दिवाळीतील फटाक्यांमुळे हवा प्रदूषणाचा मुद्दा दरवर्षी चर्चेत असतो. या प्रदूषणामुळे कुणावर किती परिणाम होतो? हा जरी वादाचा मुद्दा असला तरी यावेळी दिवाळीनंतर फुटणार्या राजकीय फटक्यांनी मोठ्याप्रमाणात वैचारिक प्रदूषणाची पातळी नक्कीच वाढलेली दिसत आहे. मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूडचा स्टार किंगखान शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर हे प्रकरण एनसीबी विरुध्द राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक असेच रंगले. आरोप-प्रत्यारोपांचा हा सामना सुरुवातीला भाजपकडे वळल्यानंतर आता थेट माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ येवून ठेपला आहे. दिवाळीच्या आधी मलिकांनी फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर तुम्ही लंवगी फटाका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्याप्रमाणे फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मलिकांबाबत मोठा बॉम्ब फोडला. नवाब मलिकांनी १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन विकत घेतली. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर मलिकांनी फडणवीसांविरोधात हायट्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे सांगत राज्यात बनावट नोटांच्या व्यवसायाला फडणवीसांनी संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. या दररोजच सुरु असलेल्या या राजकीय फटाकेबाजीमुळे सर्वसामान्यांच्या कानठळ्या बसत आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहेत. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत जमीन व्यवहार केल्याचा पुरावा फडणवीसांनी मांडला. फडणवीसांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिक यांच्यावर आरोपांची अक्षरश: माळ लावली. नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील एलबीएस रोड या मोक्याच्या स्थळावरील कोट्यवधी मूल्याची तीन एकर जमीन फक्त तीस लाखात कशी घेतली? ज्या लोकांकडून मलिकांच्या कंपनीने जमीन घेतली ते १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. गुन्हेगाराकडून मलिकांनी जमीन कशी विकत घेतली? या आणि तत्सम अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत फडणवीस यांनी मलिकांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबध आहेत. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. दाऊदच्या निकटवर्तीयांकडून मलिकांच्या कंपनीने जमीन विकत घेतली. कोट्यवधी रुपयांची जमीन मलिकांनी स्वस्तात विकत घेतली. तसेच स्टॅम्प ड्युटीमध्येही घोटाळा कऱण्यात आला असल्याचा आरोप फडणवीसांनी यावेळी केला. फडणवीस यांचे आरोप सत्यासत्य किती हे येणारा काळ ठरवणार असला तरी त्याचे गांभीर्य नाकारून चालणार नाही. कारण मलिकांनी केलाला कथित व्यवहार हा मुंबईत १९९३ साली झालेल्या भीषण बॉम्बस्पोटातील गुन्हेगारांशी निगडीत आहे. मला आरोपींबद्दल माहित नव्हते, असा दावा देखील मलिक करु शकत नाहीत. सध्या सुरु असलेले आरोप प्रत्यारोप राजकीय असले तरी मलिकांचा हा विषय निश्चितपणे गंभीरच आहे. आर्यन खान प्रकरणापासून सुरु झालेला हा वाद आता वेगळ्याच वळणार येवून ठेपला आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात मलिक व शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशिवाय दुसरा कोणत्याच पक्षाचा एकही नेता बोलायला तयार नाही. फडणवीसांनी फोडलेल्या राजकीय बॉम्बनंतर मलिकांनी फडणवीसांविरोधात हायट्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले, त्यानुसार मलिकांनी राज्यात बनावट नोटांच्या व्यवसायाला फडणवीसांनी संरक्षण दिल्याचा आरोप केला.
हे आरोप-प्रत्यारोप ना राजकारण्यांच्या, ना राज्याच्या हिताचे
मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावण्यात आली. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम फडणवीसांनी केले. तसेच, नोटबंदीच्या काळात १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या बनावट नोटाचं प्रकरण फडणवीस यांच्यामुळेच दाबले गेल्याचा आरोपही केला. मलिक यांच्या या आरोपावर आता फडणवीस काय उत्तर देणार, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दिवाळीपश्चात सुरू झालेला आरोपांचा सिलसिला आता लवकर थांबण्याची शक्यता नाही. अंडरवर्ल्डसोबत कोणाचे काय संबंध आहेत, हे सिध्द करण्यात आजवर कोणालाही यश लाभलेले नाही. राजकारण्यांनी त्या विश्वाशी नाते जोडण्यावरून आजवर नानाविध आरोप तथा चर्चा घडून आल्या आहेत. पंचवीस वर्षांतील राजकारणात नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास केलेल्या फडणवीस यांच्यावर एकही आरोप नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, आता मलिकांच्या लेखी फडणवीस हेदेखील अंडरवर्ल्डच्या काळ्या दुनियेशी संबंधित आहेत. खरेतर हे आरोप-प्रत्यारोप ना राजकारण्यांच्या, ना राज्याच्या हिताचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या राजकीय फटाकेबाजीचा आता सगळ्यांनाच वीट आला आहे. राज्यात यापलीकडे कोणतेच प्रश्न, समस्या शिल्लक राहिल्या नाहित का? असा प्रश्न देखील टीव्ही वरिल बातम्या पाहतांना येतो. गत दीड वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनचे चटके सोसत असलेली अर्थव्यवस्था आता कुठे हळूहळू वेग घेतांना दिसत आहे. मात्र अजूनही अर्थकारणाचा गाडा पूर्णपणे रुळावर आलेला नाही. यासाठी ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. यंदा झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, कोरोनामुळे शिक्षणाची पूर्णपणे वाताहत झालेली आहे. आता शाळा-महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी शैक्षणिक धोरणात मोठे बदल करावे लागणार आहेत. एवढेच काय तर गत १२-१३ दिवसांपासून एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्यात ऐवढे महत्वाचे प्रश्न प्रलंबित असतांना दररोज मलिकांचे तुणतुण ऐकण्यात काहीच अर्थ नाही.
Post a Comment