गत महिनाभरापासून देशात कोरोना व्हायरसचा वेग काहीसा मंदावला आहे. देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने आता देशात शाळा पुन्हा सुरू होऊ लागल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने योग्य ती खबरदारी घेत उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसह अनेक राज्यांत शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. बहुतेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र. आता अनेक राज्यांमध्ये बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्रातील शाळा सुरु झाल्या नसल्याने, महाराष्ट्रात शाळा कधी सुरू होणार, असा सवाल पालकवर्गामधून विचारला जात आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टास्क फोर्सकडून जेव्हा सूचना येतील, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सांगत अद्याप तरी शाळा सुरू होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
शाळा बंद असल्याने मुले घरीच कोंडून राहत असून, टीव्ही आणि मोबाइल एवढेच त्यांचे भावविश्व बनून राहिल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेमुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून घरी बसावे लागले असल्यामुळे शाळा सुरु होणे ही विद्यार्थी आणि पालकांची मानसिक गरज आहे. देश पातळीवरील स्थिती पाहता, दिल्लीतील कोरोनाविषयक परिस्थितीत सुधारणा झाल्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने यापूर्वी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग सुरू केले होते; मात्र हे वर्ग आठवड्यातील ठरावीक दिवशी होत होते. बुधवारी पहिल्या दिवशी शाळांमध्ये उपस्थिती कमी होती, मात्र जवळजवळ १७ महिन्यांनंतर नियमित वर्ग सुरु झाले आहेत. राजस्थानमध्ये सरकारी आणि खासगी शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग पुन्हा सुरू झाले. शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वर्गात एकावेळी फक्त ५० टक्के क्षमतेला परवानगी असून, करोनाविषयक नियमांचे कठोर पालन केले जाणार आहे. तमिळनाडूत कोरोनाविषयक आदर्श कार्यप्रणालीचे पालन करून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग पुन्हा सुरू झाले. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी २० मार्चपासून बंद करण्यात आलेले प्राथमिक शाळांचे वर्ग बुधवारी पहिल्यांदा उघडले. तेलंगणात निवासी सरकारी शैक्षणिक संस्था वगळता इतर शाळांचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. छत्तीसगमध्ये सरकारी व खासगी शाळांमधील सहावी, सातवी, नववी आणि अकरावीचे वर्ग ५० टक्के उपस्थितीसह गुरुवारपासून सुरु झाले. या व्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, आसाम, हरयाणा, ओडिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड राज्यांमध्येही शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील शाळा अद्यापही बंदच आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. यासंदर्भात टास्क फोर्सकडून जेव्हा सूचना येतील, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी भुमिका राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे.
मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने घातक
दुसरीकडे देशातील अनेक राज्यांत लॉकडाउनचे दिवस वगळता शाळा कमी-अधिक प्रमाणात चालू आहेत. महाराष्ट्रातही योग्य काळजी घेऊन अनेक शाळा सुरू केल्यानंतर मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेला नाही. पूर्वतयारी करून शाळा उघडायला प्राथमिक शाळांपासून सुरुवात करावी, अशी शिफारस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) प्रमुख बलराम भार्गव यांनी नुकतीच केली आहे. यामुळे राज्यातील शाळा लवकरच सुरु होतील, अशी अपेक्षा आहे. मुलांना कोव्हिड-१९ लस दिलेली नसूनही; तसेच शाळा बंद ठेवूनही मुलांमध्ये लागणीचे, प्रतिपिंडे तयार होण्याचे प्रमाण जवळ जवळ प्रौढ लोकांइतकेच आढळले आहे. हे लक्षात घेता, आता यापुढे शाळा का बंद ठेवायच्या, असा प्रश्न पडतो. तिसर्या कोव्हिड लाटेची शक्यता असल्याने लहान, शालेय मुलांबाबत जास्त काळजी वाटणे साहजिक आहे; पण कोव्हिड-१९ ची दुसरी लाट अतिप्रचंड असूनही, लहान मुलांच्या काही जीवशास्त्रीय वैशिष्ट्यांमुळे बहुसंख्य मुलांत कोव्हिड-१९ आजार होण्याचे प्रमाण फार कमी होते. कोव्हिड-१९ आजार झालाच, तर गंभीर आजाराचे प्रमाण अत्यंत कमी आणि मृत्यूचे प्रमाण नगण्य राहिले आहे. एवढीच एक दिलासादायक बाब आहे. कितीही काळजी घेतली, तरी शाळेत मुलांना संसर्ग होण्याची शक्यता आहेच. लहान मुलांसाठी लस आल्यावर त्यांचे वेगाने लसीकरण करून मग शाळा उघडाव्यात, असे म्हटले जाते; पण जागतिक आरोग्य संघटना, भारतातील बालआरोग्य तज्ज्ञांची संघटना आदींनी मुलांचे लसीकरण होणे ही शाळा उघडण्याची पूर्वअट ठेवलेली नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. लहान मुलांसाठीची लस यायला अजून काही महिने लागू शकतात. तिचे पुरेसे उत्पादन होऊन सर्व मुलांना दोन डोस देण्याचे काम पूर्ण करायला पुढचे अनेक महिने लागतील. तोपर्यंत शाळा बंद ठेवायच्या का, हा प्रश्न आहे. देशात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला, तरी शालेय विद्यार्थ्यांसाठी लस अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लसीकरण न होता बाहेर फिरणार्या व्यक्ती इतकीच काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहणे, शाळांचे सॅनिटायझेशन, घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचे आणि परत घरी येण्यासाठी वाहनाचे नियोजन, स्वच्छतागृहांचे नियोजन यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता, शाळा सुरू करण्याचे सुयोग्य मापदंड पाळून, पूर्वतयारी करून, काही पथ्ये पाळून अंगणवाड्या व शाळा विनाविलंब सुरू करून, तेथे मुलांना पूरक आहार दिला जावा. शाळा सुरू करताना आणि चालवताना घ्यायची काळजी घ्यावी. जास्त दिवस शाळेची दारे बंद ठेवणे मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने घातक ठरु शकते.
Post a Comment