायक्रॉनने हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याचे गत दोन दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतात घातलेल्या थैमानाच्या कटू आठवणी अजूनही अनेकांच्या स्मृतीतून गेल्या नसतांना आता ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणे अटळ मानले जात आहे. आयआयटी कानपूरच्या तज्ञांनी सांख्यिकी मॉडेलचा वापर करुन केलेल्या संशोधनानुसार, फेब्रुवारी महिन्यात तिसर्‍या लाटेचा पिकं परियड असेल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. या  पार्श्‍वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. यानंतर दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा क्रमांक आहे. यापार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तिसर्‍या लाटेच्या भीतीमुळे लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगानेही पुन्हा एकदा गती पकडली आहे. मात्र दुसरीकडे लोकांमध्ये बेफिकरीवृत्ती वाढली आहे. मास्क, फिजिकल डिस्टसिंग, सॅनेटायझर अनेकांच्या जीवनातून हद्दपार झाल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात सर्वत्र दिसून येत आहे. ही बेफिकरी तिसर्‍या लाटेला आमंत्रण देणारी ठरु शकते.



देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३६० वर

ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात शुक्रवारपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीलागू करण्यात आली आहे. राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळ ६ वाजेदरम्यान बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदीस्त सभागृहांमध्ये १०० पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असणार आहे. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते. उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहणार आहेत. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील. मध्य प्रदेश सरकारने रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ओमायक्रॉनबरोबरच करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले. यासह उत्तर प्रदेश सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ सरकारने लग्नामधील उपस्थितीवरही बंधने आणली आहेत. लग्नात २०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओमायक्रॉनमुळे उत्तर प्रदेश निवडणुकाही पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे. देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३६० वर पोहोचली आहे. केरळ, मिझोराममध्ये कोरोनाचा प्रसार मोठा असून त्यामुळे चिंता वाढली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, देशात अद्यापही डेल्टा विषाणूचाच अधिक प्रसार आहे. मात्र ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

.....तर मोठी किंमत चुकवावी लागेल

देशातील ३६० ओमायक्रॉन रुग्णांपैकी १८३ जणांच्या माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले. त्यातील ९१ टक्के लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते तर १२१ जणांनी विदेशवारी केली होती. यामुळे लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता भारताने पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मात्र दीड-दोन वर्षांनंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असतांना आता पुन्हा एकदा लॉकडाऊन परवडेल का? याचा विचार प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. आपला शेजारी देश असलेल्या चीनने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या शियान शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. चीनमधील शियान शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आली आहे. यावरुन लक्षात येते की ओमियोक्रॉनचे संकट किती घातक ठरणारे आहे. आजवरचा अनुभव पाहता युरोपमध्ये धुमाकुळ घतल्यानंतर कोरोना भारतात हातपाय पसरतो. आता सध्यस्थितीला कोरोनाची चौथी लाट संपूर्ण युरोपला विळखा घालून बसली आहे. यामुळे ती तिसर्या लाटेच्या रुपाने भारतात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपल्याकडे सर्वजण पूर्णपणे निर्धास्त व बेफिकीर झाल्याचे दिसून येत आहेत. जणू काही कोरोना नष्टच झाला आहे. या आविर्भावात जवळपास सर्वांनी आपला जीवनक्रम सुरु केला आहे. ही खरी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. कारण गत दोनवेळेचा अनुभव असाच काहिसा आहे. यामुळे किमान आता तरी भुतकाळात झालेल्या चुका टाळता येवू शकतात. युरोपात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर भारतानेही लवकरच सावध होऊन कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे याची कटाक्षाने अमंलबजावणी करावी लागेल. राजकीय नेत्यांनीही नजिकच्या काळात सभा, संमेलने घेणे टाळली पाहिजे. कारण आता जर आपण पुन्हा चुक केली तर त्याची आधीपेक्षा मोठी किंमत चुकवावी लागेल, याचे भान प्रत्येकाला ठेवावेच लागणार आहे.


Post a Comment

Designed By Blogger