एअर इंडिया : ६८ वर्षांचे वर्तुळ पूर्ण होणार!

संकटकाळी देशाच्या, देशवासीयांच्या मदतीला धावून गेलेली सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया गेल्या काही वर्षांपासून स्वत:च संकटात सापडली आहे. यामुळे केंद्र सरकारने ही कंपनी विकायला काढली आहे. त्यासाठी डिसेंबर २०२० मध्ये  एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले. त्यानंतर पात्र ठरलेल्यांकडून बोली मागविण्यात आल्या. टाटा सन्स व स्पाईसजेटचे प्रवर्तक अजय सिंह हेच पात्र ठरले होते. दोघांमध्ये टाटांनी सर्वाधिक बोली लावली असल्याचे समोर आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने त्यास मंजुरी दिल्यानंतर एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटांच्या ताब्यात जाण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. टाटा समुहासाठी एअर इंडिया ही केवळ एक व्यवसायिक डिल नसून भावनिक विषय देखील आहे. यामुळेच याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एअर इंडिया टाटांच्या ताब्यात जात असल्याने एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. टाटा एअरलाइन्सचे १९५३ मध्ये राष्ट्रीयीकरण

भारतासाठी टाटा हे नाव केवळ उद्योगपती म्हणून घेतले जात नाही. भारताच्या औद्योगिक प्रगतीत टाटांचे मोठे योगदान आहे. टाटा समुहाचे संस्थापक अध्यक्ष जमदेशदजी टाटा यांना ‘फायर ऑफ द इंडियन इंडस्ट्रीज’ देखील म्हटले जाते. याच कुटुंबातील जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर २९ जुलै १९४६ टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून त्याचे नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये एअर इंडियातील ४९ टक्के भागीदारी भारत सरकारने घेतली होती. १९५३ मध्ये याचे पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या या निर्णयाला जेआरडी टाटांनी जोरदार विरोध करत, सरकारने मागच्या दाराने केलेले राष्ट्रीयकरण अशी टीका केली होती. आता ६८ वर्षांनी पुन्हा एकदा टाटा समूहाने स्वतःची कंपनी परत मिळवणार आहे. एकेकाळी देशातर्गंत व देशाबाहेर हवाई सेवेवर वर्चस्व असणारी एअर इंडिया कर्जात कशी बुडाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एअर इंडियावर एकूण ३८,३६६.३९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. आज एअर इंडियाच्या खासगीकरणावरुन मोदी सरकारवर टीका होत असली तरी ही वेळ का आली? याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी एअर इंडिया आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी इंडियन एअरलाईन्स अशा दोन स्वतंत्र कंपन्या सरकारने सुरू केल्या. सरकारने ८० च्या दशकात हवाई वाहतूक क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जेट एअरवेजसारख्या कंपन्यांनी हवाई सेवा देण्यास सुरुवात केली. मात्र तरीही २००५ पर्यंत इंडियन एअरलाईन्स देशातील दुसर्‍या क्रमांकाची कंपनी होती. मात्र त्यानंतर अनेक कंपन्यांशी स्पर्धा सुरू झाल्याने इंडियन एअरलाईन्सच्या अडचणी वाढल्या. एकीकडे सरकारी हवाई कंपनी अडचणीत सापडली असताना, दुसरीकडे सरकार खासगी कंपन्यांना हवाई क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन देत होते. याचा फटका एअर इंडियाला बसला. त्यानंतर २०११ मध्ये सरकारने इंडियन एअरलाईन्स आणि एअर इंडियाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि इंडियन एअरलाईन्सचा अध्याय संपला. यानंतर एअर इंडिया अडचणीतून बाहेर निघण्याऐवजी जास्तच अडचणीत सापडली.

एअर इंडिया रतन टाटांच्या नेतृत्वाखाली पुन्हा गतवैभव प्राप्त करेल

देशांतर्गत व देशाबाहेर मजबूत हवाई जाळे असतांनाही केवळ कधी सरकारची धरसोड धोरणे तर कधी दोन्ही कंपन्यांमधील व्यवस्थापनांची स्वार्थी धोरणांमुळे दिवसेंदिवस एअर इंडियापुढील अडचणी व कर्जाचा डोंगर वाढत गेला. २०११ मध्ये झालेले विलीनीकरण एअर इंडियाच्या अडचणी वाढवणारे ठरले. त्यामुळे एअर इंडिया विकायची किंवा बंद करायची, इतकेच पर्याय सरकारसमोर उरले. एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत केले. मार्च २०१८ मध्ये एअर इंडियामधील ७६ टक्के वाटा विकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोणी एअर इंडिया विकत घेतली असती, तर त्याला ४.७ बिलियन अमेरिकन डॉलरच्या कर्जाचा भार पेलावा लागला असता. त्यामुळेच कोणीही एअर इंडिया विकत घेण्यात रस दाखवला नाही. २०१९ च्या अखेरीस सरकारने एअर इंडियामधील १०० टक्के हिस्सा विकायचे ठरवले. एअर इंडियाला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी रतन टाटा उत्सूक होतेच. त्यांनी सर्वाधिक बोली लावत कर्जात बुडालेल्या महाराजाला ताब्यात घेण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. एअर इंडिया आज तरी कर्जात बुडालेली असली तरी त्यांची ताकद मोठी आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत एअर इंडियाची एकूण स्थिर मालमत्ता सुमारे ४५,८६३.२७ कोटी रुपये आहे. यामध्ये एअर इंडियाची जमीन, इमारती, विमानांचा ताफा आणि इंजिनांचा समावेश आहे. एअर इंडियाकडे बी७८७ आणि ए३२० विमानांचा मोठा ताफा आहे. आंतरराष्ट्रीय मार्गांवर एअर इंडियाची स्थिती चांगली आहे. त्यातच स्टार अलायन्सचा सदस्य असल्याने एअर इंडियाला महत्त्व आहे. आता महाराजाची कमान ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती जात असल्याने एअर इंडियाच्या विषयाकडे सर्व भारतिय सकारात्मक नजरेनेच पाहत आहेत. रतन टाटा हे भारतावर किती प्रेम करतात हे सांगायला नको. कोरोना काळात देखील त्यांनी देशासाठी भरभरून मदत केली. देशाबद्दल जे जे काही करता येईल त्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. कोरोना संकटच्या काळातही टाटा समूह देशाच्या मदतीसाठी धावून आला. देशावर कोरोनाचे संकट ओढवल्यापासून रतन टाटा यांनी विविध पद्धतीने लोकांपर्यंत आपला मदतीचा हात कायम पोहोचेल याची काळजी घेतली. ते नेहमी त्यांच्या धाडसी व दानशूर वृत्तीमुळे चर्चेत राहतात. आता एअर इंडिया रतन टाटांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुन्हा गतवैभव प्राप्त करेल, यात तिळमात्रही शंका नाही. 


Post a Comment

Designed By Blogger