सिलिकॉन व्हॅलीत भारतीयांचा दबदबा

जगातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि चर्चा घडवून आणणारी वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणार्‍या ट्विटरने सोमवारी मोठ्या खांदेपालटासंदर्भातील घोषणा केली. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. डॉर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार आहे. जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ पराग अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे. मूळ भारतीय अथवा अमेरिकेसह प्रगत देशांमध्ये स्थानिक होऊन अत्यंत तीव्र स्पर्धेवर मात करत तेथील व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांचे यशस्वी नेतृत्व करण्याचे यश आज या मंडळींनी प्राप्त केले आहे. भारत आणि भारतीयांच्या क्षमता-बुद्धिमतेच्या परिचय नव्या संदर्भासह आज उभ्या जगाला झाला आहे, ही बाब भारतीयांना पण प्रेरणादायी ठरणारी आहे.



भारतीयांच्या कौशल्याचा अमेरिकेला फायदा 

सध्या जगभरातल्या तंत्रज्ञान आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. आजच्या घडीला जगभरातील सर्वात मोठ्या कंपन्यांची धुरा भारतीय लोकांच्या हातात आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडोब, पालो अल्टो नेटवर्क अशा जगप्रसिद्ध कंपन्यांच्या सीईओ पदावर भारतीय व्यक्ती कायर्रत आहेत. हे सर्वजण जगभरात त्यांच्या कामगिरीने भारताची मान उंचावत आहेत. एका सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावरील निवडक ५०० कंपन्यांमध्ये सध्या ३० टक्के मुख्य कार्यकारी अधिकारी हे भारतीय अथवा मूळ भारतीय वंशाचे आहेत. संगणक क्षेत्रातील वैश्विक राजधानी असणार्‍या ‘सिलिकॉन व्हॅली’तील एकूण संगणक तज्ज्ञ वा इंजिनिअर्समध्ये तर दर दहा तज्ज्ञांपैकी एक तज्ज्ञ भारतीय आहे, ही बाब भारत आणि भारतीय या उभयतांसाठी अभिमानास्पद आहे. विदेशातील भारतीयांमध्ये काम करणार्‍या ‘इंडिया अ‍ॅस्पोरा’ या स्वयंसेवी संस्थेचा अभ्यासानुसार सद्य:स्थितीत जागतिक स्तरावर ११ देशांतील ५८ प्रमुख व प्रथितयश कंपन्यांचे नेतृत्व भारतीय व्यवस्थापक यशस्वीपणे करत आहेत. या यादीमध्ये आता पराग अग्रवाल यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीमधून कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पराग यांनी अमेरिकेतील स्टॅण्डफोर्ड विद्यापिठामधून कंप्युटर सायन्समध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहू रिसर्च येथे महत्वाच्या पदांवर काम केले. पराग २०११ पासून ट्विटर या कंपनीच्या सेवेत आहेत. पराग हे ट्विटरचे पहिली इंजिनियर ठरले ज्यांनी अगदी रेव्हेन्यूपासून कस्टमर इंजिनियरिंगपर्यंतच्या सर्व विभागांमध्ये काम केले आहे. ट्विटरला पुन्हा लोकप्रियता मिळवून देण्यात आणि २०१६-२०१७ दरम्यान मोठ्या संख्येने युझर्सला स्वत:कडे आकर्षित करण्यात ट्विटरला जे यश मिळाले त्यात पराग यांचा मोठा वाटा आहे. २०१७ मध्ये पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या ‘सीटीओ’पदी नियुक्ती करण्यात आली होती. सीटीओ पदी नियुक्त झाल्यापासून पराग यांच्यावर कंपनीची तांत्रिक आघाडी कशी असेल, मशिन लर्निंगचा वापर कसा करता येईल आणि सुधारणांसदर्भातील निर्णयांचे प्रमुख आहेत. भारतीय वंशाची व्यक्ती ट्विटरच्या सर्वोच्चपदी विराजमान होत असल्याबद्दल भारतीयांनी आनंद व्यक्त केला. मात्र या घडामोडीवर वक्तव्य करताना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे तसेच ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्यार्‍या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क यांनीही प्रतिक्रिया नोंदवली. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडॉब, आयबीएम, पालो अ‍ॅल्टो नेटवर्क आणि आता ट्विटरचे सीईओ सुद्धा भारतीय आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचे हे यश कमालीचे आहे. यामधून अमेरिका विस्थापितांना किती संधी देते हे दिसून येते, असे एक ट्विट पॅट्रीक कोलीसन यांनी पराग यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती होण्याच्या घोषणेनंतर केले. हे ट्विट रिट्विट करतांना एलॉन मस्क यांनी भारतीयांच्या कौशल्याचा अमेरिकेला फार फायदा होतोय, असे मस्क यांनी म्हटले आहे. 

भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा 

आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय पातळीवर आढावा घेतला तर सर्वच ठिकाणी भारतीयांचा दबदबा दिसून येतो. गुगलची प्रमुख कंपनी असणार्‍या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतवंशाचे सुंदर पिचाई कार्यरत आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे दोघे पायउतार झाल्यानंतर हे पद पिचाईंकडे आले. २०१५ पिचाई यांना गुगलचे सीईओ बनवण्यात आले होते. ४७ वर्षांच्या पिचाई यांनी आयआयटी - खरगपूरमधून शिक्षण घेतले आहे. ८० अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असणार्‍या इंटरनॅशनल बिझनेस मशीन कॉर्प्स म्हणजेच आयबीएमच्या सीईओपदी अरविंद कृष्णा कार्यरत आहेत. कृष्णा हे आयआयटी कानपूरचे विद्यार्थी आहेत. प्रसिद्ध मोबाईल कंपनी नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे राजीव सुरी हे एप्रिल २०१४ पासून नोकियाचे प्रमुख आहेत. मूळ भारतीय वंशाच्या सुरी यांचा जन्म नवी दिल्लीचा आहे. हैदराबादचे शंतनू नारायण हे अ‍ॅडोब या एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. शंतनू यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यासह वीवर्कचे सीईओ संदीप मथरानी, डिलॉईटचे सीईओ पुनीत रंजन, नोव्हार्टिसचे सीईओ वसंत नरसिंम्हन, मास्टरकार्डचे सीइओ अजयपाल सिंह बंगा, ऑडिओ आणि इन्फोटेन्मेन्ट क्षेत्रात सेवा देणारी कंपनी हर्मन इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे दिनेश पालिवाल क्लाऊड नेटवर्किंग कंपनी अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्षा जयश्री उल्लाल, एवढेच नव्हे तर जगातील तिसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि ६० पेक्षा अधिक कंपनींचे मालक असलेले वॉरेन बफेट यांनी स्वत:च्या कंपनीतील दोन व्यक्तींना आपले वारसदार म्हणून घोषित केले आहे. यातील एक व्यक्ती ही भारतीय वंशाची असून अजीत जैन त्यांचे नाव आहे. अजित जैन यांचा जन्म भारतातील सर्वात गरीब राज्य ओडिशामध्ये झाला आहे. आयआयटी खरगपूरमधून १९७२ मध्ये त्यांनी मॅकेनिकल इंजीनिअरिंगची पदवी पूर्ण केली. अशी कितीतरी जण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उंचावत आहेत. पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यामुळे भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

Post a Comment

Designed By Blogger