देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरात राज्याला आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने खूप महत्व आहे. घरचं मैदान राखलं तरच त्याचा काही फायदा देशपातळीवर होऊ शकतो, याची जाणीव मोदी व शहा यांना असल्याने गुजरातमध्ये मोठे फेरबदल करत रुपाणी यांना हटवून भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर बसविण्यात आले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री राहिलेले नितीन पटेल, पुरुषोत्तम रुपाला, प्रफुल्ल पटेल असे अनेक चर्चेतले नावे चर्चेत होते. शेवटी या नावांची फक्त चर्चाच ठरली. कारण राजकीय अंदाज-आडाख्यांना चकवा देत आणि चर्चेत असलेल्या नावांवर फुली मारत भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर भूपेंद्र पटेल यांना बसविले. गुजरातचा मुख्यमंत्री निवडताना भाजपाने पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबले. मात्र भूपेंद्र पटेल यांची वाट सोपी नसेल.
आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात
गुजरातची दोन दशकाची सत्ता राखण्याचे सर्वात मोठे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आहे. देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. असे असले तरी होम ग्राऊंड राखलं तरच त्याचा काही फायदा देशपातळीवर होऊ शकतो. गुजरातमध्ये मागच्या वेळेस भाजपाला सत्तेची खूर्ची मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. त्यावेळेस आपची आताएवढी चर्चाही नव्हती आणि ताकदही. पण सुरतच्या स्थानिक निवडणुकीत आपने चांगले यश मिळवले. तीच भाजपासाठी धोक्याची घंटा मानली जाते आहे. आपला यश मिळताना दिसताच काही मोठ्या व्यक्तीही गुजरात आपमध्ये सहभागी झाल्यात. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आपमध्ये सध्या तरी मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. हे देखील मुख्यमंत्री बदलामागील एक कारण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आधीच कोरोना व लॉकडाऊनच्या काळात नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला ओहटी लागली. दिवसेंदिवस वाढती महागाई व बेरोजगारी ही मोदी सराकारपुढील मोठी आव्हाने आहेत. याचा परिणाम आगामी सर्व निवडणुकांवर होईल, याची जाणीव भाजपालाही असल्याने त्यांनी आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून गुजरातमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. रुपाणी यांना हटवून पटेल यांना मुख्यमंत्री पदावर बसवितांना अनेक गणितं आखली गेली आहेत. भूपेंद्र पटेल हे २०१७च्या विधानसभा निवडणुकीत घाटलोडिया मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार शशिकांत पटेल यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करून निवडून आले होते. त्या निवडणुकीतील हे सर्वांत मोठे मताधिक्य होते. मृदुभाषी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणारे भूपेंद्र पटेल २०१७मध्ये अहमदाबादमधील घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आले. पटेल यांनी महापालिकेतून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांनी अहमदाबाद नगरविकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्याआधी ते अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. स्थापत्य अभियांत्रिकीचे पदविकाधारक असलेले ५९ वर्षीय पटेल पाटीदार समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी काम करणार्या ‘सरदारधाम विश्व पाटीदार केंद्रां’चे विश्वस्तही आहेत. भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात.
दोन दशकाची सत्ता राखण्याचे आव्हान
रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात आलेले अपयश हे प्रमुख कारण असलेले सांगितले जात आहे. तसेच गुजरातमध्ये विरोधी पक्षांचा जनाधार वाढला आहे. उद्या गुजरातमध्ये पानीपत झाले तर त्याचा देशभर मेसेज जाऊन मोदी आणि भाजपच्या लोकप्रियतेला आहोटी लागेल या भीतीनेच रुपाणी यांना हटवण्यात आल्याचे दिसते. शिवाय पुढच्या वर्षी होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणांसाठीही रुपाणी यांना पायउतार व्हावे लागले आहे, हेच अंतिम सत्य आहे. २०१५ मध्ये गुजरातमध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे भाजपला नागरी आणि पंचायत निवडणुकीत प्रचंड नुकसान सहन करावे लागले. यानंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही याच आंदोलनामुळे भाजपला बर्याच आव्हानाला सामोरे जावे लागले होते. याचीच पुनरावृत्ती येत्या २०२२ मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये किंव्हा त्याही पलीकडे जाऊन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून भाजपने काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. येत्या निवडणुकीपूर्वी पाटीदार समाज पुन्हा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मागील आरक्षण आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले हार्दिक पटेल गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष झाले आहेत. काँग्रेसमधील त्यांच्या दुर्लक्षामुळे हार्दिक नाराज आहे आणि पाटीदार आरक्षण आंदोलन समितीच्या जुन्या साथीदारांना पुन्हा सामील करून पुन्हा पाटीदार समाजाची ताकद दाखवण्याच्या मूडमध्ये आहेत तेही दिसून येतेय. मुख्यमंत्री म्हणून जरी भूपेंद्र पटेल यांची निवड झाली असली तरी त्यांच्यासमोरचे आव्हान लहान नाही. गुजरातमध्ये सुरतसह अनेक ठिकाणी केजरीवालांच्या आपने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे मागच्या वेळेसच काँग्रेसने भाजपला चांगलेच खिंडीत पकडले होते. त्यामुळेच भाजप ९९ जागांच्या फेर्यात अडकली. यावेळेस तर गुजरातमध्ये बदलाचे वारे वाहतायत. सत्ताविरोधी वातावरण असल्याची चुणूक काही सर्वेतून दिसून आलीय. गुजरातमध्ये भाजपची दोन दशकांपासून सत्ता आहे. त्यामुळे भाजपविरोधी काही वातावरण असू शकते. अशा परिस्थितीतच भाजपची सत्ता राखण्याचे मोठे आव्हान भूपेंद्र पटेल यांच्यासमोर असेल. अर्थातच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भूपेंद्र पटेलांच्या बाजूने वजन टाकल्याशिवाय हे शक्यही झाले नसणार. त्यामुळेच गुजरातमध्ये पुढच्या दीड वर्षात काय काय घडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Post a Comment