काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान

गेल्या दोन आठवड्यांपासून पंजाबमध्ये सुरू असलेला राजकीय कलह अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी दलित उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांची निवड केली. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ मंत्री रझिया सुलताना यांनी देखील राजीनामा दिला आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांची भेट घेतली. याचवेळी काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांपैकी एक असलेल्या कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काँग्रेसमध्ये निवडून आलेला अध्यक्ष नाही. निर्णय कोण घेत आहे? हे आम्हाला माहिती ना्ही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेस सुप्रिमो सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावावी, अशी मागणी केली आहे त्यांचे हे पत्र म्हणजे, कपिल सिब्बल यांना एकप्रकारे समर्थनच आहे. पक्षाचे आणखी एक नेते मनीष तिवारी यांनीही अशाच आशयाचे विधान केले होते. अमरिंदर यांचा राजीनामा घेताना, नवा मुख्यमंत्री ठरवताना पक्षात चर्चा झाली नाही, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह चार जणांनी पदे सोडली, पण पक्ष गप्पच आहे. अशा स्थितीत पक्ष दीर्घकाळ राहणे योग्य नसल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. पंजाबसह राजस्थान व छत्तीसगडमध्येही काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान सुरु झाले आहे.उघडपणे दोन गट

पंजाबमध्ये माजलेली राजकीय खळबळ शांत होण्याचे नावच घेत नाही. त्यापाठोपाठ राजस्थानमध्येही मुख्यमंत्री हटाओच्या मोहिमेने जोर घेतला आहे. सचिन पायलट यांनी मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु केली आहे. दुसरीकडे पंजाबपाठोपाठ छत्तीसगडमधील १२ ते १५ आमदारांनी अचानक दिल्लीवारी केल्यामुळे तेथे देखील काँग्रेसला ग्रहण लागणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे मतभेद टोकाला गेल्याचे मध्यंतरी समोर आले होते. टी. एस. सिंह देव याच्यामते २०१८मध्ये राज्यात भाजपाला पराभूत करून काँग्रेसचं सरकार आल, तेव्हा अडीच वर्ष भूपेश बघेल मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर सिंह देव यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाईल, असे ठरले होते. या वर्षी जानेवारी महिन्यात बघेल यांच्या मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष देखील पूर्ण झाली आहेत. यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय भुकंप होती की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या ७० वर्षांच्या इतिहासात ५० वर्षापेक्षा जास्त सत्ताकाळ भोगणार्‍या काँग्रेसची सध्याची अवस्था खूपच खराब आहे. नेमकं काँग्रेसचे धोरण काय आहे? याबाबत कुणातही एकवाक्यता नाही. सन २०१४ साली आलेल्या मोदी लाटेत होत्याचे नव्हते झालेल्या काँग्रेसची अवस्था आता वर्चस्व नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करण्यापर्यंत आली. जर गत आठ-दहा वर्षांच्या इतीहासात डोकावून पाहिले तर लक्षात येते की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर देशभरात झालेल्या निवडणुकांपैकी दोन-चार निवडणुकांचा अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमधील काँग्रेसची पीछेहाट हा निव्वळ योगायोग किंवा मोदी लाटेच्या राजकारणाचा परिणाम नाही. त्या स्थितीला काँग्रेसचे धोरण व स्वपक्षातील काही नेतेच जबाबदार आहेत. यामुळेच काँग्रेसला २०१४ नंतर लागलेली घरघर, उतरती कळा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. पक्षात राहुल गांधी समर्थक व जेष्ठ नेत्यांचा नाराज गट असे उघडपणे दोन गट पडले आहेत. 

.....तरच काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य

नाराज नेत्यांच्या गटाला जी-२३ असेही संबोधले जाते. जी-२३ नेत्यांनी मागच्या वर्षी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाच्या सूचना केल्या होत्या. गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, ते त्या २३ नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांना पत्र लिहीत काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली होती. आताही पंजाबमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची लगेच बैठक बोलावून परिस्थितीवर चर्चा करावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्या विधानामुळे युवक काँग्रेस नाराजी झाली असून त्यांनी सिब्बल यांच्या घरासमोर निषेध व्यक्त केला. या घटनेवरुन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. अलीकडच्या काही महिन्यांतील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे मानले जावू लागले आहे. काँग्रेसमधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करतांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘काँग्रेसची आजची स्थिती रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे असे मार्मिक भाष्य केले होते. जे काँग्रस पक्षाला चपखलपणे बसते. दोन आठवड्यांपूर्वी नवडणूक राजकारणावर नजर ठेवणारी संस्था असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने एक अहवाल प्रसिध्द केला होता. त्या अहवालानुसार, गत सात वर्षात एकूण २२२ नेते काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये सामील झाले. यामध्ये १७७ खासदार आणि आमदारांचाही समावेश आहे, लोकसभेत २०१४ मध्ये पराभव झाल्यावर काँग्रेस आणखी जर्जर झाली असून आपले नेतेही सांभाळता येत नाहीत हे वरील दोन्ही बाबींवरुन अधोरेखीत होते. सध्यस्थितीलाही काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांचा ‘जी-२३’ गट व गांधी परिवार समर्थक गट अशी उघड दुफळी काँग्रेसमध्ये पडत चालली आहे. काँगेसमधील नेत्यांना या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव आहे मात्र ते अजूनही सत्य मानायला तयार नसल्याने काँग्रेसचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे. सध्यस्थितीला काँग्रेस पक्षाची सगळी इमारत पोखरली गेली आहे. ती पूर्णपणे पाडून नवी बांधायची तयारी दाखवली तरच काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य होईल. नव्या सामाजिक समिकरणांची मांडणी करावी लागेल. भाजप विरोधी पक्षांशी युती करताना स्वत:चा पारंपरिक अहंकार दूर ठेवावा लागेल. 

Post a Comment

Designed By Blogger