ड्रग्जच्या विषाचा डंख

बॉलीवूडमध्ये चालणारा ड्रग्जसह अन्य अमली पदार्थांचा ‘डर्टी पिक्चर’ आत नवा राहिलेला नाही. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अवघे बॉलीवूड हादरले होते. आता पुन्हा एकदा यावर चर्चा सुरु होण्याचे कारण म्हणजे मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतले. यात बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. आर्यनने बॉलीवूडमध्ये अद्याप डेब्यू केला नसला तरी नशेखोरीच्या दुनियेत एन्ट्री केल्याचे आता समोर आले आहे. यात आर्यन खरोखरच दोषी आहे? यास जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असतांना आता शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आर्यन १९९७ साली जन्माला आला त्याच वर्षी शाहरुखने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण आपल्या मुलांना धूम्रपान, अमली पदार्थ सेवन व शरीरसंबंध अशा सर्वच बाबतीत स्वातंत्र्य देणार, असे जाहीर केले होते. घरात पडलेल्या पैशांच्या राशी आणि निर्णयाचे स्वातंत्र्य व स्वैराचार याची गल्लत यामुळे आर्यन खूप लवकर अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकला.


अमली पदार्थाची विक्रीचा गोरख धंदा

आर्यन खानच्या अटकेनंतर आता बॉलीवूडचे अभिनेते, अभिनेत्री अंमली पदार्थाच्या कशा आहारी जात आहेत, याची चर्चा होत असली तरी बॉलीवूडमध्ये ड्रग्सचे कनेक्शन नवीन नाही किंवा अमली पदार्थ आणि बॉलीवूड याचा संबंध प्रथमच समोर आलेला नाही. याआधी संजय दत्त, ममता कुलकर्णी, बॉबी देओल, प्रतीक बब्बर, रणबीर कपूर, फरदीन खान, पूजा भट्ट यांच्यासह अनेक कलाकारांच्या अमली पदार्थांच्या सवयी उघड झालेल्या आहेत. यापैकी अनेकांनी आपल्या नशेच्या सवयी सोडल्याचे उघडपणे मान्य देखील केले आहे. आज सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे दारू, अमली पदार्थ, गांजा, कोकेन अशा अनेक अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे दिसते. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी ड्रग्सच्या व्यसनाबाबत कबूली दिली आहे. बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर संजय दत्त आधीच ड्रग्जचा बळी ठरला होता. याबाबत खुद्द संजय दत्तने अनेकवेळा कबूली दिली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याचा बायोपिक ‘संजू’ या चित्रपटात हे वास्तव दाखविण्यात आले आहे. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणार्‍या रणबीर कपूरने एका मुलाखती दरम्यान तो शालेय जीवनात ड्रग्सचा बळी होता, याचा गौप्यस्फोट केला होता. २००१ साली कोकेन बाळगल्या प्रकरणी अभिनेता फर्दिन खान याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या प्रसिद्धीवर आणि प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याचा त्याच्या कारकिर्दीवर सुद्धा परिणाम झाला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत आपली छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटील हीचा मुलगा प्रतीक बब्बर याने सुद्धा त्याने ड्रग्स घेतले असल्याचे मान्य केले आहे. वयाच्या १३व्या वर्षीच ड्रग घेतले आणि त्यानंतर तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. प्रसिध्द रॅपर व गायक योयो हनी सिंग देखील ड्रग्जच्या आहारी गेला. एक वर्षासाठी त्याच्यावर पुनर्वसन केंद्रात उपचार करण्यात आले. आणि आपण पुन्हा या नट-नट्यांना डोक्यावर घेवून मिरवतो. यामुळे आर्यन खानच्या बाबतीत फारसे काही वेगळे होईल, अशी अपेक्षा ठेवण्यात अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षातील काही घटना-घडामोडींवर नजर टाकली तर हेच लक्षात येते की, मुंबईमध्ये अमली पदार्थाची विक्री, खरेदी आणि सेवन यास बंदी असूनही राजरोसपणे याचा गोरख धंदा सुरु आहे. 

अमली पदार्थांचा विळखा संपूर्ण समाजाला पोखरतो 

अंमली पदार्थांचा वापर किंवा व्यसन ही फिल्म आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीपुरती समस्या राहीली नसून अमली पदार्थांचे सेवन करण्याचे तरुण पिढीतील प्रमाण गेल्या काही वर्षांत बेसुमार वाढले आहे. आता हा प्रश्न एका वर्गापुरता आणि मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांपुरता मर्यादित नसून नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर अशा ठिकाणही अंमली पदार्थांचा प्रश्न गंभीर होतांना दिसत आहे. पंजाबमधील ५० टक्क्यांहून अधिक युवक हा अमली पदार्थांच्या जाळ्यात सापडला असून, हे जळजळीत वास्तव ‘उडता पंजाब’ चित्रपटात मांडले आहे. अमली पदार्थांचा विळखा फक्त महाविद्यालयीन तरुणांभोवतीच नाही, तर तो संपूर्ण समाजाला पोखरतो आहे. आपल्या देशातील सुमारे २५ टक्के तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे एका सर्वेक्षणात आढळले होते. अमली पदार्थांपासून आपण खरेच तरुण पिढी आणि समाजाला वाचवू शकणार का, असा प्रश्न उद्विग्न करतो आहे. मुंबईसह राज्यभरात अमली पदार्थ सेवनाचे प्रकार वाढले असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. शाळा महाविद्यालयांमधून तंबाखू, सिगारेट, दारू, चरस आणि गांजा यांचा वापर सर्रास होत नसला तरी गेल्या १० वर्षांत वाढताना दिसत आहे. ब्राऊन शुगर, गांजा, अफू, भुलीचे इंजेक्शन, गुंगी आणि मेंदूला झिंग आणणार्‍या गोळ्या, तसेच सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा यांच्या आहारी जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे व्यसन आहे. अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल जाणवू लागतो, तेव्हा हे व्यसन डोके वर काढते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आता बहुतांश ठिकाणी मेडेड्रोन या उत्तेजक औषधाचाही नशेसाठी मोठ्या प्रामाणात वापर केला जातो. एम कॅट नावाने ओळखले जाणारे हे उत्तेजक औषध पावडर किंवा गोळ्यांच्या स्वरूपात वापरले जाते. याच्या सेवनाने शारीरिक तसेच मानसिक दुष्परिणाम होतात. हे व्यसन इतके घातक आहे की यासाठी मनोविकारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागते किंवा प्रसंगी संबंधिताची रवानगी मनोरुग्णांच्या इस्पितळात करावी लागते. नव्वदच्या दशकात श्रीमंतांचे किंवा पैसेवाल्यांचे व्यसन म्हणून याकडे पाहिले जायचे, पण आता मध्यमवर्गीयांच्या घरात हा व्यसनाचा राक्षस शिरू पाहतो आहे. कामाचा ताण, काम नाही म्हणून येणारे वैफल्य, प्रेम आणि शारीरिक गरजा पूर्ण न होण्याचे दु:ख अशा अनेक परिस्थिती, भावना ज्यामुळे लोक नशेकडे आकृष्ट होतात. पण एकदा नशेचा विळखा पडला की कितीही झटापट केली तरी तो विळखा सुटत नाही आणि दु:खाशिवाय मग काहीच हाती उरत नाही.


Post a Comment

Designed By Blogger