पोळा सणावर निर्बंधांची झूल!

श्रावणातील प्रत्येक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना जसे धार्मिक महत्त्व असते तसेच नैसर्गिक महत्व देखील असते. अशाच एका सणापैकी एक असलेला सण म्हणजे बैल पोळा. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी संस्कृती हा देशाचा प्राण आहे. या कृषी संस्कृतीत शेतकर्‍यांचा सण म्हणून ओळखल्या जाणार्‍या बैल पोळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रावण महीन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण समाप्ती आमावस्याला महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा सखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या बैलांविषयी कृत्यज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षीभर बळीराजाला पावलोपावली मदत करणार्‍या बैलाविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी हा सण सर्वत्र साजारा केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गत वर्षाप्रमाणेच पोळा सणावर निर्बंधांची झूल आहेच मात्र त्यासोबतीला कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीचे संकटही शेतकर्‍यांच्या सोबतीला आहे.



बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 

श्रावण महिन्यातील अमावस्येला येणारा पोळा सण शेतकर्‍यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा साजरा केला जातो. या दिवशी सकाळी गाय-बैलांना आंघोळ घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. या शिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांची हरभर्‍याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते. सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. बैलांची ढोलताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढली जाते. पोळा सणाचा शेतकर्‍यांमध्ये मोठा उत्साह असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. कोरोना संसर्ग पाहता यंदाही जिल्ह्यातील पोळा सण साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोळा भरण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते; ही गर्दी टाळण्यासाठी या सणावर निर्बंधाची झूल घालण्यात आली आहे. यामुळे वाजत गाजत बैलांची मिरवणूक, देवदर्शन, स्पर्धा अशा अनेक परंपरांना खंड पडणार आहे. कोरोना संकटामुळे गत वर्षाप्रमाणे यंदाही मिरवणुका काढता येणार नसल्या तरी शेतकरी वर्ग घरच्या घरी हा सण साजरा करतील, यात शंका नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा भिन्न असतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे. मात्र गत काही वर्षांपासून या सणावर देखील संकटांचे सावट राहत आले आहे. आस्मानी संकटांची मालिका शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायचे नाव घेत नाही. गेल्या पाचसहा वर्षात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीच्या संकटात शेतकरी भरडला जात आहे. या दोन्ही अस्मानी संकटातून सुटका झालीच तर वाढती महागाई, शेतमालाला नसलेला भाव, सरकारचे धससोड धोरण, बँका किंवा खासगी सावकारांचा कर्ज वसूलीसाठी तगादा अशा संकटांशी दोन हात करत शेतकरी आपला गाडा हाकत आहे. गतवर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हाहाकार माजवला होता. 

शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी...

यंदाही सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर पावसाने उत्तर महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली. ऑगस्ट उजाडेपर्यंत पाऊस नव्हता यामुळे शेतकर्‍यांना दुबार व तिबार पेरणीही करावी लागली. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. किमान उरलेली पिकं तरी हातात येतील, अशी अपेक्षा असतांना पावसाने चाळीसगाव तालुक्यात धुमाकुळ घातला. ४८ तासात होत्याचे नव्हते झाले. पिकंच काय तर शेतातील माती देखील वाहून गेली. जी गत गेल्या वर्षी कोल्हापूर व यंदा कोकणात झाली तशीच परिस्थिती चाळीसगाव व भडगाव तालुक्यात दिसून आली. उर्वरित जिल्ह्यात फारशी वेगळी परिस्थिती नाहीच. पिकांना भाव नसल्याने उभ्या शेतात गुरं ढोरं सोडणे, पिंकांवर ट्रॅक्टर चालविणे किंवा टोमॅटो, काकडीसह पालेभाज्या रस्त्यावर फेकून देण्याच्या अनेक घटना गत १५ दिवसात घडल्या आहेत. आधीच शेतकरी संकटात आहे. वाढत्या महागाईने होरपळला जात आहे. राज्य व केंद्र सरकार अनेक लोकप्रिय घोषणा करते मात्र शेतकर्‍यांच्या हाती काय पडतं? हा संशोधनाचा विषय आहे. तिकडे दिल्लीच्या वेशीवर हजारो शेतकरी गत सहा-सात महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या कृषी कायदे रद्द करण्याची मागणी योग्य आहे की नाही? यातील राजकीय वाद वगळला तरी आजमितीला शेतकरी प्रचंड संभ्रमावस्थेत आहे. शेतकर्‍यांवर ओढवलेल्या आस्मानी व मानव निर्मित संकटात बळीराजाला शासनाकडून मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. शेतकर्‍यांना जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते मात्र संपूर्ण देशभरातील शेतकर्‍यांची अवस्था काय आहे, याचे उत्तर शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरुन मिळते. देशाला स्वतंत्र होवून ७० वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी बळीराजाचे प्रश्न सुटू शकले नाही, याला दुर्दव्यच म्हणावे लागेल. आजमितीस राज्यातील शेतकर्‍यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुटण्याचा राजमार्ग म्हणजे हमीभाव! केंद्र सरकारने नवी कृषी कायदे लागू करत शेतकर्‍यांना लाभ मिळवून देण्याचा दावा केला असला तरी याविरोधत अजूनही आंदोलनाची धग सुरुच आहे. आता केंद्र सरकारने तूर, उडिद, बाजरी, ज्वारी, कापूस, सोयाबीनसह १४ खरीप पिकांची एमएसपी वाढवत केंद्र सरकारने संकटात अडकलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधीच कोरोना आणि लॉकडाऊनसह निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणींच्या दृष्टचक्रात अडकला आहे. एमएसपी वाढवल्याने याचा शेतकर्‍यांना निश्चितपणे फायदाच होणार आहे. मात्र केवळ ऐवढेच पुरेसे नाही. शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षिय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. तेंव्हाच शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू पुसता येतील. सर्व शेतकर्‍यांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा...


Post a Comment

Designed By Blogger