टोकियो ऑलिंपिकमध्ये सात पदके मिळविल्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये त्यापेक्षाही सरस कामगिरी भारतीय क्रीडापटूंनी करुन दाखविली आहे. पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात बारा पदके जमा झाली असून यात भारताने २ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. शारीरिक व्यंगावर मात करत केलेली ही कामगिरी सर्वाथाने ऐतिहासिक व जिद्दीचे दर्शन घडविणारी आहे. यंदा अवनी लेखरा (नेमबाजी)- सुवर्ण आणि रौप्य, सुमीत अंतिल (भालाफेक)- सुवर्ण, भविनाबेन पटेल (टेबल टेनिस)- रौप्य, निशादकुमार (लांबउडी)- रौप्य, देवेंन्द्र झाझडिया (भालाफेक)- रौप्य, योगेश काथुनिया (थाळीफेक)- रौप्य, मरियप्पन थंगवेलू (उंचउडी)- रौप्य, प्रविण कुमार (उंचउडी)-रौप्य सुंदरसिंग गुर्जर (भालाफेक)- कांस्य, सिंहराज (नेमबाजी)- कांस्य, शरद कुमार (उंचउडी)- कांस्य यांनी टोकियोमध्ये तिरंगा फडकवला आहे. ‘तुमच्या मनाचं ऐका; कारण अपंगत्व मनात असते,’ अशा मंत्राच्या जोरावर अपंगत्वाला कधीच स्वतःच्या स्वप्नपूर्तीतला अडथळा होऊ देणार्या दिव्यांग खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवून देशाची मान उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशासाठी पदक मिळवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या अनेक खेळाडूंची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
पॅरालिम्पिकमधील भारताची सर्वोत्तम कामगिरी
पॅरालिंपिक अर्थात पॅरलल(समांतर). ऑलिंपिकच्या धर्तीवर समांतर पातळीवर आयोजित होणारी स्पर्धा म्हणजे, पॅरालिंपिक. या स्पर्धेत अपंगत्वानुसार पॅरालिंपिकपटू विविध खेळांमध्ये सहभागी होतात. पॅरालिंपिक स्पर्धेत दहा विविध अपंगत्व स्वरुपांचा विचार करण्यात येतो. याचे तीन उपप्रकार आहेत. फिजिअल इंपेअरमेंट (शारीरिक अपंगत्व), व्हिजन इंपेअरमेंट (दृष्टी अपंगत्व) आणि इंटलेक्च्युअल इंपेअरमेंट (बौद्धिक अपंगत्व). काही खेळ सर्व प्रकारच्या अपंगत्व असलेल्या खेळाडूंना खेळता येतात मात्र काही खेळ विशिष्ट अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी राखीव असतात. आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये भारतीय पॅरालिंपिकपटूंनी दमदारच कामगिरी केली आहे. मात्र यंदा सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. जपानची राजधानी टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक २०२० क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास घडवला आहे. भारताच्या पदकांची संख्या 12 वर पोहोचवली आहे. पॅरालिम्पिकमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी भारताने १९८४ साली आणि २०१६ साली सर्वाधिक ४ पदक जिंकली होती. यंदा ५४ जणांचे पथक या पॅरालिंपिकमध्ये सहभागी झाले असून, त्यांनी आत्तापर्यंत केलेला खेळ हा असामान्य दर्जाचाच म्हणता येतो. नेमबाजीतील सुवर्ण कामगिरी करणार्या १९ वर्षीय अवनी लेखराचा जीवन प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरेल असाच आहे. धोलपूरहून जयपूरकडे येत असताना संपूर्ण लेखरा कुटुंबीयांना अपघात झाला. त्यावेळी ११ वर्षांच्या असणार्या अवनीच्या मणक्याला दुखापत झाल्याने तिच्या कमरेखालील भाग लुळा पडला. त्यानंतर तिच्या संघर्षाची खरी पण वेदनामय कहाणी सुरू झाली. जयपूरच्या केंद्रीय विद्यालय तीनमध्ये शिकणारी अवनी खरे तर नृत्यसाधनेत तासन्तास रमायची. मात्र, अपघातानंतर सुरुवातीला आग्रा येथील उपचारानंतर ती जयपूरच्या एसएएस रुग्णालयात तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ उपचार घेत होती. त्यानंतर दिल्लीतील इंडियन स्पायनल एन्ज्युरी सेंटरमध्ये आणखी चार महिने तिच्यावर उपचार सुरू होते. तिला स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी नाव समजेल अशा प्रत्येक रुग्णालयात तिचे कुटुंबीय तिला घेऊन चार वर्षे सलग दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथे धावत होते. या सार्या संघर्षाचा कळसाध्याय म्हणजे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १० मीटर रायफल स्टँडिंग प्रकारात मिळवलेले सुवर्णपदक.
खेळाडूंची प्रेरणादायी कहाणी
रौप्य पदक विजेच्या भाविना पटेलची कहाणी देखील तशीच आहे. जेमतेम वर्षाची असताना पोलिओने ग्रासल्याने भाविना पटेलला अपंगत्व आले. त्यानंतर दृष्टीहीन मुलांना टेबल टेनिस खेळताना पाहून तिला प्रेरणा मिळाली नि त्यातूनच तिला जगण्याचा मार्ग मिळाला. वयाच्या आठव्या वर्षी अपघातात उजवा हात गमावलेल्या निशाद कुमारने कोरोनावर मात करीत उंच उडीत घेतलेली झेपही अशीच एक नंबरी. हरियाणातील सोनिपतच्या सुमित अंतिलच्या सुवर्णफेकीचे कौतुक करावे तितके थोडेच. २०१५ मध्ये एका मोटारसायकल अपघातात त्याने गुडघ्याच्या खालचा पायाचा भाग गमावला. त्यामुळे कुस्तीपटू बनायचे स्वप्न भंगले खरे. तरी त्यातूनही न डगमगता भालाफेकीत भारताचा हा शिलेदार नवा इतिहास घडविला. ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्रा याने सुवर्णयश मिळविल्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल टाकत सुमितने हे विश्वविक्रमी लक्ष्य साधले व त्यापाठोपाठ देवेंद्र झांझरिया आणि सुंदरसिंग गुर्जरने अनुक्रमे रौप्य व कांस्यवर नाव कोरले. भालाफेकीसाठी ताकद तसेच शारीरिक व मानसिक संतुलन या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. या खेळाडूंनी ते दाखवून दिले. नेमबाज सिंहराज अधाना याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावत साधलेला लक्ष्यभेदही आश्वासक. ज्या प्रतिकूल स्थितीत त्याने येथवर मजल मारली, तो प्रवास थक्क करणाराच ठरतो. थाळीफेकीत भारताच्या खात्यात रौप्यपदकाची नोंद करणार्या योगेश कथुनिया याने अर्धांगवायूसारख्या आजारावर मात करीत मारलेली मुसंडी हीदेखील अफलातून. दुसरीकडे थाळीफेकपटू विनोद कुमार याचे कांस्यपदक काढून घेतले जाणे, हा भारतासाठी धक्का म्हणता येईल. मात्र टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारताची कामगिरी सरसच ठरली आहे. याआधी झालेले ऑलिंपिक व आताचे पॅरालिंपिक दोन्ही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करुन आपल्या खेळाडूंनी देशाची मान उंचवली आहे. क्रिकेटवेड्या देशात अन्य खेळांना तुलनेने कमी महत्व मिळत असले तरी या सर्व खेळाडूंनी असमान्य कामगिरी करुन दाखवत लोकांची मानसिकता बदलण्यास प्रवृत्त करुन दाखविले आहे. तरीदेखील अजून बरीच मजल गाठायची आहे. त्याकरिता पायाभूत सुविधांची उभारणी करणे, क्रीडा क्षेत्रासाठी अधिकाधिक तरतूद करणे, गुणवान खेळाडू हेरून त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविणे, यावर भर असायला हवा, एवढीच माफक अपेक्षा आहे.
Post a Comment