आदीशक्ती तुच रक्षण कर

देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. देवीचा उत्सव असणार्‍या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. गतवर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या सावटाखालीच नवरात्रोत्सव साजरा करावा लागणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान चालणार्‍या नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. गेल्यावर्षांप्रमाणे यंदाही करोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. यामुळे अनेकांचा हिरमोड होणे स्वाभाविकच आहे. मात्र या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आई जगदंबेकडे एकच प्रार्थना करायची आहे की, आई सर्व बाजूंनी घेरुन आलेली संकटांची मालिका संपायचे नावच घेत नाही. या संकटांपासून तुच तुझ्या लेकरांचे रक्षण कर!


घरातील स्त्रीला कमी लेखायचे आणि दुसरीकडे देवीची पूजा करायची

भाद्रपद मास संपला की, आश्विन मासाला प्रारंभ होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. गुरुवारी घटस्थापना होऊन अंबामाता विराजित होईल व तिच्या उपासनेला वेगवेगळ्या प्रकारे प्रारंभ होईल. हा सण केवळ देवीचा सण नसून संपूर्ण नारीशक्तीचा सण आहे. आज सर्वच क्षेत्रात महिलांनी स्वत:चे कतृत्वा सिध्द करुन दाखविले आहे. काही क्षेत्रात तर त्यांनी पुरुषांच्या पुढे बाजी मारली आहे. असे जरी असले तरी आजची नारी खरचं सुरक्षित आहे का? या प्रश्नाचे उत्तर देतांना खूप विचार करावा लागतो. आपण सर्वजण दरवर्षी मोठ्या उत्साहात नारीशक्तीचा नवरात्रोत्सव साजरा करतो, तिची पुजा करतो. मात्र याचवेळी महिलांवर अत्याचार होत असतांना मुकदर्शक बनून बसतो. जास्तीत जास्त सोशल मीडियावर दोन-चार पोस्ट टाकून महिलांना सन्मान केल्याचा देखावा करतो. आज समाजात स्त्री-भू्रणहत्त्येचे प्रमाण वाढले आहे. आधुनिक काळात स्त्री-पुरूष समानता सांगावी लागते हेच खरे दुर्दैव म्हणावे लागेल. घरातील स्त्रीला कमी लेखायचे आणि दुसरीकडे देवीची पूजा करायची ही आतातरी बदलायला हवी. राज्यात गेल्या महिनाभरापासून महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने घडत आहेत. अत्याचारांचे हे सत्र अद्याप सुरूच आहे. मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला असतानाच उल्हासनगरातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. अमरावतीत मुलगी आणि महिलेवरील अत्याचाराच्या दोन घटनांच्यापाठोपाठ आणखी एका ७ वर्षीय बालिकेवरही अत्याचार झाल्याने जनमानस सुन्न झाले आहे. शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्यातही अल्पवयीन मुलीच्या इब्रतीचे लचके तोडण्यात आले. मुंबई, दिल्लीसह अन्य शहरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही निंदनीय बाब असली तरी त्यासाठी शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेला दोष देऊन चालणार नाही. त्यासाठी पाश्चात्य संस्कृती मागे ठेवून समाजाला नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्याची गरज आहे. शाळकरी मुली तसेच महाविद्यालयीन तरुणींना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. मात्र त्यांना भीती आणि दबावापोटी उघडपणे तक्रार करता येत नाही. छंदीफंदी लोकांकडून, एकतर्फी प्रेम करणार्‍यांकडून वारंवार छेड काढणे, पाठलाग करणे तसेच इतर मार्गाने त्रास दिला जातो. तक्रारींची वेळीच दखल न घेतल्याने पुढे गंभीर गुन्हे घडतात.

आई जगदंबे सर्व महिलांना वाईट प्रवृत्तीविरुध्द लढण्याची ताकद दे 

महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. केवळ नऊ दिवस उपवास करणे, दांडीया-गरबा खेळणे, अनवाणी राहणे याच मार्गाने देवीची उपासना होत नाही तर खर्‍या अर्थाने देवीची उपासना करायची असेल तर सर्वात आधी महिलांना योग्य तो सन्मान द्यायला शिका. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आई जगदंबे सर्व महिलांना वाईट प्रवृत्तीविरुध्द लढण्याची ताकद दे व सर्वांना सद्बुध्दी दे, हीच प्रार्थना आहे. पौराणिक कथांनुसार, देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. आजही पृथ्वी तलावर अनेक दैत्य माणसाच्या रुपात जीवंत आहेत. त्यांचा बंदोबस्त कर! आई जगदंबे आज संकटे चहुबाजूने आली असल्यासारखे भासत आहे. कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी मानवामुळे. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण तर आहेच मात्र दुसरीकडे अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने देशात बेरोजगारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. अनेक वस्तुंचा तुटवडा निर्माण होवून महागाईदेखील वाढली आहे. कोरोनाचे संकट काय कमी होते म्हणून आता राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. अतिपावसाने पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. मुसळधार पावसाने राज्यभरात हजेरी लावली. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसह मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना झोडपल्याने काढणीला आलेला कापूस, मका, ज्वारी, उद्ध्दवस्त झाल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. नाशिकमध्ये द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. एका बाजूला कोरोना व्हायरस संक्रमनाचे संकट. तर, दुसर्‍या बाजूला अतिवृष्टीमुळे होणारे शेतीचे नुकसान अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. या सर्व संकट रुपी दैत्यांचा आता तूच संर्‍हार कर माता. आजपासून नऊ दिवस नवरात्रोत्सवाचा उत्साह संपूर्ण देशात राहणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये. नवरात्रोत्सव साजरा करताना नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. याचे पालन करण्याची सद्बुध्दी सर्वांना मिळो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा... 

Post a Comment

Designed By Blogger