दुरितांचे तिमिर जावो

दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा सण, पणत्या, आकाशकंदील, फराळाची देवाण-घेवाण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदाची उधळण करणारा हा सण आहे. आज वसूबारसने दिवाळीच्या आनंददायी पर्वाला सुरुवात होत आहे. मंगळवारी धनत्रयोदशी, गुरुवारी लक्ष्मीपूजन, शुक्रवारी पाडवा व शनिवारी भाऊबीज अशी दिवाळीची धामधूम असेल. यंदाची दिवाळी गतवर्षाच्या दिवाळीपेक्षा पूर्ण वेगळी आहे. गत वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात अडकून पडलेल्यांना प्रगतीचा मार्ग खुला करण्याचा सण म्हणून यंदाच्या दिवाळीला विशेष महत्त्व आहे. देशाचे अर्थचक्र मंदीच्या चक्रव्ह्यूवात रुतले आहे. या दिवाळीत अर्थचक्राला गती मिळेल अशी आशा सर्वसामान्यांना आहे. साधारणत: दीड वर्षांपासून अनेकांच्या जीवनात अंधकार पसरला आहे व अंध:कारावर मात करणार्‍या या दीपोत्सवाचा प्रारंभ हा निश्चितच आनंददायी आहे. देशभरात विक्रमी लसीकरण होत असल्याने कोरोनाची तीव्रता कमी होताना दिसत आहे. असे असले तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याचा धोका असल्याची चिंताजनक बाब अनेक तज्ञांनी अधोरेखीत केली आहे. यामुळे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करतांना तिसर्‍या लाटेला आमंत्रण मिळणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. गतवर्षाप्रमाणे यंदा फटाकेबंदीचा गोंधळ नाही, ही देखील स्वागताहार्य बाब म्हणावी लागेल.



यंदाची दिवाळी अनेक अर्थांनी वेगळी 

दीपावली हा आपल्या देशातील सर्वांत मोठा सण. दिवाळीचा हा सण प्रकाशपर्व म्हणून ओळखले जाते. या दिवसांत सगळीकडे दिवे लावले जातात. दीप हे मानवमात्राला उर्जा व प्रकाश देऊन त्यांचे जीवन सुखदायी करतात. म्हणूनच दिव्याला आपल्या संस्कृतीमध्ये असाधारण महत्त्व आहे. आश्‍विन कृष्ण द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत साजरा केला जाणारा लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात अंधःकाराला दूर करण्याचा सण म्हणजे हा दिवाळी सण. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या विविध दिवसात दिवाळी सणाच्या परंपरा, संस्कार सामावलेले आहेत. हा दीपोत्सव सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे तीच ही दिवाळी. दुसर्‍या एका पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे. एका कथेनुसार, देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. तर  एका कथेनुसार, बळी नावाच्या बलाढ्य राजाला पाताळात दडपण्यासाठी विष्णूच्या वामनावताराने आश्‍विन वद्य त्रयोदशीचा मुहूर्त निवडला, तीच ही दिवाळी, असे कितीतरी संदर्भ दिले जातात. दुर्दैवाने आज या सणवारांनाही इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने त्यांच्या मूळ उद्देशांपासून आम्ही केव्हाच भरकटलो आहोत, हा भाग वेगळाच! कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साजरी होत असलेली यंदाची दिवाळी अनेक अर्थांनी वेगळी आहे. देशात लॉकडाउन शिथिल झाले असले तरी कोरोना अजून संपलेला नाही. मात्र देशभरात कोरोनाचा आलेख घसरत असल्याने शाळा-महाविद्यालये, मंदिरे, चित्रपटगृहांसह जवळपास सर्व व्यापार-व्यवहार सुरु झाले आहेत. परंतू या शिथिलीकरणात काही नियमांचे सर्वांनी कडक पालन करायचे असताना बहुतांश नागरिकांचे त्याकडे दुर्लक्ष होतेय. हे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेस निमंत्रण ठरु शकते. सध्या दिवाळीच्या निमित्ताने बाजारात उसळलेली गर्दी ही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रण देणारी आहे. 

दिवाळीचा हा उर्जेचा सण नकारात्मकतेवर मात करणारा सण 

युरोपात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. चीन आणि रशियामध्ये अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. इतकेच काय तर भारतात महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याने चिंता वाढली आहे. दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल. आता कुठे सर्वकाही सुरळीत होवून अर्थकारणाची गाडी रुळावर येत असतांना पुन्हा एकदा लाकडाऊन कुणालाही परवडणार नाही. लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात अर्थव्यवस्था भरडली जावून त्याचे फटके सर्वसामान्यांना बसले आहेत. आता पुन्हा त्याच मार्गावर जायचे नसेल तर प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एकीकडे दिवाळीचा आनंद आपण घेणार असलो, तरी दुसरीकडे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, तुमचा - आपला सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत हे आपण विसरता कामा नये. पुढील तीन महिने हिवाळ्याचा म्हणजे थंडीचा काळ आहे. थंड वातावरणात कोरोना विषाणू अधिक सक्रीय असतो आणि त्याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यातच दिवाळीतील फटाक्यांमुळे प्रदुषणही बर्‍यापैकी वाढलेले असते. वाढत्या प्रदुषणात अनेकांना श्‍वसनाचे आजार होतात. अशावेळी पुढील तीन ते चार महिने आव्हानात्मक असून या काळात सर्वांनी अधिक काळजी घ्यायला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार सद्यस्थितीत भारतात वायुप्रदूषणाने दरमिनिटाला दोघांचा मृत्यू होतो. त्यातही महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रदूषित राज्य असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. यामुळे फटाक्यांवर मतभेदांची आतषबाजी न करता निखळ आनंद लुटायला हवा. कोरोनामुळे अनेकांना आपल्या जीवलगांना गमवावे लागले आहे. याकरीता स्वत:चा आनंद साजरा करताना त्यांच्या दुख:चेही स्मरण ठेवण्याची आवश्यकता आहे. दिवाळीचा हा उर्जेचा सण नकारात्मकतेवर मात करणारा सण आहे. याकारिता या सणानिमित्ताने मनातील सर्व कटूता जमीनीत गाडून टाकून अथवा आगीत भस्म करुन टाकण्याचा संकल्प प्रत्येकाने करावयाचा आहे. कोरोनाचे संकट यथावकाश संपेल परंतु त्यानंतरही आव्हानांची मालिका समोर उभी असणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येवून या समस्यारुपी असूरांचा नाश करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. ही दिवाळी आपणा सर्वांना आनंदाची, आरोग्यदायी व सुखासमाधानाची जावो, हिच ईश्‍वर चरणी प्रार्थना...

Post a Comment

Designed By Blogger