ओमायक्रॉनला हरवू या...

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर देशातील परिस्थिती कोरोनापूर्व काळाप्रमाणे होत असतांनाच कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉननेे धडक दिली. विशेष बाब म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशात हा व्हेरिअंट नसल्याची घोषणा केल्यानंतर २४ तासातच बंगळुरूमध्ये दोन जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नवी दिल्ली, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये ओमायक्रॉन संशयित रुग्ण आढळून आल्याने धाकधुक वाढली आहे. ओमायक्रॉन हा जगभरात कहर माजवणार्‍या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अनेक पटीने म्युटेशन करणारा एक व्हेरिएंट आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत डेल्टा व्हेरिअंटने संपूर्ण भारतात थैमान घातले होते. आता तर ओमायक्रॉन डेल्टापेक्षा ५० पटीने घातक असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्‍वभूमीवर सर्वांनी जास्तीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दुसर्‍या लाटेदरम्यान अनेकांना भीतीपोटी पहिला डोस घेतला मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होतात अनेकांना दुसर्‍या डोसचा विसर पडला. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर यांना जीवनातून हद्दपार करण्यात आले. अशा प्रकारच्या बेफिकरीमुळे तिसर्‍या लाटेला आमंत्रण मिळाल्याशिवाय राहणार नाही, याचे प्रत्येकाने भान ठेवायला हवे.

गतकाळात केलेल्या चुका टाळाव्याच लागतील

कोरोना संकटाची तीव्रता कमी झाली असे वाटत असताना ओमायक्रॉनने धडक दिली. आतापर्यंत जवळपास ३० हून अधिक देशांमध्ये नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनमध्ये डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त म्युटेशन होते ज्यामुळे जगात दहशत निर्माण झाली आहे. २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत पहिला रुग्ण आढळून आल्यापासून आठवडाभरात भारत, अमेरिका, जर्मनी, फ्रान्ससह जगातील २९ देशांमध्ये ओमाक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. कोविड-१९ विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या जलद म्युटेशनमुळे संपूर्ण जगाला काळजीत टाकले आहे. हा नवीन व्हेरिएंट डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जाते. यापार्श्‍वभूमीवर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे लसीकरणात काही बदल करण्याची गरज आहे का? कोरोना लसीचा बुस्टर डोस किंवा तिसर्‍या डोसची गरज आहे का? लहान मुलांचे लसीकरण सुरु झालेले नाही, त्यामुळे या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी त्यांचे लसीकरण तात्काळ सुरु करण्याची गरज आहे का? यांसारखे अनेक प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने नव्या व्हेरिएंटबद्दल एक दिलासादायक माहिती दिली आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधात वापरले गेलेले उपायच नव्या व्हेरिएंटविरुद्धच्या लढ्याचा पाया असतील, असे डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटप्रमाणे, ज्या लोकांनी अद्याप कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही त्यांना ओमायक्रॉनच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. जर ओमायक्रॉनची लागण लसीकरण केलेल्या लोकांना होऊ शकते, तर ज्या लोकांनी कोरोनाचा एकच डोस घेतला आहे किंवा अद्याप एकही डोस घेतलेला नाही त्यांना त्याचा संसर्ग होण्याचा धोका कितीतरी पटीने जास्त आहे. भारतातील केवळ ३२ टक्के लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होणे ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. भारतात सुमारे १२० कोटी लोक असे आहेत ज्यांनी दुसर्‍या डोसची तारीख उलटून गेल्यानंतरही लसीकरण केलेले नाही. ओमायक्रॉनसारखा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट पसरल्यावर अशा लोकांचा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो. दुसरी आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे, भारतात दुसरी लाट आली तेव्हा प्रशासन त्यासाठी तयार नव्हते. हॉस्पिटल बेड असो की व्हेंटिलेटर, औषधी आणि ऑक्सिजन. सर्वांची कमतरता असल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. ही चुक पुन्हा करुन चालणार नाही. ओमायक्रॉन किती घातक आहे, याची पुर्व कल्पना डब्लूएचओसह अनेक शास्त्रज्ञांनी दिली आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला गाफिल राहून चालणार नाही. गतकाळात केलेल्या चुका यावेळी टाळाव्याच लागतील. 

नव्या विषाणूचाही आपला देश समर्थपणे सामना करील

लॅन्सेटच्या अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की एप्रिल-मे २०२१ मध्ये भारतात कोविडच्या दुसर्‍या लाटेसाठी जबाबदार असलेल्या डेल्टा व्हेरिएंटवर कोविडशिल्ड लस खूप प्रभावी होती. भारतासाठी ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत. त्यापैकी एक म्हणजे, भारतातील कोरोनाचे हा नवीन व्हेरिएंट ओळखण्यासाठी आवश्यक असलेल्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अत्यंत संथ गतीमुळे ओमायक्रॉन ओळखणे देखील कठीण होऊ शकते. आता ओमायक्रॉनचा शोध तातडीने लावता येणार नसल्यामुळे त्याला रोखणेही तितकेच कठीण जाणार आहे. अशा परिस्थितीत देशात आणखी एक कोरोना लाट येण्याची शक्यता आहे. भारतातील दुसरी लाट डेल्टामुळे आली होती. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कितीतरी पटीने जास्त संसर्गजन्य असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत, जीनोम सिक्वेन्सिंग वाढविल्याशिवाय ओमायक्रॉन नियंत्रित करणे कठीण होईल. सध्या ओमायक्रॉनवर अस्तित्वात असलेल्या लसींच्या परिणामावर कोणतेही संशोधन नसले तरी, या व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये ३० पेक्षा जास्त म्युटेशनमुळे सध्याच्या लसीकमी प्रभावी किंवा पूर्णपणे कुचकामी ठरत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. बहुतेक लसी स्पाइक प्रोटीनच्या विरूद्धच अँटीबॉडी तयार करतात, परंतु ओमायक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये तीव्र म्युटेशनच्या क्षमतेमुळे सध्याची लस त्याविरूद्ध अप्रभावी ठरू शकते. तर सध्याच्या लसीच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी ओमायक्रॉनवर संशोधन सुरू आहे आणि या नवीन प्रकारावर लस किती प्रभावी ठरेल हे काही दिवसांत कळेल. ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कितीही उपाययोजना केल्या तरी त्या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी जनतेच्या सहकार्याचीही मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविडविषयक जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा अधिक धोकादायक नसला तरी डेल्टाच्या तुलनेत त्याचा प्रसार झपाट्याने होतो, ही बाबही नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणूनच समाजामध्ये वावरताना सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, या सोप्या वाटणार्‍या; पण कृतीत आणण्यासाठी अवघड असलेल्या नियमांचे नागरिकांनी गांभीर्याने पालन करणे गरजेचे आहे. ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव भारतात झाल्याचे पाहून धसका घेण्याचे वा घाबरून जाण्याचे कारण नाही. याबाबत सोशल मीडियावर अफावांचे पेव फुटले असल्याने सर्वसामान्यांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. अनेक जण लॉकडाऊनबाबत खोटे मेसेज व्हायरल करत आहेत. मात्र अनेकांच्या जीवनाच्या अर्थकारणाचा गाडा आताकुठेतरी पूर्वपदावर येत असतांना पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही, याची जाणीव सरकारला देखील आहे. कोरोनाच्या विविध विषाणूंचा गेल्या दीड वर्षांमध्ये भारताने मुकाबला केला आहे. तसेच, या नव्या विषाणूचाही आपला देश समर्थपणे सामना करील, यात कोणतीही शंका नाही.

Post a Comment

Designed By Blogger