अजिंक्य पंजशीर

तालिबानने अफगाणिस्तानवर वेगाने वर्चस्व मिळवले. सरकार स्थापनेच्या दृष्टीनेही तालिबानने पावले उचलण्यास सुरुवात केली. मात्र, तरीही त्यांच्यासमोर एक अडचण आहेच, ती म्हणजे पंजशीर खोरे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या ईशान्येकडील पंजशीर खोर्‍यातील राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चाचे योद्धे तालिबानसमोर आव्हान बनून उभे आहेत. चहूबाजूंनी तालिबानने घेरलेले असूनही हे योद्घे हार मानायला तयार नाहीत. तालिबान एकीकडे अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करत आहे. तर दुसरीकडे पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी लढा देत आहे. मागील काही दिवसांपासून पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडी आणि तालिबान यांच्या हिंसक घडामोडी घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी तालिबानने पंजशीरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर तालिबानने पंजशीरची राजधानी बझारक येथे आपला झेंडा फडकावला होता. पण नॉर्दन आघाडीने तालिबानचा दावा फेटाळून लावला आहे. ऐकेकाळी सोव्हिएत रशियाच्या फौजांनाही जिंकता न आलेला अफगाणिस्तानचा अजिंक्य असलेला पंजशीर हा भाग मिळविण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागत आहे.राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चाच्या योद्ध्यांचे घर

पंजशीर प्रांतामध्ये पंजशीर खोरे आहे. परवान प्रांताची विभागणी करून एप्रिल २००४  मध्ये हा भाग वेगळा करण्यात आला होता. पंजशीरचा अर्थ म्हणजे पाच सिंहांचे खोरे. काबूलपासून १५० किलोमीटर अंतरावर हा प्रांत आहे. या खोर्‍यातून पंजशीर नदी वाहते. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे. तालिबानने हा प्रांत ताब्यात घेण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरला आहे. अमेरिकेकडून बॉम्बचा वर्षाव होत असतानाही पंजशीर प्रांत सुरक्षित राहिला होता. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील हे खोरे राष्ट्रीय प्रतिरोध मोर्चाच्या योद्ध्यांचे घर बनले आहे. अनेक समूह-गटांशी जोडलेले हे लोक अफगाण सुरक्षा दलाचे माजी सदस्य आहेत. यांची संख्या हजारोंच्या संख्येत आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह सुद्धा राष्ट्रीय प्रतिरोध मोचामध्ये सहभागी झाले. मात्र, या योद्ध्यांचा नेता पंजशीरचा वाघ म्हटले जाणार्‍या अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद आहे. अहमद शाह यांनी १९८० च्या दशकात सेव्हिएत युनियनच्या आक्रमणाला रोखले होते. मात्र, १९९० च्या दशकात तालिबानलाही पंजशीरपासून दूर ठेवले होते. तालिबानविरोधात लढण्यासाठी उत्तरी आघाडीला भारतासह ईराण, रशिया, तुर्की, ताजिकीस्तान, उझबेकीस्तान आणि तुर्कमेनिस्तानची मदत मिळत होती. या भागात ताजिक समुदायासह हजारा समुदायाचेही नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. या समुदायाला चंगेज खानचे वंशज म्हणून ओळखले जाते. याशिवाय नूरीस्तानी आणि पशई यासारख्या समुदायाचे लोकही राहतात. हे सर्व कट्टर लढवय्ये आहेत. गोरिल्ला युद्धात त्यांचे प्राविण्य आहे. तसेच पर्वतरांगांचा भाग असल्यामुळे त्यांना पराभूत करणे अतिशय कठीण आहे. उत्तरी आघाडीमुळेच या समुदायांमध्ये तालिबानविरोधात लढण्याचे बळ प्राप्त झाले आहे. मात्र तालिबानने पंजशीर घाटीवर पूर्णपणे कब्जा केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी अज्ञात स्थळी आसरा घेतला आहे. पंजशीरचा सिंहचा मुलगा अहमद मसूद गेल्या तीन दिवसांपासून ताजिकिस्तानमध्ये गेला आहे. यामुळे पंजशीरमध्ये लढवय्यांना कोणीच वाली उरला नसल्याने त्यांचेही मानसिक खच्चीकरण होत आहे. रविवारपासून पाकिस्तानने हवाई हल्ले सुरु केले असून यामध्ये सालेह यांच्या घरावरही बॉम्बफेक करण्यात आली. अहमद मसूद यांनी म्हटले की, तालिबानी आमच्याविरोधात लढत नसून आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे. 

पंजशीरच्या निकालावरच अफगणिस्तान व तालीबानचे भवितव्य 

तालिबानी दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून पंजशीरची शहरे घेरली होती. यानंतर त्यांनी रविवारी रात्री जोरदार हल्ला चढविला. जमिनीवरून आक्रमण होत असताना पंजशीरच्या रेझिस्टंस फ्रंटचे कंबरडे मोडण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोन आणि लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे हल्ले चढविले. यामध्ये अहमद मसूद यांचा जवळचा नेता फहीम दश्ती आणि टॉपचा कमांडर जनरल साहिब अब्दुल वदूद झोर मारला गेला आहे. मसूद आणि सालेह यांनी पलायन केल्याने सोमवारी सकाळी तालिबानने पंजशीर जिंकल्याचा दावा केला आहे. मात्र परस्पर विरोधी दाव्यांमुळे अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या हस्तक्षेपाविरोधात लोकांचा रोष उफाळून येत आहे. काबूलमध्ये काल रात्री महिलांनी पाकिस्तानविरोधात जोरदार निदर्शने केली आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तालिबानचे अत्याचार आणि पाकिस्तानातील घुसखोरीच्या विरोधात हे एक प्रदर्शन म्हणून वर्णन केले जात आहे. महिला गेल्या अनेक दिवसांपासून अफगाणिस्तानच्या विविध शहरांमध्ये त्यांच्या हक्कांसाठी निदर्शने करत आहेत, परंतु काबूलमध्ये प्रथमच रात्री निदर्शने झाली आहेत. दुसर्‍या बाजूला अफगाणिस्तानातील तालिबानी सत्तेमुळे भारताच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पाकिस्तानची कुरघोडी आणि भारतीय सीमा सुरक्षित ठेवण्याचे आव्हान भारतासमोर उभे ठाकले आहे. दक्षिण-पश्चिम आशियात सीआयएचे माजी दहशतवाद विरोधी प्रमुख डगलस लंडन यांनी भारतासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर तालिबानच्या जोरावर पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढण्याची शक्यता आहे आणि भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले. अफगाणिस्तानातील सरकार स्थापन करण्यासाठी तालिबान वेगाने प्रयत्न करत आहे. यातच पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे प्रमुख देखील अफगाणिस्तानच्या दौर्‍यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. यातच अफगाणिस्तानातील परिस्थिती अजूनही स्थिर नसून यावर इतक्यात काही भूमिका किंवा प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही, असा पवित्रा भारत सरकारने घेतला आहे. तेथील परिस्थिती स्थिर होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय आता भारतासमोर राहिलेला नाही. पंजशीरच्या घडामोडींवर देखील भारत पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. पंजशीरच्या निकालावरच अफगणिस्तान व तालीबानचे भवितव्य ठरणार आहे, हे स्पष्ट आहे.

Post a Comment

Designed By Blogger