अल्पकाळचा आनंद!

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण जगासह भारतातही हाहाकार माजविला. या लाटेने लाखों लोकांचा जीव घेतला. ही दुसरी लाट इतकी भयावह होती की त्याची आठवण देखील काढली की अंगावर काटा उभा राहतो. गत तीन-चार महिन्यांपासून देशात लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर कोरोनाचा वेग मंदावला. आता महाराष्ट्रासह देशातील कोरोना नियंत्रणात आला आहे. ही निश्चितपणे आनंदाची बाब मानली जात होती. मात्र हा आनंद अल्पकाळच टिकतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. आफ्रिकेत आढळून आलेल्या व्हेरिएंटमुळे जगभरातील देश सतर्क झाले आहेत. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी सीमा पुन्हा बंद करण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या दोन दिवसांत हा व्हेरियंट ११ देशांत आढळला. कोरोनाच्या डेल्टाचे दोन म्यूटेशन होते. तर ओमिक्रॉन व्हेरियंटचे आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त म्यूटेशन आढळले आहेत. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने हा व्हेरियंट चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.नव्या व्हेरिअंटमुळे धोका अधिकच गडद

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर कोरोनाचे म्यूटेशन न झाल्याने नवा व्हेरिएंटही आला नव्हता. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची झपाट्याने कमी होत असल्यामुळे दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून कोरोनाचे एक-एक निर्बंध शिथिल करण्यात आले. शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मुंबई लोकल, आता रेल्वेसेवा देखील पुर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आता देशात खर्‍या अर्थाने कोरोनापूर्व काळातील स्थिती झाली झाली आहे. अनेकांच्या जीवनातून मास्क हद्दपार झाल्याचे चित्र कमी अधिक प्रमाणात सर्वदूर दिसून येत आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसर्‍या डोसचा विसर पडला आहे. यामुळे कोरोनाचा धोका टांगत्या तलवारीसारखाच होता, मात्र तो कधी आणि कुणाच्या डोक्यावर पडेल? हे निश्‍चित नव्हते. आता नव्या व्हेरिअंटमुळे हा धोका अधिकच गडद झाला आहे. दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन सहापट अधिक शक्तिशाली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाची दुसरी लाट आली होती. या लाटेने शिखर गाठले तेव्हा दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. दक्षिण आफ्रिकेसह १२ देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन जगभरात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेवरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले. यातच दक्षिण अफ्रिकेतून महाराष्ट्राच्या डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापार्श्‍वभूमीवर  भारताने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावली नुसार, परदेशातून भारत येणार्‍या नागरिकांना मागील १४ दिवसांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय, प्रवाशांना प्रवास करण्याआधीच एअर सुविधा पोर्टलवर त्यांचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अपलोड करणे बंधनकारक असणार आहे. केंद्र सरकारने १२ देशांची यादी जाहीर केली आहे. ज्यांना अधिक धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आले असून या यादीत यूकेसह युरोपियन युनियनचे सर्व देश दक्षिण अफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, बोत्सावाना, चीन, मॉरिशिअस, न्यूझीलंड, झिम्बॉम्बे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश आहे. या देशातून भारतात येणार्‍या प्रवाशांना विमानतळावर कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर, त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. 

लॉकडाऊन नको असल्यास प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंतेत भर टाकली असली तरी भारतात सध्या दिलासादायक चित्र आहे. देशात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांपेक्षा कमी आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाची ८ हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत.  तर ९ हजारांहून अधिक लोक बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, या कालावधीत २३६ जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक म्हणजे सक्रिय प्रकरणांमध्येही सातत्याने घट होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोनाचे १ लाख ३ हजार ८५९ सक्रिय रुग्ण आहेत. हा आकडा ५४४ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत आहे.  केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, गुजरातसह इतर राज्यांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार आहे.  महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात ५० हून अधिक जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर केरळमध्येही कोरोना बाधित रुग्ण सतत दिसू लागले आहेत. कोरोनाची लाट ओसरत असतांना लोकांनी मुक्त वातावरणात आपली कामे करण्यास सुरुवात केली. लोक काहींसे निर्धास्त झाल्यासारखे वागत होते. त्यांना मास्क वापरणे नकोसे वाटू लागले होते. पहिली लाट ओसरत असतांना जी चूक झाली तीच चूक आता पुन्हा व्हायला नको. मी लस घेतली आहे, आता मला कोरोनाची काय भीती? अशा आविर्भावात वावरणे निश्चितपणे धोकादायक आहे. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. उलट आपण जेवढे बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना आपल्या जास्त जवळ येणार आहे. नवा व्हेरीअंट हेच संकेत देत आहे. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतानेही लवकरच सावध होऊन कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढणार नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी लसीकरण पूर्ण करुन घेण्यासह मास्क वापरणे, स्वच्छता राखणे, सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचे स्वयंप्रेरणेने पालन करणे आवश्यक आहे. जर नव्या व्हेरीअंटमुळे देशात तिसरी लाट आली तर पुन्हा लॉकडाऊनचे संकट उभे राहु शकते. आधीच दीडवर्षांपासून सुरु असलेल्या विविध निर्बंधांमुळे देशाचे अर्थचक्र मंदीच्या गर्केत रुतले आहे. आता दिवाळीपासून त्याला हळूहळू वेग येतांना दिसत असतांना पुन्हा लॉकडाऊन नको असल्यास प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता आहे.  

Post a Comment

Designed By Blogger