मुर्दाड प्रशासकीय यंत्रणा अजून किती बळी घेणार?

अहमदनगरमध्ये झालेल्या आगीच्या घटनेने महाराष्ट्र हदरुन गेला. जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ११ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, तर तर अनेकजण होरपळले आहेत. राज्यात कोरोनाच्या काळात रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकवेळी फायर ऑडीटची घोषणा झाली आहे. नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. रुग्णालयांमध्ये दुघर्टना किंवा अपघात झाल्यावर प्रत्येकवेळी नुकसान भरपाई जाहीर करणे, फायर ऑडीची घोषणा करणे, दोन-चार जणांवर नावापुरता कारवाई केल्याचे नाटक करणे, असे काहीसे प्रकार गत वर्षभरापासून सातत्याने घडत आहेत. मात्र मुर्दाड यंत्रणेच्या या अक्षम्य दुर्लक्षाची किंमत सर्वसामान्य रुग्णाला स्वत:चा जीव देवून चुकवावी लागत आहे. सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दृष्टीने मानवी जीवन किती स्वस्त आहे, हे अहमदनगरमधील घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. 



दुर्घटना टाळण्यात राज्याचे आरोग्य खाते पूर्णपणे अपयशी 

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यूमुखी पडणार्‍यांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता पण कोव्हिड सेंटर किंवा रुग्णालयांमध्ये घडणार्‍या अपघातांमुळेही मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्याही राज्यातच जास्त आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी रुग्णालयांचा आग लागून निष्पाप जीवांचा बळी जाण्याची मालिका अजूनही संपायचे नाव घेत नाही. ऐन दिवाळीत शनिवारी अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत ११ जणांचा जीव गेला आहे. आग लागली तेंव्हा रुग्णालयात १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. मात्र अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यात राज्याचे आरोग्य खाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. कारण अहमदनगर मध्ये घडलेली अशा प्रकारची पहिली घटना नक्कीच नाही. कोरोना काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत. २३ एप्रिल २०२१ रोजी विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मध्यरात्री आग लागून त्यात १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. २१ एप्रिल रोजी नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिसजन गळतीच्या घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला होता. ९ एप्रिलला नागपुरात वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २६ मार्चला मुंबईतील भांडूपमधील कोविड रुग्णालयात आग लागून आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ९ जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा येथे घडली होती. येथेही रुग्णालयात आग लागून निष्पापांचा जीव जाण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये उपचारासाठी आलेल्या शेकडो निष्पापांचे बळी गेले आहेत. घटना घडल्यानंतर फाअर ऑडीटची घोषणा होते, मृतांच्या परिवाराला मदत दिली जाते. दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिले जाते. राजकीय आरोप-प्रत्यारोप होतात आणि कालांतराने त्या घटनेचा सर्वांना विसर पडतो. आतापर्यंत विविध ठिकाणच्या अग्निकांडांमधून आपण काहीच धडा घेतला नाही आणि आगीपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, हे अहमदनगर मधील घटनेतून स्पष्ट झाले आहे. 

मुर्दाड प्रशासकीय यंत्रणेवर मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ

लोक जिथे जीव वाचविण्यासाठी येतात, तिथे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू व्हावा, ही बेफिकिरीची पराकाष्ठा म्हणावी लागेल. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणेने राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांसह आरोग्य संस्थांचे फायर सेफ्टी ऑडिट तसेज इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. राज्यातील सर्व रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच अन्य आरोग्य संस्थांचे फायर सेफ्टी ऑडिट त्वरित करावे. सरकारी रुग्णालयांसह अन्य आरोग्य संस्थांमध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयू), एचडीयू, एसएनसीयू, ऑक्सिजन युनिट, इतर कक्षांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या वैद्यकीय विद्युत उपकरणांचे इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करून घेण्यात यावे. जिल्हा अग्निशामन प्राधिकरणांच्या मदतीने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये फायर सेफ्टीच्या अनुषंगाने कर्मचार्यांचे फायर सेफ्टीबाबत प्रशिक्षण घेण्यात यावे; तसेच वर्षातून एकदा मॉक ड्रिल करण्यात यावा, असेही निर्देशही देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या. आतापर्यंत विविध ठिकाणी कोव्हिड रुग्णालयांमध्ये झालेल्या अग्निकांडांमधून आपण काहीच धडा घेतला नाही आणि आगीपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, हे अहमदनगरमध्ये घडलेल्या दुर्घटनेतून स्पष्ट झाले आहे. आरोग्य व्यवस्थापन व प्रशासकीय पातळीवर भ्रष्टाचाराचा व्हायरस किती मोठ्याप्रमाणात पसरला आहे, हे देखील अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे अधोरेखीत होते. याच भ्रष्टाचाराची किंमत लोकांना आपल्या प्राणांनी चुकती करावी लागत आहे.  भंडारा, नागपूर, नाशिक, मुंबई, विरार आणि आता अहमदनगर या घटना अतिशय गंभीर आहेत. अशा घटनांच्या मुळाशी जात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आता पुढच्या काळात कालबद्ध कार्यक्रम आखून फायर ऑडिट करावे लागणार आहे. आधीच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर सारखीच परिस्थिती दिसून येते. आरोग्य व्यवस्थाच आजारी पडल्याने देशातील लाखों निष्पाप जीवांना प्राण गमवावे लागले आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. यासाठी दरवेळप्रमाणे एखादी दुर्घटना घडली की, केवळ दरवेळेचे शासकीय सोपास्कार न करता या मुर्दाड प्रशासकीय यंत्रणेवर मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ येवून ठेपली आहे. जर ही शस्त्रक्रिया वेळीच केली नाही तर अशा प्रकारच्या घटना घडतच राहतील! 


Post a Comment

Designed By Blogger