माहीची जादू कायम

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची कमाल दाखवली असून आयपीएलमध्ये चेन्नईला चौथ्यांदा ट्रॉफी जिंकवून दिली आहे. कोलकातासोबत झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने अत्यंत सहजपणे विजय खेचून आणला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या चेन्नईचे हे चौथे आयपीएल जेतेपद ठरले. आयपीएलमध्ये चेन्नई सूपर किंग्ज संघाचे नेतृत्व करताना त्याने याआधी २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये त्याने आयपीएल ट्रॉफीवर चेन्नईचे नाव कोरले आहे. यंदाच्या आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात दोन विश्‍वचषक विजेते कर्णधार आमने-सामने उभे ठाकले होते. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने २०११ साली विश्‍वचषक जिंकला होता. तर कोलकात्याचा कर्णधार ऑईन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने २०१९ मध्ये विश्‍वचषक स्पर्धा जिंकली होती. धोनीने कसोटी, एकदिवसीय व टी ट्वेंटी सामन्यांमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने मिळवलेला हा विजय खास ठरतो. आयपीएलमध्येही एक यशस्वी कर्णधार 

चौकार, षटकारांची आतषबाजी, अटीतटीचे सामने, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, चीअर लीडर्स आदी रंगानी सजलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून परिचित असलेल्या भारतात प्रचंड क्रेझ आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल मध्येच थांबविण्यात आला होता. एकवेळतर आयपीएल रद्दच झाल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते मात्र सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ओळखली जाणारी आयपीएल रद्द होणे परवडणारेच नव्हते. गत वर्षाप्रमाणे यंदाही आयपीएलचे उर्वरित सामने दुबईत खेळविण्यात आले. विशेष म्हणजे यंदा मैदानात सामने पहाण्यासाठी प्रेक्षकांनाही परवानगी देण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ आधीच बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळूरु चॅलेंजर्स व धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र कोलकात्याचा कर्णधार ऑईन मॉर्गनच्या संघाने विराटसेनेचे स्वप्न भंग करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यान दोन्ही संघाचे पारडे तुल्यबळच होते. किंबहुना पहिल्या दहा ओव्हर्सपर्यंत सामना कोलकत्याकडे झुकला होता. मात्र दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने स्वतःच्या अनुभवाचा व कौशल्यांचा पुरेपूर वापर करत महत्त्वाच्या क्षणी सामना आपल्या बाजूने झुकवला. डावपेच आखण्यात धोनीचा हात कोणी धरू शकत नाही, हे स्पष्ट होते. धाडसी निर्णय घेताना त्याच्या सकारात्मक परिणामांचाच तो विचार करीत असतो. यष्टिमागे उभा राहून मैदानाची व्यूहरचना सांभाळण्यात तो माहीर झाला आहे. कितीही दबावाची स्थिती असली, तरी डोक्यावर बर्फ ठेवून  ती हाताळण्याचे कसब धोनीला अवगत झाले आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा पहायला मिळाली. भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार, भारताचा सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक, २००७ मध्ये टी-ट्वेंटी विश्‍वचषक करंडक, २०११मध्ये एकदिवसीय क्रिकेटचा विश्‍वचषक करंडक आणि २०१३ या वर्षी ‘चँपियन्स ट्रॉफी’ जिंकणारा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव कर्णधार आणि आयपीएलमध्येही एक यशस्वी कर्णधार अशी धोनीची बहुपैलू ओळख आहे. भारतीय क्रिकेट संघात तुफानी वेग आणि ऊर्जा आणण्याचे श्रेय ‘बेस्ट फिनिशर’ म्हणून नावाजलेल्या कर्णधार धोनीलाच द्यावे लागेल. धोनीची जादू अजूनही कायम आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. 

धोनीच्या अनुभवाचा निश्‍चितपणे फायदा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सूपर किंग्ज संघाचे नेतृत्व करताना त्याने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये त्याने आयपीएल ट्रॉफीवर चेन्नईचे नाव कोरले. तसेच चॅम्पियन्स लीग टी-२० मध्येही २०१० आणि २०१४ चे जेतेपद जिंकून दिले आहे. गेल्या वर्षभरापासून धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु होती. २०१९ विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीला टीकाही सहन करावी लागली. धोनीच्या बॅटमधील जादू कमी झाल्यानंतर धोनी संपला अशी चर्चा होऊ लागली. वर्षभरासाठी धोनी भारतीय संघाबाहेर होता. पण गेली अनेक वर्ष भारतीय संघाचा भार आपल्या खांद्यावर वाहणार्‍या धोनीने कोणताही गाजावाजा न करता, कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीसाठी प्रयत्न न करता निवृत्त व्हायचे ठरवले व तशी घोषणाही केली. धोनीने आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय कायम राखला. गेल्या मोसमात चेन्नईच्या संघाची जादू काही चालली नाही. यंदाची आयपीएल धोनीची शेवटची आयपीएल असू शकते, यामुळे धोनीने स्वत:च्या नावलौकीकाला शोभेल असचा गोड शेवट केला आहे. महेंद्रसिंह धोनीने कोलकाताविरुद्धच्या अंतिम सामन्यात अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून धोनीचा हा ३००वा सामना होता आणि ही कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पहिलाच खेळाडू ठरला. धोनीने चेन्नईचे २१४ सामन्यांत नेतृत्व केले आहे. चेन्नई संघाची २०२० मधील कामगिरी ही चाहत्यांसाठी नव्हे तर प्रतिस्पर्धी संघांसाठी देखील धक्का देणारी होती. अनेकांनी धोनी आणि संपूर्ण संघावर टीका देखील केली होती. धोनीने निवृत्ती घ्यावी, डॅडी आर्मीने आता मोठे बदल केले पाहिजेत असे सल्ले देखील मिळाले होते. पण धोनीने तेव्हा देखील एकच गोष्ट सांगितली होती ती म्हणजे गोष्टी साध्या ठेवा आणि प्रोसेसला फॉलो करा. चेन्नईच्या आयपीएलमधील या सर्वात वाईट कामगिरीनंतर कर्णधार धोनीला जेव्हा विचारण्यात आले की आता पुढे काय? तेव्हा त्याने दिलेले उत्तर आजच्या आयपीएल विजयाने पूर्ण झाले. धोनी म्हणाला होता, आम्ही जोरदार कमबॅक करू, ज्यासाठी आम्ही ओळखले जातो. आयपीएलच्या मागील पर्वात स्पर्धेबाहेर होणारा पहिला संघ ते आयपीएल २०२१मध्ये जेतेपद... चेन्नई सुपर किंग्सच्या या फिनिक्स भरारीची चर्चा झाली नसती तर नवलच! आयपीएलचे अजून एक महत्व म्हणजे, आयपीएलमधून प्रत्येक वर्षी असे काही खेळाडू पुढे येतात आणि त्यातून भारतीय क्रिकेटच्या नवी पिढीची जडणघडण होऊ लागते. यंदाच्या आयपीएलचे अजून एक महत्त्व म्हणजे, या स्पर्धेत सर्वच संघातील नवोदितांनी त्यांच्या प्रमुख खेळाडूंपेक्षाही जास्त भरीव कामगिरी करून आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. ऋतुराज गायकवाड, व्यकंटेश अय्यर यांसारखे खेळाडू पुढे आले हेच या स्पर्धेचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. आता टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अन्य सर्व संघांना धूळ चारण्यासाठी सज्ज असणार आहे. यात पडद्यामागे धोनीचा मोठा रोल असणार आहे. टीम इंडियासाठी धोनी मार्गदर्शकाच्या भुमिकेत राहिल. धोनीच्या अनुभवाचा निश्‍चितपणे फायदा होणारच आहे.


Post a Comment

Designed By Blogger