इतिहास, सांस्कृतिक क्षेत्राचे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व हरपले

व्याख्याने, नाटक आणि लेखनाच्या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहोचवणारे प्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. शिवरायांसाठी आयुष्य वाहून घेणारे, इतिहासकार, नाटककार, लेखक अशी विविध क्षेत्रे आपल्या प्रतिभेने गाजवणारे आणि त्यांना अजरामर करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने केवळ साहित्य क्षेत्रातच नाही तर इतिहास, नाट्य क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले आणि त्यातून ऐतिहासिक जाणिवांनी बहरलेले राष्ट्रभक्तीचे मळे उभे राहिले. त्यांच्या प्रेरणेने असंख्य शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. आजच्या पिढीपर्यंत केवळ शिवरायांचा गौरवशाली इतीहास न पोहचविता त्याविषयी गोडी निर्माण करण्यात बाबासाहेबांचा मोठा हातखंड आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. जाणता राजा महानाट्यामुळे बालवयातच शिवचिरात्राविषयी अनेकांना गोडी निर्माण झाली. बाबासाहेबांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.जीवन शिवचरित्राच्या प्रचार प्रसारासाठी वाहून घेतले

पद्मविभूषण व महाराष्ट्र भुषण पुरस्कार विजेते बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव माहित नाही असा एकही व्यक्ती महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. नुकतेच वयाच्या १००व्या वर्षात पदार्पण करणारे बाबासाहेब म्हणजे उत्साहाचा झराच होते. बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्यातील सासवड येथे झाला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, कधी बैलगाडीपासून ते घोडेस्वारीपर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळातून काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांनी दादरा नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हा भाग पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. तेव्हा ज्या क्रांतिकारक तरुणांनी दादरा नगर हवेली पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी लढा पुकारला. त्यांच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेही एक होते. दादरा-नगर हवेलीच्या स्वातंत्र्य संग्रामात ऐन दमणगंगेच्या काठी स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देणारी शिवचरित्रावरील त्यांची भाषणे झाली. मग १९५४ पासून त्यांचा हा चैतन्यदायी प्रवास सुरु झाला. प्रामुख्याने शिवचरित्र या एकाच विषयावर जाहीरपणे गेली ८० वर्षं बोलणारे अन् लिहणारे बाबासाहेब पुरंदरे हे एक अजब रसायन होतं. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत १२ हजारांहून अधिक व्याख्याने दिलीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. इतिहास संशोधन करत असतानाच बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले जीवन शिवचरित्राच्या प्रचार प्रसारासाठी वाहून घेतले. राज्यातील विविध गडकिल्ले, ऐतिहासिक दस्तऐवज यांचा अभ्यास करून त्यांनी शिवचरित्रावर व्याख्याने दिली. 

 त्यांचे कार्य येणार्‍या अनेक पिढ्यांना स्पूर्ती देवून जाईल

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राजा शिवछत्रपती हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या सुमारे १७ आवृत्या निघाल्या आहेत. या पुस्तकाच्या आतापर्यंत सुमारे पाच लाख प्रतींची विक्री झाली आहे. याशिवाय त्यांनी इतिहासावर इतर विपुल लेखन केले. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजर्‍याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदर्‍यांचा सरकारवाडा’, ‘शनिवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदर्‍यांची नौबत’, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर साहित्य प्रकाशित झाले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला होता. त्यावरून मोठा वादही झाला. मात्र त्यांनी कार्य कधीच थांबविले नाही. दरम्यान, २०१९ मध्ये बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहोचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. त्यांच्या कार्यामुळे शिवरांयांच्या कार्याची महिती बच्चे कंपनीला तोंडपाठ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती साध्या व सोप्या भाषेत आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे महान कार्य बाबासाहेबांच्या हस्ते झाले आहे. एक प्रख्यात शिवशाहीर म्हणून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहतील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विपुल कार्यामुळे नेहमी जिवंत राहतील. त्यांचे कार्य येणार्‍या अनेक पिढ्यांना स्पूर्ती देवून जाईल. अशा या वंदनीय व्यक्तीमत्वाला भावपूर्ण श्रध्दांजली! 


Post a Comment

Designed By Blogger