ओला दुष्काळ जाहीर करा

सप्टेेेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अत्यल्प पावसामुळे दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या खान्देशात गुलाब चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. संपूर्ण पीकेच पाण्याखाली वाहून गेली आहेत. मागील चार दिवसात मुसळधार पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन, मुग, उडीद, भुईमूग आदी पिके नामशेष झाली आहेत. तर कपाशी, मका, उस, मोसंबी, बाजरीची पिके आडवी झाली आहेत. शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून पिके पिवळी पडत आहेत. नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने शेतकर्‍यांची पिके वाहून गेली आहेत. यामुळे खान्देशात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. मागील काही वर्षांपासून शेतकर्‍यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच शेतीचे अर्थचक्र मोडले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे सलग दुसर्‍या वर्षी देखील खरीप हंगाम हातातून निसटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 



कृषीक्षेत्रात एकामागून एक संकटांची मालिका 

‘गुलाब’ चक्रीवादळामुळे राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीने दाणादाण उडविली आहे. अतिवृष्टी, तसेच पुरामुळे राज्यात लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात तर पिकांची माती झाल्याची स्थिती आहे. निसर्गाच्या या तडाख्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हतबल झाला आहे. अनेक ठिकाणी कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. तीन वर्षांपासून कपाशीला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. काही प्रमाणात कडधान्यांची पिकेदेखील अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. ५० लाख हेक्टर पेरण्यांच्या तुलनेत ५० टक्के खरीप हंगाम बाधित होण्याचा अंदाज आहे. यंदा उत्तर महाराष्ट्राला मोठी फटका बसला आहे. नाशिकला अतिवृष्टीमुळे कांदा, बाजरी, मका, सोयाबीन पिकांना पावसाचा फटका बसला, तर अतिपावसाने जमिनी खरवडल्या आहेत. शेतात सोंगून ठेवलेला मका, सोयाबीन भिजले आहे. मालेगाव तालुक्यात डाळिंब बागा पाण्याखाली गेल्या. कांदा पिकात पाणी जाऊन पात पिवळी पडली आहे. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात गिरणा परिसरात अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे अडीच ते तीन लाख हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांना फटका बसला आहे. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या भागात पिकंच काय पण नदी व नाल्यांवरील अनेक लहान पुल वाहून गेले आहेत. या पट्यात कापूस मातीमोल झाला आहे. काढणीला आलेल्या मालाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कपाशीची बोंडे काळी पडत आहेत. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी व कृषीक्षेत्रात एकामागून एक सुरु असलेली संकटांची मालिका संपायचे नाव घेत नाही. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले असून, राज्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने अनेक ठिकाणी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. एका बाजूला कोरोना व्हायरस संक्रमनाचे संकट. तर, दुसर्‍या बाजूला मुसळधार पावासामुळे होणारे शेतीचे नुकसान अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. 

पिकांसह शेतातील माती देखील वाहून गेल्यामुळे पंचनामे करणार तरी कशाचे?

गेल्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीतून सावरत नाही तोच आता पुन्हा एकदा चाळीसगाव, पाचोरा व जामनेर तालुक्यासह अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. वित्तहानीसह जीवतहानी देखील झाली आहे. पशुधनाचीही अपरिमित हानी झाली आहे. अतिवृष्टीसह पुराचा मार झेलणारा बळीराजा ओल्या दुष्काळाच्या भरून आलेल्या सावटाने चिंतातुर झाला आहे. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेती व्यवसायावर आर्थिक ताण आला आहे. शहरी बाजारपेठेलाही शेती अर्थकारणाला नख लागल्याने फटका बसला आहे. यंदा आतापर्यंत दमदार पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प फुल्ल भरले आहेत. अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, मन्याड, बोरी, गिरणा व वाघूर धरण ओव्हरफ्लो झाले असून, हतनूरमधे जास्त पाणी साठा झाल्याने त्यातून पाण्याच्या आवकमुळे विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसाठीही पाणी मिळणार आहे. ही सकारात्मक बाजू असली तरी दुसर्‍या बाजूला सध्या सुरु असलेल्या पावसाच्या धुमाकुळीमुळे शेतकर्‍यांच्या शेतात व डोळ्यात असे दोन्ही ठिकाणी पाणी आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पूरस्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदत पोहोचवा असे प्रशासनाला आदेश देतानाच शेतकर्‍यांनी धीर सोडू नये, असे आवाहन केले आहे. तर राज्यातील किती जिल्हे अतिवृष्टीग्रस्त आहेत, प्रत्यक्ष नुकसान किती झालेले आहे, याची माहिती युद्धपातळीवर गोळा केली जात आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करायचा, याबाबतचा निर्णय शासन घेईल, अशी माहिती पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मात्र दरवेळी राजकारणी केवळ घोषणा करतात. शेतकर्‍यांच्या हाती फारसे काहीच पडत नाही. दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीची मदत अनेक शेतकर्‍यांना अद्यापही मिळालेली नाही. आताची परिस्थिती भयंकरच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांसह शेतातील माती देखील वाहून गेल्यामुळे पंचनामे करणार तरी कशाचे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता पंचनामे न करता थेट आर्थिक मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी अशी अशी अपेक्षा आहे. खान्देशावर ओढवलेल्या या आस्मानी संकटात बळीराजाला शासनाकडून मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. यासाठी तात्काळ पंचनामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षिय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. 

Post a Comment

Designed By Blogger