मंदीचे मळभ हटले

देशात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बर्‍यापैकी ओसरली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाची भयावहता विसरून देश दिवाळीचा उत्साह साजरा करण्यात गुंतला आहे. यावेळी धनत्रयोदशीला तब्बल १५ टन सोन्याचे दागिने, बार आणि नाण्यांची विक्री झाली. धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा सराफा व्यवसाय झाल्याचा अंदाज आहे. यासह वाहन विक्रीही टॉप गिअरमध्ये आहे. लहान व्यापार्‍यांपासून मोठं मोठ्या पंचतारांकित शोरुममध्ये दिसणारी गर्दी निश्‍चितपणे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याचे संकेत आहेत. देशात होत असलेले विक्रमी लसीकरण आणि देशातील पारंपारिक सणांची रेलचेल या दोन प्रमुख कारणांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात गत दीड वर्षांपासून भरडल्या जाणार्‍या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाल्यासारखी परिस्थिती आहे. असे असले तरी कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. याचे भान देखील दिवाळीच्या उत्साहात ठेवावे लागणार आहे. कारण गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढला तर तिसरी लाट येणे अटळ आहे. तसे झाले तर पुन्हा लॉकडाऊनचे संकट ओढावू शकते, जे परवडणारे नाही.



भारतीय अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येण्याचे संकेत 

गेल्या वर्षभरापासून जागतिकस्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याने त्याचे एकामागून एक हादरे जागतिक अर्थव्यवस्थेला बसत आहेत. मार्च २०२०मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे बर्‍याच क्षेत्राचे नुकसान झाले. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे बहुतांश उद्योगधंदे बंद असल्याने अर्थचक्रही मंदावले होते. यामुळे देशाची आर्थिक व्यवस्थ्या पूर्णपणे कोलमडून पडली. याकाळात जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांकडे पाहता भारतात सर्वात मोठी घसरण झाली. भारतातील इतक्या मोठ्या घसरणीकडे पाहता वर्षभर अर्थव्यवस्था निगेटिव्ह झोनमध्ये राहण्याची शक्यता अर्थतज्ञ व्यक्त करत असले तरी, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना भारतीय अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून अर्थव्यस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या मदत पॅकेजची घोषणा करत छोट्या व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. सरकारने देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी दूरसंचार, वाहन आणि औषधांसह १० प्रमुख क्षेत्रांच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेला मान्यता दिली. पुढच्या ५ वर्षांमध्ये या योजनेसाठी तब्बल २ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची घोषणाही केली होती. यातून बाहेर पडत असतांना देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धडक दिली. यामुळे देशातील काही भागात पुन्हा लागू करण्यात आलेल्या कठोर टाळेबंदी निर्बंधांमुळे आर्थिक हालचाली आणखी मंदावल्या. यातून सावरण्यासाठी आयबीआयने दिलासादायक घोषणा करत अर्थव्यवस्थेला बूस्टर डोसच देण्याचा प्रयत्न केला. आरोग्य क्षेत्रासाठी ठोस घोषणा करतांना अन्य क्षेत्रांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न आरबीआयने केला. तरीही मध्यंतरीच्या काळात अर्थव्यवस्था अनिश्‍चिततेच्या लाटेवर हेलकावे खात होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तसेच तिसरी लाटेची शक्यता कमी होत गेल्यानंतर खर्‍या अर्थाने अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. 

लागोपाठ येणार्‍या सणांमुळे बाजारपेठ फुलली

गणेशोत्सव, नवरात्री, दसरा आणि आता दिवाळी असे लागोपाठ येणार्‍या सणांमुळे बाजारपेठ फुलली आणि त्याची मदत मंदीत रुतलेले चक्र फिरण्यासाठी झाली. यावेळी धनत्रयोदशीला तब्बल १५ टन सोन्याचे दागिने, बार आणि नाण्यांची विक्री झाल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे म्हणणे आहे. धनत्रयोदशीचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. त्यामुळे या दिवशी ज्वेलरीची खूप विक्री झाली आहे. सोने आणि ज्वेलरीची विक्री पुढे अजून वाढणार आहे. कारण नोव्हेंबरच्या मध्यापासून लग्नांचा हंगाम सुरू होईल. सध्या सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ८ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला आहे. कोविड-१९ चे रुग्ण कमी झाल्यामुळे ग्राहकांचे सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाले आहेत. यावर्षी जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये देशात सोन्याच्या मागणीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर सातत्याने व्यवसाय वाढत आहे. कॉन्फेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सांगितले की, दागिने उद्योग कोरोनाच्या साथीमुळे आलेल्या मंदीमधून आता सावरला आहे. कॅटने सांगितले की, धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांची विक्री झाली सुमारे १५ सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली. यामध्ये दिल्लीत १ हजार कोटी रुपये, महाराष्ट्रात १ हजार ५०० कोटी रुपये, उत्तर प्रदेशात ६०० कोटी रुपयांची अंदाजे विक्री झाली. तर दक्षिण भारतामध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांची विक्री झाली. हा मोठा सकारात्मत संकेत आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी टप्प्याटप्प्याने विविध परवानग्या दिल्या. वर्षभर मोठ्या आर्थिक झळा सहन केलेल्या सर्वांचीच घडी आता बसू लागली आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला व लॉकडाऊनमध्ये उद्योगांची चाके थांबली. त्यामुळे कधी नव्हे एवढे कामगार, मजुरांचे स्थलांतर झाले. शिवाय उद्योगांचीही घडी विस्कटली. यातून सावरत असताना मजूरही पुन्हा परतले व उद्योगांनी वेग घेतला. मात्र आता कोरोना वाढून पुन्हा उद्योग बंद ठेवायचे म्हटल्यास ते कोणालाही परवडणारे नाही, याची जाणीव सर्वांनाच आहे मात्र तरीही सार्वजनिक ठिकाणी वावरतांना बेफिकरी वाढली आहे. दिवाळीचा सण साजार करतांना प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना विरुध्द सुरु असलेले युध्द अजूनही संपलेले नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला काही होणार नाही, माझी रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, अशा भ्रमात न राहणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सर्वकाही राज्य व केंद्र सरकारवर ढकलून चालणार नाही. यामुळे दिवाळीचा सण साजरा करतांना सर्वांनी काळजी घेवूयात, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...

Post a Comment

Designed By Blogger