एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यासाठी गेल्या ११ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्य शासनाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने एक समिती स्थापन करण्याचा जीआर काढला आहे. मात्र, हा जीआर अमान्य असल्याचे सांगत एसटी कर्मचार्यांनी आपण संपावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. ३६ एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्यानंतरही संपावर तोडगा काढण्यास राज्य शासनाला अपयश आल्यानंतर आताही संप अधिक चिघळण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. एकीकडे एसटी बंद दुसरीकडे रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. अन्य प्रवाशी रेल्वेत रिर्झवेशनशिवाय प्रवास करता येत नाही. हिच संधी साधत खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे तिन ते चार पट वाढवून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांना विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांना वार्यावर सोडण्यात आले आहे. याबद्दल लोकप्रतिनीधीही बोलायला तयार होत नाहीत, हेच मोठे दुर्दव्य आहे.
प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल
एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या बस सेवा ठप्प आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिणीकरण करण्यात यावे या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दिवाळी, भाऊबीज सणाच्या निमित्ताने बाहेरगावी जाणार्यांची संख्या मोठी असते. मात्र नेमके याच वेळी एसटी कर्मचार्यांनी संपाचे हत्यार उपसले. हा संप हाताळण्यात राज्य शासनाला सपशेल अपयश आले आहे. मुंबईतील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी लोकलचे दरवाजे सर्वांसाठी काही अटीशर्ती टाकून खुले केले असले तरी हाच नियम राज्यात धावणार्या रेल्वे पॅसेंजरसाठी लावण्यात आलेला नाही. राज्यात कोरोनाचा वेग मंदावत असल्याने निर्बंध शिथिल होत आहेत मात्र २४ मार्च २०२० पासून बंद असलेली नियमित रेल्वेसेवा अन्यापही पुर्ववत झालेली नाही. विशेष रेल्वेच्या नावाखाली लांब पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे नियमित धावत आहेत. मात्र केवळ लोकल आणि पॅसेंजर गाड्यांचे दरवाजे अद्यापही बंदच आहेत. लोकल आणि पॅसेंजर गाड्यांमुळे कोरोनाचा फैलाव होईल, असा अजब युक्तवाद राज्य सरकार करत आहे. गत वर्षभरापासून विशेष रेल्वेच्या नावावर भाडेवाढ करून लोकांच्या खिशातून पैसा काढला जात आहे. विशेष रेल्वेच्या नावाखाली चालवण्यात येणार्या ट्रेनमध्ये विशेष असे काहीच नाही. डबे तेच, सुविधाही त्याच आणि वेगही तेवढाच आहे. विशेष म्हणजे या गाड्यांची वेळही साध्या रेल्वेच्याच आहे. राज्य आणि देशात सर्वकाही अनलॉक होत असतांना रेल्वेचा निर्णय कधी अनलॉक होईल, याकडे प्रवाशांचे लक्ष आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने अपडाउन करणार्या हजारो, लाखो नागरिकांना जादा भाडे मोजावे लागत आहे. अन्य काळाच्या तुलनेत त्यांना जादा भाडे मोजावे लागत आहे. या रेल्वे गरीब, मध्यमवर्गीयांसाठी मोठा आधार होत्या. मात्र भाडेवाढ करण्यासाठी रेल्वेने कोरोना काळाची संधी साधली. यात रेल्वेला चांगला लाभ मिळत असल्याने विशेष रेल्वेची व्यवस्था आणखी काही दिवस सुरू ठेवण्याचा विचार दिसत आहे.
एकीकडे अनलॉक आणि दुसरीकडे रेल्वे, एसटीची दारे लॉक
कोरोना काळानंतर नोकरी आणि व्यवसायाला पूर्वपदावर आणण्यासाठी सामान्य नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु रेल्वे अधिकार्यांचे सर्वसामान्यांशी काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे सर्वसमान्यांच्या पॅसेंजर ट्रेन्स अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली तेंव्हापासून नाशिक देवळाली शटलसह भुसावळ विभागातील अनेक पॅसेंजर गाड्या बंद आहेत. यामुळे सर्वसामान्यांना असंख्य अडचणींचा सामना करत मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. जसे मुंबई व उपनगरातील चाकरमन्यांचा विचार करुन लोकल सेवा सुरु करण्यात आली तसाच विचार उत्तर महाराष्ट्रातील चाकरमन्यांबाबत करायला हवा. नाशिक ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमाने पोटापाण्यासाठी दररोज प्रवास करतात. त्यांच्यासाठी नाशिक देवळाली - भुसावळ शटलसह अन्य पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची आवश्यकता आहे. पॅसेंजर गाड्यांमुळे केवळ चकारमन्यांचीच प्रश्न सुटणार नसून सर्वसामान्यांच्याही प्रवासाची सोय होणार आहे. चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे. गत दीड वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सेवेअभावी नोकरदारांचे हाल सुरू आहेत. आता सर्वच खासगी कार्यालये नियमित सुरु झाल्याने सर्व चाकरमन्यांची प्रचंड तारांबळ उडत आहे. सर्वसामान्य प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामुळे रेल्वेने आतातरी प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे. या विभागांतर्गत नाशिक देवळाली शटलसह भुसावळ-मुंबई पॅसेंजर या दोन गाड्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळे या गाड्या त्वरीत सुरु होण्याची अपेक्षा आहे. याचा राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने विचार करण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांच्या गैरसोईकडे लोकप्रतिनिधींचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. रेल्वे बंद असतांना एसटीचा मोठा दिलासा होता मात्र आता संपामुळे एसटीदेखील बंद पडल्या आहेत. सरकार एकीकडे अनलॉकचा नारा देते आणि दुसरीकडे रेल्वे, एसटीची दारे लॉक करुन ठेवते, याला काय म्हणायचे? आता याचा उद्रेक झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने आता अन्य वाहनांनाही प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. शालेय बस, कंपनीच्या बस आणि खासगी बससह मालवाहतूक करणार्या खासगी वाहनांना प्रवाशांची ने आण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तब्बल २०-२५ हजार बस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार होणार असल्याचा दावा करण्यात येत असला तरी याचा खरचं प्रवाशांना कितपत फायदा होईल, यात शंकाच आहे. यामुळे किमान आतातरी राज्य शासनाने धरसोड आणि सोईस्कर धोरणांना थोडेसे बाजूला ठेवून राज्यात सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पॅसेंजरसह एसटीची सेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.
Post a Comment