सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. कोरोना महासाथीच्या काळात नेहमीच्या एक्सप्रेस/मेल ट्रेन स्पेशल ट्रेनच्या दरात चालवण्यात येत होत्या. आता मात्र, रेल्वे वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार आहे. तिकिट दरही पूर्ववत करण्यात आले आहे. तब्बल २० महिन्यानंतर रेल्वे पूर्वीप्रमाणे धावणार असल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेचा हा निर्णय देशातून कोविडचे संकट कमी होत असल्याचे लक्षण मानण्यात येवू शकते. याचा सर्वात मोठा फायदा सर्वसमान्य प्रवासी व चाकरमन्यांना होणार आहे. भुसावळ विभागातील सर्व पॅसेंजर सेवा बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते मात्र आता रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानंतर सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता भुसावळ विभागाने जास्त वेळ न दवडता तातडीने कार्यवाही करुन प्रवाशांच्या सोईसाठी पॅसेंजर सेवा आधीच्या वेळेनुसार सुरु करण्याची आवश्यकता आहे.रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा

देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. या घटनेला १६७ वर्ष पूर्ण झाली आहेत. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा १९७४ साली पूर्णपणे बंद झाली होती. जार्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे बंदचा संप पुकारण्यात आला होता. २० दिवस तो संप होता. जागतिक महायुद्ध, मुंबईतील बॉम्ब स्फोट, अतिरेकी हल्ला याने देखील रेल्वे सेवा बंद झाली नव्हती. मात्र आणीबाणी आणि काहीवेळ नैसर्गिक आपत्ती रेल्वे बंद काही काळ खंडीत झाली होती. मात्र कोरोना विषाणूमुळे रेल्वे सेवा जास्त कालावधीसाठी बंद असल्याचे पहिल्यांदाच झाले. याकाळात सरकारी, खासगी कार्यालयेही बंद होती. परिणामी लाखो रोजगार बुडाले, हातावर पोट असणारे मिळेल तिथे काम शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत झाले आहेत. आता देशात विक्रमी लसीकरणामुळे कोरोनाचा वेग काहिसा मंदावला आहे. यामुळे खर्‍या अर्थाने अनलॉकचे पर्व सुरु झाल्यापासून परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी राज्य व केंद्र सरकारची धडपड सुरु आहे. लॉकडाऊन काळात मालवाहतूक आणि श्रमीक प्रवासी सेवा वगळता रेल्वेचे कामकाज ठप्प असल्याने रेल्वेचे हजारो कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे काटकसरीचे धोरण राबविण्यास रेल्वे मंत्रालयाने सुरुवात केली असून. याच अंतर्गत ब्रिटीश कालीन रेल्वे डाक सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे पोस्ट सेवा ही ब्रिटीश कालीन व्यवस्था आहे. ही रेल्वेची अंतर्गत पोस्टल सेवा आहे. या अतर्गत रेल्वे फाईल्स, संवेदनशील, गुप्त माहिती असलेल्या फाईल्स पाठवल्या जात होत्या. मात्र काटकसरीच्या धोरणामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. गत दोन-तिन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख बराच खाली आला आहे. दसरा, दिवाळीसारख्या सणांनंतरही कोरोना नियंत्रित असल्याने यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याआधी सर्व कार्यालयांसह बहुतांश सेवा अनलॉक देखील झाल्या आहेत. मात्र अजूनही रेल्वेसेवा पूर्णपणे सुरु झालेली नाही मात्र काही गाड्यांसह लांब पल्ल्यांच्या काही प्रवासी गाड्या सुरु झाल्या आहेत. यामुळे लांबचा प्रवास करण्याना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यासाठी त्यांच्या खिशाला झळ बसत होती. 

आता रेल्वेचा प्रवास पुर्वी प्रमाणे नसेल

दुसरीकडे भुसावळ विभागांतर्गत येणार्‍या चाकरमन्यांना दिलासा मिळालेला नव्हता. चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे. अनलॉकपर्व सुरु झाल्यापासून सर्व चाकरमनी कामावर रुजू झाले. पण रेल्वे सेवेअभावी नोकरदारांचे हाल झालेत. मात्र आता रेल्वेच्या निर्णयामुळे लवकरच देशांतर्गत सर्व रेल्वेसेवा पूर्वपदावर येणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्यावतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, येत्या काही दिवसांमध्ये हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये १७०० हून ट्रेन पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. मात्र, रेल्वे प्रवास करताना कोविड-१९ चे निर्बंध आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू असणार आहेत. तिकिट दर कमी झाल्यामुळे आणि रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशी संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात रेल्वे प्रशासनालाही अंतर्गत बदल मोठ्या प्रमाणात घडवून आणण्याचे शिवधणुष्य उचलावे लागणार आहेत. सध्या रेल्वेत खासगीकरणाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी खासगीकरणाचा मार्ग निवडला असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. प्रवाशांना सुविधा मिळायला हव्यात यात कुणाचेही दुमत नाही. मात्र हे करत असतांना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, मुळात रेल्वे सेवा हा व्यवसाय नसून देशातील प्रवाशांकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेली सोय-सुविधा आहे. यामुळे खासगीकरणाचा घाट घालतांना प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दुसरे असे की, कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनाच मोठा धडा मिळाला आहे. अर्थात यास रेल्वे देखील अपवाद नाही. भविष्यात अशा प्रकारची संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कोणत्याही प्रकारच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी रेल्वेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवे रुप धारण करण्याची आवश्यकता आहे. कोरोनानंतरचे जग वेगळे असेल, असे म्हटले जात होते त्याचा आता हळूहळू प्रत्यय येवू लागला आहे. अर्थात यास रेल्वे प्रवास देखील अपवाद नाही. आता रेल्वेचा प्रवास पुर्वी प्रमाणे नसेल. कोरोनाचे संकट पुन्हा येवू नये म्हणून रेल्वे प्रवासातही सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी मास्क वापरणे हा सर्वोत्तम उपाय आहे. 


Post a Comment

Designed By Blogger