भविष्यातील संकटांचे संकेत

ग्लोबल वॉर्मिंगच्या विषयावर नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. आता या चिंतेत अजूनच भर पडली आहे. कारण युनायटेड नेशन्स इंटर-गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) नुकत्याच आलेल्या अहवालानुसार हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी केल्यानंतरही २०४० पर्यंत पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्याने वादळ, दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्येही वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका वाढण्याची शक्यता आहे. याची बोलकी आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात दिसून येते. एनसीआरबीच्या २०२० च्या अहवालानुसार,  देशात नैसर्गिक आपत्तीत गतवर्षी ७४०५ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक २८६२ बळी विजा कोसळण्याच्या घटनांत गेले आहेत. पुरामुळे ९५९, थंडीच्या लाटेत ७७६, उष्माघाताने ५३०, भूस्खलनात २९५, तर चक्रीवादळात ३७ जणांचा मृत्यू झाला. अहवालानुसार २०२० मध्ये वणवे, चक्रीवादळ, भूस्खलन आणि पुरामुळे २०१९ च्या तुलनेत जास्त बळी गेले आहेत. भारतीय उपखंडाला २०२० मध्ये पाच चक्रीवादळांचा तडाखा बसला होता. हे भविष्यात येणार्‍या संकटांचे संकेतच म्हणावे लागेल. यासाठी हवामान बदलाच्या विषयाकडे गांभीर्यांने पाहण्याची आवश्यकता आहे.हवामान बदलाची प्रक्रिया नैसर्गिक नव्हे. तर मानवी हस्तक्षेपच 

अलीकडच्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, दरडी - हिमकडे कोसळणे यासारख्या घटना वाढत चालल्या आहे. मानवी कृत्यांमुळेच हवामानबदल, तापमानवाढ हे दुष्परिणाम घडत आहेत, यात कोणतीच शंका नाही. मानवी हस्तक्षेपामुळे १९७० पासून सागरी तापमानवाढ, त्याचबरोबर पृथ्वीच्या गोठलेल्या भागात बदल आणि समुद्राच्या आम्लीकरणास सुरुवात झाली. १९९०च्या दशकापासून आक्रि्टक समुद्रातील बर्फाळ भागात ४० टक्के घट झाली, तर १९५०पासून वसंत ऋतुतील बर्फावरण घटले आहे, याकडे या अहवालात लक्ष वेधले आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि चिंताजनक होत चालला आहे. ही तापमानवाढ सर्वत्र दिसणार आहे. तुम्हाला कुठेही सुरक्षित ठिकाण नसेल. कुठेही पळण्यास किंवा लपण्यासही जागा नाही. पृथ्वीची तापमानवाढ ही मानवासाठी धोक्याची घंटा आहे, असेही अहवालात अधोरेखित केले आहे. यामुळे ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न आता आणखी जटिल होण्याची चिन्हे आहेत. हिंदी महासागराच्या प्रदेशाचे तापमान वेगाने वाढत आहे. त्याचाच अर्थ असा, की त्या भागात सागरी पातळीही वाढणार आहे. समुद्र पातळीत वारंवार वाढ होत राहिली, तर त्यातून सखल किनारपट्टी भागात पूरस्थिती निर्माण होईल. तसेच किनारपट्टीची धूपही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. याशिवाय उष्णतेच्या लाटा तीत्र होणे, अतिवृष्टी, हिमनद्यांचे वितळणे यासारख्या आव्हानांशी भारतासारख्या देशाला सतत मुकाबला करावा लागेल. अतिवृष्टी व त्यातून निर्माण होणार्‍या पूरस्थितीचा अनुभव भारतासारख्या देशासाठी नवीन नाही. ढगफुटीसदृश पाऊस, अतिवृष्टीमुळे आलेले पूर, दरडी कोसळणे अशा घटना सध्या वारंवार घडताना पहायला मिळत आहेत. वाशिष्ठी नदीच्या किनार्यावरील चिपळूण पाण्यात बुडणे असो वा कोल्हापूर, सांगलीसारख्या शहरांना पुराने वेढणे असो. निसर्ग किती रौद्र होऊ शकतो, याचीच ही उदाहरणे. तिकडे चीन, बेल्जिअम, जर्मनीतही अशीच पूरस्थिती बघायला मिळाली. या सार्‍यामागे हवामान बदल वा ग्लोबल वार्मिंग हा घटक प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे दिसून येते. हवामान बदलाची वा तापमानवाढीची ही प्रक्रिया काही नैसर्गिक नव्हे. तर त्यामागे मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, हेदेखील ध्यानात घेतले पाहिजे. बेसुमार वृक्षतोड करून रस्ते, पूल उभारणे, डोंगर फोडून बोगदे काढणे म्हणजेच केवळ विकास का, याचा कुठेतरी विचार व्हावा. कारण याचे गंभीर संकेत २०२०मध्ये मिळाले आहेत. 

निसर्गाची साखळी अबाधित राहणे आवश्यक

कोरोनाचे वर्ष म्हणून ओळख झालेल्या २०२० मध्ये नैसर्गिक आपत्तींत ७४०५ बळी गेल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालातून समोर आले आहे. जंगलाला लागलेले वणवे, चक्रीवादळ, भूस्खलन आणि पुरामुळे होणार्‍या मृत्यूंत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये वाढ झाली आहे. तर हिमस्खलन, थंडीची लाट, भूकंप, उष्माघात, विजा कोसळणे, अतिवृष्टी यासारख्या घटनांतील मृत्यूंत २०१९ च्या तुलनेत घट झाली आहे. हवामान बदलाचा फटका देशाला बसत असून मागील पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तींनी ३८,२६८ बळी घेतले आहेत. गेल्या दशकांत महापूर, चक्रीवादळे, उष्णतेची लाट, थंडीची लाट, अतिवृष्टीने भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. अल्पावधीत जास्त पाऊस, उन्हाळ्यात तापमान सातत्याने ४५ अंशांवर जाण्याचे प्रकार वाढले आहेत. भारतीय उपखंडात दरवर्षी सरासरी ४ चक्रीवादळे येतात. मात्र गेल्या काही वर्षांत ही संख्या वाढली आहे. हवामान बदलामुळे मान्सून व सर्व पॅटर्न बदलताहेत. परिणामी जीवित व वित्तहानी होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. हवामान बदलाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत असतो कारण, हवामानातील बदलांच्या अशा घटनांमुळे पीक वाया जाण्याची धोका अधिक असेल. याचा परिणाम आपल्या दैनंदिन गरजा, अन्न, पाणी आणि वीज यांसारख्या सुविधांवर होऊ शकतो आणि किमतींमध्ये वाढ होऊ शकते. हवामान बदलामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होईल आणि त्यांचा वैद्यकीय खर्च वाढेल. कोणत्याही देशाच्या, जगाच्या पर्यावरणासाठी तेथील निसर्गाची साखळी अबाधित राहणे आवश्यक असते. मात्र, तेथील जैवविविधतेशी तडजोड केली जात असेल, तर त्यातून ही साखळी तुटून नवनव्या संकटांना आमंत्रण मिळू शकते. केरळ, कोकणपासून, उत्तराखंडपर्यंत हेच पहायला मिळते. त्यात वाढते औद्योगिकीकरण, कार्बन वायू उत्सर्जन, वाहनांचे प्रदूषण आदी घटक तापमानवाढीस कारणीभूत ठरताना दिसतात. त्यात नदीपात्रात केली गेलेली अवैध बांधकामे, नैसर्गिक ओढ्या-नाल्यांचे प्रवाह संकुचित करणे या गोष्टी पूरस्थितीत भर घालतात. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासाची कास धरल्याशिवाय मानवी जीवन पुढे जाऊ शकत नाही, हे खरेच. परंतु, विकासाची नेमकी व्याख्या काय, हेही ठरवायला हवे. देशाच्या, जगाच्या पर्यावरणासाठी तेथील निसर्गाची साखळी अबाधित राहणे आवश्यक असते. मात्र, तेथील जैवविविधतेशी तडजोड केली जात असेल, तर त्यातून ही साखळी तुटून नवनव्या संकटांना आमंत्रण मिळू शकते, यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.


Post a Comment

Designed By Blogger