भारतासाठी धोक्याची घंटा

भारताचा कुरापतखोर शेजारी म्हणून कुप्रसिध्द चीनने पुन्हा एकदा एलएसीवर कुरापती सुरु केल्या आहेत. लडाख जवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने ५० हजारहून अधिक सैनिक तैनात केल्यानंतर आता चीनी सैनिकांनी उत्तराखंडमध्ये मोठी घुसरखोरी केली आहे. भारताला उकसविण्यासाठी चीनने बाराहोती भागातील पूल तोडला आहे. १०० हून अधिक चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसत इन्फ्रास्ट्रक्‍चरची नासधूस केल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या वर्षी भारत आणि चीनच्या दरम्यान सीमेवर गलवान खोर्‍यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारताने चीनविरोधात आक्रमक भुमिका घेतली होती. सीमेवर सैन्य तैनात करण्यासह भारताने चिनी कंपनीच्या १००च्यावर अ‍ॅप्सवर बंदी आणली, अनेक आर्थिक करार मोडीत काढले, बायकॉट चायना मोहिमेला बळ देत आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनची कोंडी केल्यानंतर चीन काहीसा नरमलेला दिसत होता. मात्र आता पुन्हा एकदा चीनने आपले खरे रुप दाखविण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे अफगणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यानंतर तेथे चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. अशातच भारतीय सीमेजवळ चीन्यांच्या कुरापती भारतासाठी मोठी डोकंदूखी ठरु शकते.चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे जगभरात रोष

विस्तारवादी देश म्हणून कुप्रसिध्द असणार्‍या चीनने गेल्या आठवड्यात लडाखमधील भारतीय सीमेजवळ ५० हजारापेक्षा जास्त सैनिक तैनात केले असून भारतीय चौक्यांच्या खूप जवळून ड्रोन देखील उडविले. तसेच सीमेजवळ लढाऊ विमानांसाठी तळ तयार करण्यात येत असून या तळांवर शस्त्रास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. एलएसीवर सध्या परिस्थिती खूप नाजूक आहे. चीन सध्या शांत बसलेला नाही. तो आपल्या सैनिकांच्या तात्पुरत्या निवार्‍यांचा सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करत आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवर आणि तिबेटी गावांमध्ये चीनने सैन्य शिबिरे सुरु केली असतांनाच आता चीनी सैनिकांनी उत्तराखंडमध्ये घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमध्ये झालेली ही घटना ३० ऑगस्टला झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्याला कळेपर्यंत ते माघारी परतले होते. तुनतुन ला पास पार करून ५५ घोडेस्वार आणि १०० हून अधिक चिनी सैनिक भारतीय हद्दीत ५ किमीपेक्षा जास्त आतमध्ये घुसले होते. चीनचे हे सैनिक जवळपास ३ तास या भागात होते. हा भाग सैन्य नसलेला भाग आहे. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैनिक तिथे येणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. स्थानिकांनी आयटीबीपीला याची माहिती दिली. आयटीबीपीचे जवान तिथे जाईस्तोवर चिनी सैन्य नासधूस करून परतले होते. यावेळी चीन सैनिकांनी एक पुल देखील तोडला. बाराहोती भागात याआधीही चिन्यांनी घुसखोरी केलेली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये देखील अशा प्रकारची वृत्ते आली होती. तेव्ही तीनवेळा घुसखोरी झाल्याचे सांगण्यात आले होते. १९५४ मध्ये हा पहिला असा भाग होता जिथे चीनने घुसखोरी केली होती. यानंतर दुसर्‍या भागांवर कब्जा करण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर १९६२ चे युद्ध झाले होते. लडाखमध्ये भारतीय सैन्याने जमवाजमव सुरु केल्याने चीनने उत्तराखंडमध्ये आपला मोर्चा वळविल्याचे यावरून दिसत आहे. यामुळे ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. चीनच्या कुरापतींमुळे भारत-चीन सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढ चालला आहे. एकीकडे शांततेबाबत चर्चा करायची अन् दुसरीकडे पाठित खंजिर खुपसायचा, ही चीनची वृत्ती भारत १९६२ पासून अधून मधून अनुभवत आहे. यामुळे काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने आक्रमक भुमिका घेत ५९ चिनी मोबाइल ऍपवर बंदी घातली होती. चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी कंपन्यांशी करण्यात आलेले अब्जावधी रुपयांचे करार रोखत चिनी कंपन्यांना हायवे प्रकल्पांमध्ये बंदी, सरकारी टेलिकॉम कंपनी-रेल्वेने रद्द केलेली कंत्राटे यामुळे चीन बिथरला होता. आता अफगणिस्तानातील सत्ता बदलामुळे चीनने पुन्हा एकदा भारत विरोधी आघाडी उघडलेली दिसते. आधीच चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे जगभरात रोष निर्माण होत आहे. 

चीनशी थेट युध्द व्हावे, अशी अपेक्षा नसली तरी....

भारतासोबत चीनचा वाद सुरूच असून चीनचा जपानसोबत सेनकाकू बेटाच्या मुद्यावर तणाव वाढला आहे. तर, दक्षिण चीन समुद्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी चीनची धडपड सुरू असल्यामुळे अन्य देशांसोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. चीनने तैवानला धमकी दिल्यानंतर अमेरिकन नौदलाची युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात दाखल झाली आहे. ऑस्ट्रेलियाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिका-चीनच्या वाढत्या तणावाला लक्षात घेऊन लष्करावरील खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे की, आता ते इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपले सैन्य बळकट करतील आणि चीनला धडा शिकवण्यासाठी नेहमी सज्ज असतील. चीनशी थेट युध्द व्हावे, अशी कोणाचीही अपेक्षा नसली तरी राजनैतिक व्यूहरचनेची जी हुशारी भारताने दाखवणे अपेक्षित आहे त्यासाठी आता हीच वेळ आहे. ‘नया भारत’ कसा आहे, याची जाणीव देखील चीनला करुन देण्याची वेळ आलेली आहे. यासाठी चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडपणे आघाडी उघडण्याची गरज आहे. हाँगकाँग, तैवान, तिबेट यावरून भारताला जाहीर भूमिका घेऊन चीनपुढे समस्या निर्माण करता येणे अवघड नाही. यासह चीनने त्यांच्या देशातील मुस्लिमांचा वंशविच्छेद करण्याचे धोरण आखले आहे, यावरूनही आंतरराष्ट्रीय पातळीवरून आवाज उठवून चीनची कोंडी करणे भारताला शक्य आहे. आसाममध्ये काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, यामागे चीनचा हात तर नाही ना? यावरही मोदी सरकारला लक्ष ठेवावे लागणार आहे. आसाम, मिझोरम, लडाख आणि आता उत्तराखंड एकामागे एक प्रदेशात चीनच्या कुरापती भारतासाठी मोठ्या धोक्याची घंटा आहे. चीन विरोधातला लढा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचा नाही यामुळे चीनच्या मुद्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने होत असलेले राजकारण थांबविणे गरजेचे आहे. याच विषयावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांचे कान टोचले होते. मात्र त्याचा राहुल गांधींवर फारसा फरक पडलेले दिसत नाही. राजकारण करण्यासाठी देशात अनेक विषय आहेत मात्र किमान या विषयावरुन तरी राजकारण न करता सर्वांनी एकवटण्याची गरज आहे.


Post a Comment

Designed By Blogger