काँग्रेस आता तरी चुका सुधारणार का?

गत आठवड्यात काँग्रेसशी निगडीत दोन अत्यंत महत्वपूर्ण बाबी घडल्या. पहिली म्हणजे, काँग्रेसची आजची स्थिती रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे, असा आरसा भाजपाने नव्हे तर खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दाखविला तर दुसरी म्हणजे, गत सात वर्षात एकूण २२२ नेते काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये सामील झाले. यामध्ये १७७ खासदार आणि आमदारांचाही समावेश आहे, अशी माहिती माहिती निवडणूक राजकारणावर नजर ठेवणारी संस्था असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालाच्या माध्यमातून समोर आली. लोकसभेत २०१४ मध्ये पराभव झाल्यावर काँग्रेस आणखी जर्जर झाली असून आपले नेतेही सांभाळता येत नाहीत हे वरील दोन्ही बाबींवरुन अधोरेखीत होते. सध्यस्थितीलाही काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांचा ‘जी-२३’ गट व गांधी परिवार समर्थक गट अशी उघड दुफळी काँग्रेसमध्ये पडत चालली आहे. काँगेसमधील नेत्यांना या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव आहे मात्र ते अजूनही सत्य मानायला तयार नसल्याने काँग्रेसचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे.काँग्रेसचे धोरण व स्वपक्षातील काही नेतेच जबाबदार 

काँग्रेसची आजची स्थिती रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी काँग्रेसला जागा दाखवून दिली आहे. याविषयी बोलताना शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील जमीनदारांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, एका जमीनदाराकडे हजारो एकर शेती, गावात हवेली असते. पण लँड सिलिंगचा कायदा आला अन् जमीन गेली. हवेली तशीच राहिली तरी त्याची दुरूस्ती करण्याची ताकद त्याच्यात नाही. हजारो एकर जमिनीपैकी आता केवळ १५-२० एकर जमीन उरली आहे. हा जमीनदार सकाळी उठून हवेलीतून बाहेर येत म्हणतो की, ही आजूबाजूला असलेली हिरवीगार शेती माझी होती. तो माझे होते असे म्हणतो. पण आता ते नाही, असे सांगत पवार यांनी काँग्रेची अवस्था याच जमीनदारासारखी झाल्याचे सुचक विधान केले. पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेस होती. पण ती होती, आता नाही. हे पक्षाने मान्य करायला हवे. ही मानसिकता बदली तर इतर जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही पवार म्हणाले होते. पवार चुकीचे काहीच बोलले नाहीत. याचे मुल्यमापन करण्यासाठी असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सचा अहवाल पुरेसा आहे. गेल्या सात वर्षांत सर्वाधिक खासदार, आमदार आणि नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांचा झेंडा हाती घेतला आहे, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून प्रकाशित केलेल्या एका अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. या अहवालानुसार, २०१४ ते २०२१ दरम्यान एकूण २२२ नेते काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये सामील झाले. यामध्ये १७७ खासदार आणि आमदारांचाही समावेश आहे. ही आकडेवारी पाहता शरद पवारांचे काहीच चुकले नाही, हे स्पष्टपणे जाणवते. सन २०१४ साली आलेल्या मोदी लाटेत होत्याचं नव्हतं झालेल्या काँग्रेसची अवस्था आता वर्चस्व नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करण्यापर्यंत आली. विशेषतः महाराष्ट्रात तर काँग्रेसची केविलवाणी अवस्था आहे. जर आपण गत आठ-दहा वर्षांच्या इतीहासात डोकावून पाहिले तर लक्षात येते की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतर देशभरात झालेल्या निवडणुकांपैकी दोन-चार निवडणुकांचा अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमधील काँग्रेसची पीछेहाट हा निव्वळ योगायोग किंवा मोदी लाटेच्या राजकारणाचा परिणाम नाही. त्या स्थितीला काँग्रेसचे धोरण व स्वपक्षातील काही नेतेच जबाबदार आहेत. यामुळेच काँग्रेसला २०१४ नंतर लागलेली घरघर, उतरती कळा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. 

....तरच काँग्रेसला गतवैभव प्राप्त होवू शकते

देशाच्या ७० वर्षांच्या इतिहासात ५० वर्षापेक्षा जास्त सत्ताकाळ भोगणार्‍या काँग्रेसची सध्याची अवस्था खूपच खराब आहे. नेमकं काँग्रेसचे धोरण काय आहे? याबाबत कुणातही एकवाक्यता नाही. केवळ विरोधाला विरोध म्हणून पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांना लक्ष केले गेल्यामुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक, भारत-चीन सीमेवरील तणाव, देशद्रोही कृत्य करणार्‍यांचे समर्थन, अशा अनेक चुका काँग्रेसला भोवल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील काही प्रमुखांसह २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना नेतृत्व बदला विषयी पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भाजपचा मुकाबला करायचा असेल तर काँग्रेसला उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये समग्र बदल व्हायला हवा. खालच्या स्तरापासून वरपर्यंत नेतृत्वात बदल करण्यात यावा, अशी भूमिका या नेत्यांनी घेतली होती. काँग्रेसला पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी गत सात वर्षांत काँग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधींनी अजिबात प्रयत्न केले नाहीत असे म्हणता येणार नाही, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही, हे सत्य देखील नाकारता येणार नाही. सध्यस्थितीला काँग्रेस पक्षाची सगळी इमारत पोखरली गेली आहे. ती पूर्णपणे पाडून नवी बांधायची तयारी दाखवली तरच काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुकाबला करायचा असेल तर, राहुल गांधी यांना केवळ ट्विटरचे राजकारण सोडून प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागेल. नव्या सामाजिक समिकरणांची मांडणी करावी लागेल. भाजप विरोधी पक्षांशी युती करताना स्वत:चा पारंपरिक अहंकार दूर ठेवावा लागेल. पक्षात जुन्या जाणत्या नेत्यांचा एक गट तर दुसरीकडे राहुल गांधी यांचा दुसरा गट अशी उघड दुफळी निर्माण झाली आहे. अलीकडच्या काही महिन्यांतील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे मानले जावू लागले आहे. परंतू अशी वेळ पहिल्यांदा आलेली नाही. याआधी साधारणत: पन्नास वर्षांपूर्वी असाच संघर्ष काँग्रेसमध्ये उफाळून आलेला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंचे समकालीन ज्येष्ठ नेते आणि त्यांचीच कन्या इंदिरा गांधी, यांच्यात तो संघर्ष पेटला होता. त्यावेळी कात टाकून काँग्रेसला नव्याने उभी करताना इंदिरा गांधींनी त्या नेत्यांशी दोन हात केले होते. त्याचीच परिणिती म्हणून काँग्रेसने भरारी  घेतली होती मात्र त्यावेळी इंदिराजींकडे दुरदृष्टी होती सोबतीला अभ्यासू तरुण नेत्यांची साथ होती. मात्र आता राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्या भवती खुशमस्कर्‍यांचाचा गोतावळा दिसून येतो. पक्षाने या परिस्थितीबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँगेसने कात टाकून पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरायचे असेल तर पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढत व हुजरेगिरी करणार्‍यांना दूर ठेवावे लागणार आहे. तरच काँग्रेसला गतवैभव प्राप्त होवू शकते.


Post a Comment

Designed By Blogger