दिवाळीच्या उत्साहात बेफिकरी नको!

सोमवारी वसुबारसपासून दिवाळी सणाला प्रारंभ झाला असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. गेल्या वर्षाची दिवाळी कोरोनाच्या सावटाखालीच गेली. यामुळे गतवर्षी दिवाळी साजरी झाली, असे वाटलेच नाही. लॉकडाऊनमुळे व्यापारही ठप्पच होता. यंदा परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, लसीकरणामुळे तिसर्‍या लाटेचीही शक्यता कमी आहे. यामुळे यंदा दिवाळीचा उत्साह ओसांडून वाहतांना दिसत आहे. शनिवार व रविवारी बाजारपेठांमध्ये दिसलेली गर्दी याचे बोलके उदाहरण होते. दिवाळीचा उत्साहच एवढा जबरदस्त आहे की काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा उच्छाद सुरु होता याचाही अनेकांना विसर पडला आहे. पण असा हलगर्जीपणा करू नका आणि बाजारपेठेत गर्दी करू नका. कारण नुकत्याच मिळालेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचा उच्छाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये मागच्या २४ तासांत एकूण १४, ३४८ नवे कोरोना रूग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या मागच्या २४ तासांत बरीच वर गेली असून एका दिवसात तब्बल ८०५ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. त्यामुळेच तर दिवाळीची खरेदी करण्यासाठी जेव्हा बाहेर जाता, तेव्हा काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. जान है तो जहान है

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, पॉझिटिव्हिटी दर कमी होत असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाबाबत जिल्हावार आढावा घेऊन बिगिन अगेनचा नारा दिला आहे. एप्रिल आणि मे महिन्यास संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी, कोट्यवधी जणांना बाधित करणारी आणि लाखो जणांचा बळी घेणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बर्‍यापैकी ओसरल्याचे चित्र आहे. दहीहंडी, ईद, गणेशोत्सव, नवरात्री, दसर्‍यासारखे महत्वाचे सण पार पडल्यानंतरही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीला समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे संपूर्ण देशाला दिलासा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. महाराष्ट्रातही अहमदनगर वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात दिसून येत आहे. आगामी काही दिवस आव्हाने कायम राहणार आहेत. देशासह महाराष्ट्रातही विक्रमी वेगाने लसीकरण होत असल्याने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका टळण्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. सध्यस्थितीत राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. राज्यातील महाविद्यालये, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, म्युझमेंट पार्क खुले झाले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कधीपासून वाढविणार याची तारीख जाहीर झालेली नाही. एक-दोन दिवसांत त्याच्या मार्गदर्शक सूचना जारी होतील. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना आटोक्यात असल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. दिवाळीनंतर १५ दिवसांनी त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा टास्क फोर्स घेईल आणि निर्बंध नेहमीसाठी हटवायचे का, यावर पुन्हा एकदा विचारविनिमय करण्यात येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, शाळा नुकत्याच सुरू झाल्याने, त्यातही काही शाळांच्या परीक्षा नुकत्याच झाल्या. काहींच्या सुरू आहेत. तर काहींच्या दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर केले आहे. अद्यापही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, हे सर्वांनी लक्षात घेऊन कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. आजही बाजारात विनाकारण होणारी गर्दी, रस्त्यांवर फिरणारे रिकामटेकडे यांना वेळीच रोखले नाही तर परिस्थिती अजून खराब होवू शकते. लॉकडाऊन व कडक निर्बंधांमुळे अर्थकारणाला खीळ बसली आहे, हे जरी खरे असले तरी ‘जान है तो जहान है’ हे लक्षात ठेवावे. 

...नाहीतर तिसर्‍या लाटेत मोठे आव्हान

सध्या लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी मार्केटमध्ये उसळणारी गर्दी धोक्याची घंटा असेल. हे चित्र असेच असले तर तिसर्‍या लाटेला आमंत्रण दिल्या सारखे होईल, याचे भान प्रत्येकाने ठेवण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांनाही धोका असल्याचे सांगण्यात येत असल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. डबल म्युटेशनमुळे राज्यात संसर्गाचा प्रसार तीव्रतेने झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे आगामी काळात गाफिल राहून चालणार नाही. पहिल्या लाटेदरम्यान दुसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आला होता मात्र केंद्र सरकार, राज्य सरकारसह सर्वच जण गाफिल राहिल्याने आता दुसर्‍या लाटेत त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. गेल्या वर्षी संसर्ग हा विविध सण उत्सवानंतर वाढला होता, यावेळेस ही दुसरी लाट सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरे म्हणजे म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे नाहीतर तिसर्‍या लाटेत मोठे आव्हान उभे राहू शकते. यामुळे दिवाळीच्या उत्साहात बेफिकरी करुन चालणार नाही. बाजारात खरेदी करण्यासाठी बाहेर पडतांना मास्कचा वापर करायलाच हवा. दुसरी बाब म्हणजे, यावर्षी फटाके उडवताना विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झालेली असते. किंवा ज्यांना श्वसनाचा विकार आहे, त्यांना फटाक्यांच्या धुराचा खूप त्रास होतो. त्यांना मोठा आवाजही सहन होत नाही. या सर्वांचे फटाके उडवताना भान ठेवले पाहिजे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांना आपल्या आप्तेष्टांना गमविले आहे. त्यांच्यावरील दु:खाचे जाणीव व भान ठेवण्याची आवश्यकता आहे. दिवाळी हा सण प्रकाशचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवाळीत दुसर्‍यांच्या दु:खात, संकटात आपल्याला प्रकाश दाखविता येईल का? याचा प्रत्येकाने विचार करुनच दिवाळीचा सण साजरा करण्याची आवश्यकता आहे. आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


Post a Comment

Designed By Blogger