१०० कोटी: भारताचे ऐतिहासिक पाऊल

गेल्या दिड वर्षांपासून कोरोना महामारीने जगासमोर नवे संकट उभे केले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत होते. त्याचेच यश म्हणजे कोरोनापासून बचावासाठी लस विकसित करण्यात आली. भारतातही कोव्हॅक्सिन स्वदेशी लस निर्माण करण्यात आली. जानेवारी २०२१ महिन्यापासून भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून कोरोनाविरोधातील लढाईमध्ये भारताने गुरुवारी ऐतिहासिक यश मिळवले. भारताने गुरुवारी कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये १०० कोटींचा आकडा गाठला. जानेवारी महिन्यामध्ये १६ तारखेपासून भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्य यंत्रणांमधील कर्मचार्‍यांपासून सुरू झालेल्या या लसीकरणामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व वयोगटांचा समावेश करण्यात आला. दरम्यानच्या काळात लसींची टंचाई, लसीबाबत पसरलेल्या अफवा, शंका अशा सर्व अडचणींवर मात करत भारतातील आरोग्य यंत्रणा, केंद्र आणि राज्य सरकारमधील नियोजनांच्या माध्यमातून भारताने १०० कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा ऐतिहासिक मैलाचा दगड भारताने गाठला आहे. भारतात कोरोनाचा अंत जवळ

सन २०२०च्या सुरुवातीला चीनच्या वूहानमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने पूर्ण वर्षभर संपूर्ण जगभर हाहाकार माजविला. जवळपास वर्षभरापासून भारतासह संपूर्ण जगाला वेठीस धरणार्‍या कोरोना व्हायरसमुळे जगभरात ५० लाखापेक्षा जास्त तर भारतात साडेचार लाखांपेक्षा जास्त जणांचा बळी गेला. अनेक देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. याचे हादरे भारतालाही बसले मात्र आता भारतात कोरोनाचा अंत जवळ आला आहे. इतिहासात कधीही अशाप्रकारचे आणि एवढ्या मोठ्या स्तरावर लसीकरण अभियान कधी झालेले नाही. अशी कामगिरी भारताने करुन दाखविली आहे. जानेवारी २०२० मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने देशव्यापी लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. दरम्यान, १६ जानेवारी २०२१ पासून देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी कोविड योद्धे असलेल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली होती. तर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते. सुरुवातीच्या तीन-साडेतीन महिन्यांमध्ये लसीकरणाचा प्रचंड गोंधळ दिसून आला. प्रत्यक्षात लसीकरण सुरू झाले त्यानंतरच्या दोन-चार आठवड्यांतच लसीची टंचाई भासू लागली. लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला तेव्हा खरे तर लसखरेदीचे सर्वाधिकार केंद्र सरकारने राखूनच ठेवले होते. मात्र, अल्पावधीतच या लसीचे राज्यांना वाटप करताना सापत्नभाव दिसत असल्याचा आरोप झाल्यामुळे काही प्रमाणात राज्य सरकारे तसेच खाजगी इस्पितळांना लस खरेदीची मुभा देण्यात आली. मात्र, त्यानंतरही या ढिसाळ व्यवस्थापनाच्या स्थितीत तसूभरही फरक पडला नाही. मधल्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात लस निर्यातही केली. यावरुन मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपही झाले मात्र लसींची निर्यात ही लस उत्पादक कंपन्यांच्या करारानुसार होती, हा युक्तिवाद मान्य केला तरी अन्य देशांनी आपापल्या नागरिकांना जसे प्राधान्य दिले, तसे भारतात झाले नाही, यामुळे मोठी टीकाही झाली होती. 

भारताला लसीकरणाचा मोठा अनुभव

भारताला अन्य आजारांवरील लसीकरणाचा मोठा अनुभव होताच भारतात साधारणत: ४५-५० वर्षांपासून लसीकरण मोहिम राबविण्यात येते. याची गणती जगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य योजनांपैकी होते. भारतामध्ये लशींची वाहतूक करण्यासह त्यांच्या साठवणुकीची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. त्याच्या जोडीला या कामाचा अनुभव असलेले कुशल मनुष्यबळ देखील आहे. असे असले तरी कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीकरण प्रचंड आव्हानात्मक होते. लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर १३० कोटी पेक्षा जास्त लोकांना लस देण्याचे आव्हान केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना पेलावे लागणार होते. यामुळे यास किती वेळ लागेल? ही लसीकरणाची मोहिम यशस्वी होईल का? असे अनेक प्रश्‍न होते. देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरया लसीकरणासाठी आपल्याला किती वर्ष लागतात याबाबत अनेक मतप्रवाह दिसून आले. निम्म्या भारतीयांना लस द्यायलाच किमान दोन वर्षं लागतील, असा तज्ञांचा अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या लसीबाबतच्या अफवा, शंका आणि लसींचा तुटवडा यामुळे या लसीकरण मोहिमेत अनेक अडथळे आले. मात्र या अडथळ्यांवर मात करत देशात लसीकरण मोहीम सुरू राहिली. देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी मुख्यत्वेकरून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा वापर केला गेला. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढला. तसेच काही वेळा दिवसाला १ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम नोंदवला गेला. दरम्यान, देशात कोरोना लसीच्या १०० कोटी डोसचा आकडा गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता पूर्ण झाला आहे. शेवटचे २० कोटी डोस ३१ दिवसात घेतले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी १०० कोटी डोस पूर्ण करण्याच्या निमित्ताने दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात पोहोचले. ते येथे सुमारे २० मिनिटे थांबले. या दरम्यान त्यांनी आरोग्य सेवकांशी चर्चा केली. १०० कोटींपेक्षा जास्त लसीकरण करणे प्रचंड आव्हानात्मक काम होते. मात्र भारताने ते आव्हान लिलया पेलले आहे. यासाठी भारताचा अनुभव कामी आला. कोरोनामुळे अमेरिका व ब्रिटनसारख्या महासत्ता हादरल्या होत्या. आयात-निर्यात ठप्प झाल्याने बड्या कंपन्यांवर उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था ठप्प पडण्याच्या मार्गावर येवून ठेपली होती. मात्र आता लसीकरणाने वेग घेतल्यानंतर मंदीच्या गर्केत अडकलेले अर्थचक्र आता हळूहळू वेग घेतांना दिसत आहे. आता भारताने लसीकरणात १०० कोटींचा आकडा गाठल्यानंतर भारतात कोरोनाचा अंत जवळ आला आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार  नाही.

Post a Comment

Designed By Blogger