कृषी क्षेत्रात अतुलनीय काम करणार्या तसेच बीजमाता म्हणून जाणणार्या अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपेरे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरिवण्यात आले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील १७ जणांचा पद्मश्री आणि दोघांचा पद्मभूषण देऊन सन्मान करण्यात आला. परंतु नाकात घातलेली भारदस्त नथ, कपाळावर लावलेले ठसठशीत कुंकू, नववारी साडी. अशा अस्सल ग्रामीण रुपात दिसणार्या एका निरक्षर, आदिवासी, लहानशा गावातील गुलाबी लुगडे आणि नथ घालून पद्मश्री स्विकारणार्या राहीबाई पोपेरे यांच्याकडे महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा खिळून राहिल्या. कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणारा भारत हा रासायनिक खते व हायब्रीड बियाण्याच्या वापरात अग्रेसर आहे. यामुळे शेतीचे उत्पन्न वाढतेच, यात दुमत नाही मात्र जमीन नापिक होण्यासह कर्करोग व अन्य आजारांचे प्रमाण अलीकडच्या काही वर्षात वाढले असल्याचे संशोधनावरुन समोर आले आहे. सकस अन्न मिळत नसल्याने कुपोषण, भुकबळीचा डाग देखील अनेक जिल्ह्यांना लागला आहे. सोशल मीडियामुळे यावर जनजागृती होवू लागल्याने सेंद्रिय भाजीपाला, फळे याविषयी जनजागृती होतांना दिसते मात्र याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे तो राहीबाई पोपेरे यांनी! हरिततक्रांती नंतर देशात हायब्रीड बियाणांचा वापर वाढला. भरमसाठ उत्पादनामुळे शेतकरी हायब्रीड बियाणांकडे वळले. मात्र त्यातून होणारे नुकसान कुणाच्या लक्षातच आले नाही. या हायब्रीड जमान्यात कसदार, पारंपारिक, गावरान वाणांच्या वापराकडे, जतनाकडे दुर्लक्ष झाले. यावर केवळ चिंता व्यक्त न करता राहीबाईंनी सीडबँक तयार केली, आजपर्यंत त्यांनी ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. याच कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वीस वर्षांपासून अथक काम सुरू
राहीबाईंचा जन्म बांबेळे कुटुंबात नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील दुर्गम भागात झाला. त्या एकंदर सात बहिणी. वडिलांची तुटपुंजी शेती त्यामुळे त्यांना घरातील आणि वडिलांच्या हाताखाली पडतील ती कामे करावी लागत. राहीबाईंचे लग्न पोपेरे कुटुंबात झाले. ती मंडळीदेखील कोंभाळणे गावातचीच. त्यांचीही परिस्थिती तशीच होती. राहीबाई साखर कारखान्याचे ऊसतोडणीचे काम करत. ऊस तोडायचा, मोळ्या बांधायच्या, ट्रॅक्टर भरायचे ही कामे कष्टाची होती. तेंव्हापासून आणखी काहीतरी वेगळे करावे असे त्यांना वाटायचे. एकदा, संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठरला. वाण म्हणून देण्यासाठी खर्च करून वस्तू आणणे शक्य नव्हते. राहीबाईंच्या डोक्यात आले, की प्रत्येक बाईला फळझाडाचे रोप द्यावे! त्यांनी तशी रोपे तयार करून वाटली. खर्या अर्थाने येथूनच त्यांच्या कामाची सुरुवात झाली. प्रारंभी त्यांनी जवळच्या जंगलात जाऊन करवंदे घरी आणली, त्यापासून बी तयार केले. त्यांनी पहिल्याच फटक्यात तब्बल साडेतीन हजार रोपे तयार केली. सुरुवातीच्या काळात राहीबाईना हे काम करताना अनेकांनी वेड्यात काढले. राहीबाई हे काम पूर्वी छंद म्हणून करायच्या. सुरुवातीला अनेक लोकांकडून त्यांना अनेक प्रकारची बोलणी ऐकावी लागली पण त्यांनी मार्ग सोडला नाही. पारंपारिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या, शेतात त्याचा वापर करायच्या. याच काळात पुण्याच्या ‘बायफ’ या कृषी व सामाजिक क्षेत्रांत काम करणार्या संस्थेच्या राहीबाई त्यांच्या संपर्कात आल्या. तेथेच त्यांना बचतगटाची कल्पना समजली. येथे त्यांच्या सीडबँकेचा जन्म झाला. निरक्षर राहीबाई राहतात झोपडीत, अन्न शिजवतात चुलीवर. बियाणी साठवण्यास त्यांच्याकडे कणग्या आणि लिंपलेले माठ आहेत. त्यात राख असते. त्या राखेत ते बियाण्यांच्या वाणांची जतन करतात. औपचारिक शिक्षण नाही. पण लहानपणापासून शेतीची आवड. त्याचेही त्यांना शास्त्रीय ज्ञान होते, असे काही नाही. त्या लहान असताना वडिलांचे ’जुने ते सोने’ हे विचार त्यांना भावले. त्यातूनच त्यांनी पुढे भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचे हे काम अथक सुरू आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी राहीबाईंना ‘बियाण्यांची माता’ असे आदराने संबोधले
गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे. अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. हायब्रिडमध्ये उत्पन्न भरपूर मिळते, पैसाही मिळतो, पण अन्नाचा कस राहत नाही. त्यामुळे त्यांनी झपाटल्याप्रमाणे पारंपरिक वाणे तयार केली. राहीबाईंनी नेहमीच्या धान्याबरोबर नाचणी, भगर, तांदूळ, वाल, आळशी, डांगर अशा अनेक दाण्यांच्या दुर्मीळ, सुवासिक, चविष्ट, कसदार, पोषक जातींच्या बियाण्यांची निर्मिती गेल्या काही वर्षांत केली आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर त्यांच्या प्रेरणेतून गावरान वाणांची शेती केली जाते. त्यांनी जपलेले बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि परराज्यांतही पोचले आहे. त्यांनी वांगी, भेंडी, पेरू, आंबा, पालक, मेथी, वाटाणा आदी पिकांच्या जातींची बियाणे निगुतीने जपली. सध्याच्या काळात शेती उत्पन्न घेतांना त्यात हायब्रीड बियाण्यांसह रासायनिक खतांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात असल्याने माणसाला कर्करोगासारखे अनेक निरनिराळे आजार होत आहेत, यावर बरीच चर्चा सुरु आहे. सध्याच्या फास्टफुडच्या जमान्यात आपली रोग प्रतिकारक क्षमता कमी होत आहे. परिणामील कर्करोगासह विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे आपण आपल्या अन्नाची, म्हणजे अगदी फळे, भाज्या. अन्नधान्य यांची जी चव पूर्वी होती ती कुठेतरी गमावली आहे. याचे कारण संकरीत बियाणे हे आहे या बियाण्याचे काही फायदे आहेत ते नाकारून चालणार नाहीत पण आधीच्या बियाणांची साठवण, जतनही तितकच महत्वाच आहे. जैविविधतेसाठी आदिवासी भागांमध्ये काही लोक असे बियाणे जतन करून ठेवतात. याच धर्तीवर राहीबाईंचे कार्य हे आगामी पिढीसाठी निश्चितपणे फायदेशिर ठरणारे आहे, यात दुमत नाही. राहीबाईंना अनेकविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘बीबीसी’ने जगातील प्रभावशाली शंभर महिलांमधील एक म्हणून राहीबाईंचा गौरव केला आहे. राहीबाई पोपरे यांचा २०१९ सालच्या महिला दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती भवनात गौरव झाला आणि त्यांना ‘नारीशक्ती’ सन्मान मिळाला. आता भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला आहे. एका कार्यक्रमात डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी राहीबाईंना ‘बियाण्यांची माता’ असे आदराने संबोधले तेंव्हापासून त्यांना बीजमाता म्हणूनच ओळखले जाते. त्यांचे हे कार्य इतरांना प्रेरणा देणारे आहे.
Post a Comment