दोन आठवड्यांपूर्वी दुष्काळाच्या फेर्यात येऊ पाहणार्या खान्देशात विशेषत: जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पावसाची संततधार गेले आठ दिवस कायम असल्याने परिसरावर ओल्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. त्यामुळे पिकांची वाटचाल दुष्काळाकडून ओल्या दुष्काळाकडे झाली आहे. गेल्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीतून सावरत नाही तोच आता जामनेर तालुक्यासह अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. वित्तहानीसह जीवतहानी देखील झाली आहे. पशुधनाचीही अपरिमित हानी झाली आहे. अनेकांची घरे, संसार पुरात स्वाहा झाली. अतिवृष्टीसह पुराचा मार झेलणारा बळीराजा ओल्या दुष्काळाच्या भरून आलेल्या सावटाने चिंतातुर झाला आहे. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेती व्यवसायावर आर्थिक ताण आला आहे. शहरी बाजारपेठेलाही शेती अर्थकारणाला नख लागल्याने फटका बसला आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, बहुतांश जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, लाखो हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. शेतात कुठे गाळ साचला तर कुठे खरडून गेले आहे.
शेतकर्यांच्या शेतात व डोळ्यात पाणी
शेतकरी व कृषीक्षेत्रात एकामागून एक सुरु असलेली संकटांची मालिका संपायचे नाव घेत नाही. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले असून, राज्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने अनेक ठिकाणी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. एका बाजूला कोरोना व्हायरस संक्रमनाचे संकट. तर, दुसर्या बाजूला मुसळधार पावासामुळे होणारे शेतीचे नुकसान अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अजून किमान तिन-चार दिवस पाऊस सुरु राहणार आहे. राज्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहेच, पण जगायचे कसे आणि मरायचे कसे या विवंचनेत आहे. आधीच शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. त्यात आता पावसाने भर घातली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव व जामनेर तालुक्यातला पावसाचा फटका मोठ्या प्रमात बसला आहे. यंदा आतापर्यंत दमदार पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प फुल्ल भरले आहेत. अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, मन्याड, बोरी, गिरणा व वाघूर धरण ओव्हरफ्लो झाले असून, हतनूरमधे जास्त पाणी साठा झाल्याने त्यातून पाण्याच्या आवकमुळे विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव शहरांसह १५८ ग्रामीण पाणीयोजनांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसाठीही पाणी मिळणार आहे. ही सकारात्मक बाजू असली तरी दुसर्या बाजूला सध्या सुरु असलेल्या पावसाच्या धुमाकुळीमुळे शेतकर्यांच्या शेतात व डोळ्यात असे दोन्ही ठिकाणी पाणी आले आहे. गेल्या तिन दिवसात झालेल्या वादळी वार्यासह झालेल्या पावसाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. यासोबतच मका, ज्वारी, कापूस या पिकांचेही नुकसान झाले आहे. केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. कपाशी पूर्णत: झोपली आहे तर ज्वारीचे व मक्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
.... तेंव्हाच शेतकर्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसता येतील
Post a Comment