काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर पडदा!

काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (काँग्रेस वर्किंग कमिटी) नुकतीच पार पडली. या बैठकीत घडलेल्या दोन घटना महत्वपूर्ण म्हणता येतील. बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कारभारावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टीका करणारा पक्षातील ‘जी-२३’च्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधत, ‘मी पक्षाची स्थायी अध्यक्ष आहोत. माझ्याशी संवाद साधण्यासाठी माध्यमांचा आधार घेण्याची गरज नाही, असे स्पष्ट शब्दात सुनावले. यानिमित्ताने त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा विषय संपुष्टात आणला व त्याचवेळी पक्षातील बंडखोर नेत्यांचे कान देखील टोचले. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह लखीमपूर खेरी, शेतकरी आंदोलन, भाववाढ आणि पक्षांतर्गत निवडणुका यावरही चर्चा झाली. या बैठकीच्या निमित्ताने काँग्रेस संघटनेने विचारमंथन केले, हे बरे झाले. या बैठकीच्या निमित्ताने सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतचा विषय संपुष्टात आणला असला, तरी पक्ष संघटना अधिक सक्रिय करण्यासाठी पक्षाला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत हे विसरुन चालणार नाही.



तब्बल १८ महिन्यानंतर काँग्रेसची पहिली ऑफलाईन बैठक 

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसची डोकंदुखी वाढतच चालली आहे. नाराज काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर आणि पंजाबमध्ये कलह वाढल्यानंतर अनेक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची बैठक घेण्याची मागणी केली. ज्या प्रकारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकण्यात आले आणि नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावरून नाराज नेते टीका करत आहेत. त्याआधी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्याची मागणी केली होती. गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची तात्काळ बैठक घेण्याचे आवाहन केले होते. तर कपिल सिब्बल यांनी पंजाब काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींवरुन पक्ष नेत्रृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. यापार्श्‍वभूमीवर झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला निश्‍चितपणे महत्व होतेच. मुळात तब्बल १८ महिन्यानंतर काँग्रेसची पहिली ऑफलाईन बैठक झाली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. या निवडणुकांमुळे सध्या संघटनात्मक निवडणूक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात निवडणूक घेऊन पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल, अशी शक्यता बैठकीनंतर वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसचा पूर्णवेळ अध्यक्ष हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपाटून मारखावा लागला होता. या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर पक्षाची कमान सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून आपल्या हाती घेतली. मात्र, असे असताना पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा आहे असी मागणी पक्षातील नेत्यांकडून वारंवार होत होती. यासोबतच काही ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली. उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेनंतर पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी ज्या प्रकारे हा विषय हाताळला आणि सरकार विरोधात वातावरण निर्मिती केली त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत निश्चितच राहुल गांधी यांचे नेतृत्व उठून दिसले. शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेसला फारसा फायदा उचलता आलेला नाही. मात्र लखीमपूर खेरीच्या मुद्यांवरुन काँग्रेसने विशेषत: राहुल गांधी यांनी भाजपविरोधी वातावरण निर्माण करुन काँग्रेसमध्ये जोश भरला आहे. 

आडमुठ्या भुमिकेमुळे काँग्रेसचे मोठे नुकसान

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा हार पत्करावी लागल्यानंतर राहुल गांधी एकदमच कोशात गेले होते. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत राहुल गांधी पुन्हा एकदा सक्रिय झाले असून नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात चांगले वातावरण निर्मिती त्यांनी केली आहे. ज्या प्रकारे त्यांनी आणि प्रियांका गांधी यांनी लखीमपूर प्रकरणाचा विषय उचलला ते पाहता राजकारणात एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची योग्य वाटचाल चालू आहे, असे म्हणावे लागेल. येणार्‍या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अंतर्गत गटबाजी देखील दूर ठेवावी लागणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी म्हणून काँग्रेसला आपल्या या पक्ष संघटनेवरच आता लक्ष द्यावे लागणार आहे. ज्या प्रकारे गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये किंवा राजस्थानमध्ये पक्षांतर्गत वादळ निर्माण झाले होते. त्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी काळजीही घ्यावीच लागणार आहे. पुढील वर्षाच्या मध्यात काँग्रेस पक्ष संघटनेची निवडणूक होणार आहे त्यापूर्वी सदस्य नोंदणी केली जाणार आहे. या अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम काँग्रेस पक्ष संघटना करू शकते. या पाच राज्यांची निवडणूक म्हणजे २०२४ मध्ये होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीमच म्हणावी लागेल. मात्र अजूनही काँग्रेसची पुढची वाटचाल सोपी नाही. काँगे्रस वर्किंग कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील एका नाराज गटाला शांत करण्याचे प्रयत्न जरी सोनिया गांधी यांनी केले असले, तरी या गटाचे म्हणणेही लक्षात घ्यावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष सोडून भाजप किंवा इतर पक्षांमध्ये जाणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. किमान पक्ष सोडून जाणार्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी सूचना या नाराज गटाने केली आहे, तीसुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. पक्ष कोणीही सोडून गेले तरी आमच्यावर काही फरक पडणार नाही, ही भूमिका आता विद्यमान परिस्थितीत काँग्रेसला स्वीकारता येणार नाही. कारण याच आडमुठ्या भुमिकेमुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. याची मोठी किंमत पक्षाला चुकवावी लागली आहे. दुसरे म्हणजे जी-२३ गट हा पक्षातील अनुभवी नेत्यांचा आहे. जर एकाच मुद्यावरुन ते वारंवार नाराजी व्यक्त करत असले तर त्यात नेमकं काय चुकतयं? याचं तटस्थ मुल्यमापन काँग्रेस पक्षाला करावं लागणार आहे.


Post a Comment

Designed By Blogger