ग्लोबल वॉर्मिंगमुळे शहरबुडी!

ग्लोबल वॉर्मिंगच्या विषयावर नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. आता या चिंतेत अजूनच भर पडली आहे. पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने भविष्यात जाणवणार्‍या दुष्परिणामांचा इशारा संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाविषयीच्या ताज्या अहवालात देण्यात आला आहे. ग्लास्गोमध्ये संयुक्त राष्ट्राकडून जलवायू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला सुरुवात होण्याच्या आठवडाभर आधी संयुक्त राष्ट्राचा हवामान बदलाविषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हवामान बदलामुळे दुष्काळ आणि पुराची समस्या निर्माण होत आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आसामचा समावेश आहे. भारताची तब्बल ८० टक्के लोकसंख्या वास्तव्यास असलेल्या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. येत्या काही वर्षांत सरासरी तापमान दीड डिग्री सेल्सिअसने वाढणार असून त्याचा थेट परिणाम जगातील महत्त्वाच्या शहरांवर होणार आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई यांच्यासह समुद्र किनार्‍यावरील अनेक शहरे बुडण्याची भीती अहवालात नमूद करण्यात आली आहे.मानवासाठी धोक्याची घंटा

हवामानातील बदल, वाढते तापमान यांचा परिणाम दिवसागणिक अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, दरडी - हिमकडे कोसळणे यासारख्या घटना वाढत चालल्या आहे. मानवी कृत्यांमुळेच हवामानबदल, तापमानवाढ हे दुष्परिणाम घडत आहेत, यात कोणतीच शंका नाही. मानवी हस्तक्षेपामुळे १९७० पासून सागरी तापमानवाढ, त्याचबरोबर पृथ्वीच्या गोठलेल्या भागात बदल आणि समुद्राच्या आम्लीकरणास सुरुवात झाली. १९९०च्या दशकापासून आक्रि्टक समुद्रातील बर्फाळ भागात ४० टक्के घट झाली, तर १९५०पासून वसंत ऋतुतील बर्फावरण घटले आहे, याकडे या अहवालात लक्ष वेधले आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि चिंताजनक होत चालला आहे. ही तापमानवाढ सर्वत्र दिसणार आहे. तुम्हाला कुठेही सुरक्षित ठिकाण नसेल. कुठेही पळण्यास किंवा लपण्यासही जागा नाही. पृथ्वीची तापमानवाढ ही मानवासाठी धोक्याची घंटा आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’ (आयपीसीसी)चा सहावा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ - दी फिजिकल सायन्स बेसिस’ मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात भारताबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. भारताला येत्या काही काळात तीव्र चक्रीवादळांचा फटका बसणार आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि वारंवार पूर येऊ शकतील, हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये हिमकडे कोसळू शकतील आणि त्या सगळ्याच्या परिणामी सागरातल्या पाण्याची पातळी वाढण्याचा धोका आहे, असे अहवालात म्हटले आहे. पृथ्वीचे वाढते तापमान व त्याचे जागतिक दुष्परिणाम यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण बदलाबाबतच्या समितीने जगभरातील २३४ शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून हा जवळपास तीन हजार पानी अहवाल तयार केला आहे. या अहवालातील निष्कर्ष हे अत्यंत धक्कादायक व चिंतनीय असून, त्यावर ऊहापोह होणे गरजेचे आहे. आता या ताज्या अहवालानुसार, समुद्र किनारी वसलेल्या शहरांना जागतिक तापमान वाढीचा सर्वाधिक धोका आहे. पाणी पातळी वाढल्याने अनेक शहरे बुडण्याचा धोका आहे. जगातील जवळपास १५ कोटी लोकांच्या घरात भरतीवेळी पाणी जाऊ शकते. भारतातील ३.५ कोटी लोकांना अशा प्रकारच्या धोक्याला तोंड द्यावे लागू शकते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तापमान वाढीचा मोठा धोका आहे. मुंबईतील निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या वर्षागणिक वाढत जाईल. २१०० पर्यंत शहरातील काही भाग पाण्याखाली गेलेले असतील. 

वृक्षतोड करून रस्ते, पूल उभारणे, डोंगर फोडून बोगदे काढणे म्हणजेच विकास का?

अतिवृष्टी व त्यातून निर्माण होणार्‍या पूरस्थितीचा अनुभव भारतासारख्या देशासाठी नवीन नाही. ढगफुटीसदृश पाऊस, अतिवृष्टीमुळे आलेले पूर, दरडी कोसळणे अशा घटना सध्या वारंवार घडताना पहायला मिळत आहेत. वाशिष्ठी नदीच्या किनार्यावरील चिपळूण पाण्यात बुडणे असो वा कोल्हापूर, सांगलीसारख्या शहरांना पुराने वेढणे असो. निसर्ग किती रौद्र होऊ शकतो, याचीच ही उदाहरणे. हवामान बदलाची वा तापमानवाढीची ही प्रक्रिया काही नैसर्गिक नव्हे. तर त्यामागे मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, हेदेखील ध्यानात घेतले पाहिजे. बेसुमार वृक्षतोड करून रस्ते, पूल उभारणे, डोंगर फोडून बोगदे काढणे म्हणजेच केवळ विकास का, याचा कुठेतरी विचार व्हावा. कोणत्याही देशाच्या, जगाच्या पर्यावरणासाठी तेथील निसर्गाची साखळी अबाधित राहणे आवश्यक असते. मात्र, तेथील जैवविविधतेशी तडजोड केली जात असेल, तर त्यातून ही साखळी तुटून नवनव्या संकटांना आमंत्रण मिळू शकते. केरळ, कोकणपासून, उत्तराखंडपर्यंत हेच पहायला मिळते. त्यात वाढते औद्योगिकीकरण, कार्बन वायू उत्सर्जन, वाहनांचे प्रदूषण आदी घटक तापमानवाढीस कारणीभूत ठरताना दिसतात. त्यात नदीपात्रात केली गेलेली अवैध बांधकामे, नैसर्गिक ओढ्या-नाल्यांचे प्रवाह संकुचित करणे या गोष्टी पूरस्थितीत भर घालतात. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासाची कास धरल्याशिवाय मानवी जीवन पुढे जाऊ शकत नाही, हे खरेच. परंतु, विकासाची नेमकी व्याख्या काय, हेही ठरवायला हवे. देशाच्या, जगाच्या पर्यावरणासाठी तेथील निसर्गाची साखळी अबाधित राहणे आवश्यक असते. मात्र, तेथील जैवविविधतेशी तडजोड केली जात असेल, तर त्यातून ही साखळी तुटून नवनव्या संकटांना आमंत्रण मिळू शकते. याचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत. ग्लोबल वॉर्मिंगसाठी आपणच कारणीभूत आहोत. कारण आपण जितकी जीवाश्म इंधने जाळतो, तितक्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड इत्यादी हरितगृह वायू निर्माण होतात. पृथ्वीच्या सभोवताली असणार्‍या वातावरणातील तपांबर आणि स्थितांबरात या वायूचे दाट आवरण बनते. पूर्वीच्या काळी सूर्यापासून येणारी उत्सर्जित उष्णता काही प्रमाणात परावर्तित होऊन, या वातावरणाच्या थरांतून बाहेर फेकली जात होती; त्यामुळे पृथ्वी इतकी तापत नव्हती. आता या हरितगृह वायूंचे जाड पांघरूण ही उष्णता बाहेर पडू देत नाही. त्याउलट याच वायूंच्या आवरणाला आदळून ती पुन्हा परावर्तित होऊन पृथ्वीपर्यंत पोहोचते. यामुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व बाबींवर ठोस उपाययोजनांची आखणी व अंमलबजावणी होण्याची गरज आहे.  

Post a Comment

Designed By Blogger