अमेरिकेच्या शेवटच्या ३ सी-१७ विमानांनी ३० ऑगस्टला रात्री उरलेल्या अमेरिकन सैनिकांसह हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डान केले. यासह अमेरिकेचे अफगाणमधील अस्तित्व संपले. तालिबानच्या रुपातील दहशतवाद संपवण्याचा प्रण घेऊन अफगाणिस्तानात दाखल झालेली अमेरिकन सेना १९ वर्ष, १० महिने आणि १० दिवसांनंतर तालिबानच्याच हातात अफगाणिस्तानची सत्ता सोपवत बाहेर पडली. हा अफगाणमधील युद्धाचा शेवट की नव्या युद्धाची आणि अनागोंदीची सुरुवात हे मात्र येणार्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र, तब्बल २० वर्ष चाललेल्या या युध्दात अमेरिका जिंकली का तालिबान्यांचीच सरशी झाली? यावर आता जागतिक पातळीवर चर्चा सुरु झाली आहे. खुद्द अमेरिकेतही याबाबत दोन प्रवाह आहेत. अमेरिकेने लढलेल्या युध्दांचा इतीहास पाहिल्यास, १९४५ नंतर अमेरिकेने पाच प्रमुख युद्ध केली. यात कोरिया, व्हिएतनाम, आखाती युद्ध, इराक आणि अफगाणिस्तान यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त काही लहान-लहान युद्धं केली ज्यात सोमालिया, येमेन आणि लीबियाचा समावेश होतो. यापैकी १९९१च्या आखाती युद्धात झालेला विजय सोडून इतर सगळ्या युद्धांमध्ये अमेरिकेला माघार घ्यावी लागली आहे.
अमेरिका दहशतवादाला मुळापासून उपटून फेकण्यात अयशस्वी
११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. अतिरेक्यांनी विमानांचे अपहरण करून ती वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर आणि पेंटागॉन इमारतींमध्ये घुसवली. या हल्ल्याचा मास्टरमाईंड अल कायदा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख ओसामा बिन लादेन असल्याचे स्पष्ट झाले. अफगाणिस्तान तेव्हा कट्टरपंथीय इस्लामिक गट असलेल्या तालिबानच्या ताब्यात होता. आणि त्यांनी लादेनला आश्रय दिला होता. लादेनला अमेरिकेच्या ताब्यात द्यायला त्यांनी नकार दिला. यानंतर अमेरिकेने दहशतवादा विरुध्द युध्दाची घोषणा केली. ९/११च्या हल्ल्यानंतर एका महिन्यात अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले सुरू केले. तालिबान आणि अल कायदाचा नायनाट हे त्यांचे उद्दिष्ट होते. अमेरिका आणि मित्र देशांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोनच महिन्यात अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट कोसळली. त्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा देखील खात्मा केला. मात्र त्यांनतरही तालिबानचा पूर्ण पाडाव झाला नाही. त्यांचा उपद्रव आणि हल्ले सुरूच राहिले. या युध्दात अमेरिकेने हजारो सैनिक गमविले. अब्जावधी डॉलर्स खर्च करुनही अमेरिकेच्या हाती काहीच येत नसल्याने राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगणिस्तानातून बाहेर पडण्याची घोषणा केली. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ३१ ऑगस्ट ही कालमर्यादा निश्चित केली होती. या तारखेच्या एक दिवस आधीच अमेरिकेने आपली बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे जाहीर केले. अमेरिकेन सैन्याची शेवटची तुकडी अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर तालिबानने पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. २० वर्षानंतर तालिबानने अफगाणिस्तानात पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केली आहे. अमेरिकेचे सैन्य बाहेर पडताच तालिबानने काबूल विमानतळावर ताबा मिळवला. तसेच अमेरिकन सैन्याने सोडलेली विमाने आणि चिनूक हेलिकॉप्टर ताब्यात घेतले. २००१ मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये आलेल्या फौजांनी तालिबानला सत्तेवरून हटवले होते, त्यानंतर वीस वर्षांनी तालिबानने पुन्हा पूर्ण देशाचा ताबा घेण्यात यश मिळवले. या युध्दात अमेरिकेने खूप काही गमवले आहे. अमेरिकेसोबत असे पहिल्यांदाच झालेले नाही! अफगाणिस्तानसह सीरिया, इराक आणि येमेनमध्ये अमेरिका दहशतवादाला मुळापासून उपटून फेकण्यात अयशस्वी ठरली आहे.
अफगाणिस्तानात दहशतवाद फोफावतो का शांततेचे नवे पर्व सुरु होते?
तालिबानचा अफगाणिस्तानात विजय आणि त्यांचे सत्तेत परतणे अमेरिकाच्या पराजयाचे ठसठशीत उदाहरण आहे. आता उद्याचा अफगणिस्तान कसा असेल? याबद्दल कुणीच ठोस सांगू शकणार नाही. सध्या तरी अफगाणमध्ये शरिया कायद्याच्या नावाखाली सर्वसामान्यांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे अफगाणचे भविष्य सध्या तरी तालिबानी नियंत्रणात अंधारातच दिसत आहे. येणार्या काळात अफगणिस्तानची भूमी जगभरातील दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरण्याची भीतीच जास्त आहे. अशात चीन आणि पाकिस्तानची खेळी देखील धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल. दहशतवाद्यांना आश्रय देणारा कुख्यात देश म्हणून आधीच पाकिस्तान बदनाम आहे. जेंव्हा अमेरिका अफगानिस्तानात तालिबान्यांशी लढत होता तेंव्हा देखील पाकिस्तान तालिबानी दहशतवाद्यांना आश्रय देत होता. आता तर पाकिस्तान उघडपणे तालिबान्यांना पाठिंबा देत आहे. चीन देखील त्याच मार्गावर आहे. अफगाणिस्तानचे धोरण आखताना चीनने आपला घनिष्ठ मित्र देश पाकिस्तानशी सातत्याने समन्वय ठेवला आहे. चीनचे अफगाणिस्तानातील राजदूत वँग यू यांनी तालिबानशी राजनैतिक पातळीवर यापूर्वीच चर्चा केली आहे. आतापर्यंत चर्चेच्या दोन फेर्या झाल्या आहेत. तालिबानशी सर्व घटकांनी संवाद साधावा आणि त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन चीनने केले आहे. अमेरिकेबरोबरील परराष्ट्रमंत्री पातळीवरील चर्चेत ही भूमिका मांडण्यात आली. या आवाहनाद्वारे तालिबानशी घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्याचे स्पष्ट संकेत चीनने दिले. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. अफगाणिस्तानात सैन्य पाठविण्याचा अमेरिका आणि नाटो देशांचा निर्णय सपशेल चुकल्याचा मुद्दाही वँग यांनी अधोरेखित केला. ब्लिंकन यांना त्यांनी सांगितले की, दहशतवादी शक्तींचा बीमोड करण्याचा उद्देश अफगाणिस्तानातील युद्धामुळे कधीही साध्य झाला नाही हे वस्तुस्थितीवरून सिद्ध होते. अमेरिका व नाटो देशांचे सैन्य घाईने माघारी परतल्यामुळे दहशतवादी गटांना डोके वर काढण्याची संधी मिळू शकेल. एका बाजूने हे देखील तितकेच सत्य आहे. बायडेन यांचा घाईघाईने घेतलेला निर्णय अमेरिकेसाठी डोकंदूखी ठरण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. अमेरिकन सैन्याच्या घरवापसीमुळे अफगाणिस्तानात दहशतवाद फोफावतो का शांततेचे नवे पर्व सुरु होते? याचे उत्तर येणार्या काळात मिळेलच!
Post a Comment