घंटानाद का धोक्याची घंटा?

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना तिसर्‍या लाटेची टांगती तलवार कायम आहे. तिसरी लाट येऊ नये म्हणून सर्वच राज्यांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत अशा प्रकारच्या सूचना गृहमंत्रालयाने नुकत्याच निर्देशित केल्या आहेत. देशातील केरळ वगळता बहुतेक सर्व राज्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आले असले तरीही केंद्र सरकारने करोनाविषयक जे निर्बंध आहेत ते ३० सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे. कारण याच कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे सण असल्याने सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता अनेक लोक एकत्र येतील असे कोणतेही कार्यक्रम टाळावेत, असे केंद्र सरकारकडून सर्व राज्य सरकारांना कळवण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे काय? याचाही विचार करायची गरज आहे. एकीकडे केंद्र सरकारने अशा प्रकारचे निर्देश दिले असताना दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपाने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलने करण्यात आली. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी धर्मयुध्दासाठी तयार रहावे, असे आव्हानदेखील भाजपाने दिले आहे. राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का? आज काहीही झाले तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरे खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. हा थोडासा विरोधाभास असल्याने कोरोना वाढतोय का कमी होतोय? हेच कळेनासे झाले आहे. 



राजकीय कार्यक्रमांना सुट

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२ हजार ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३ लाख ७६ हजार ३२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील आठवडी पॉझिटीव्हीटी रेट २.४२ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी दरात वाढ झाली असून ३४ दिवसांनी हा दर पुन्हा तीन टक्क्यांपेक्षा वर गेला आहे. एकट्या केरळ राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ८३६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ४ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, १३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी हे महत्त्वाचे सामूहिक सण साजरे केले जाणार आहेत. महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या गणेशोत्सवावर गेल्या दोन वर्षांपासून सर्व प्रकारची बंधने असली तरीही गणेशोत्सवाच्या बाजारपेठेवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाची खरेदी असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी असो सर्व ठिकाणी गर्दी दिसणे अपरिहार्य आहे. सरकारने राज्य सरकारांना जरी निर्देश दिले असले तरीही राज्य सरकार हे निर्देश किती गांभीर्याने घेतात यावरच तिसर्‍या लाटेचा प्रवेश अवलंबून राहणार आहे, हे निश्चित. देशातील कोणत्याही राज्यांतील, शहरांतील आणि ग्रामीण भागांतील दृष्य पाहिले तर सर्वत्रच गर्दी आहे. बाजारपेठा गच्च भरून गेल्या आहेत. दुकानांच्या वेळा रात्री उशिरापर्यंत असल्यामुळे दुकानांमध्येही गर्दी दिसत आहे. अत्यावश्यक सेवा तर पूर्वीपासूनच उशिरापर्यंत सुरू आहेत. या देशात करोना महामारीने मोठा हाहाकार माजवला होता, अशी कोणतीही चिन्हे या गर्दीवरून तरी दिसत नाहीत. आगामी सणासुदीच्या काळात वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा धोकाही वाढणार आहे. दुसर्‍या लाटेदरम्यानचा अनुभव काहीसा असाच होता. त्याची मोठी किंमत अनेकांना चुकवावी लागली आहे. मात्र त्यापासून कोणीच बोध घेतलेला दिसत नाही. विशेषत: राजकारण्यांनी! गर्दीवर बंधने टाकणातांना ‘स्टार मार्क, कंडीशन्स अप्लाय’ प्रमाणे राजकीय कार्यक्रमांना सुट दिली जाते.

सणासुदीच्या काळात जास्त काळजी घ्यावी लागणार 

राजकीय सभा, मेळावे, बैठकांना होणारी गर्दी पाहता असे वाटते की कोरोना अशा गर्दीला घाबरतो! गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेमध्ये जो राडा झाला त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले. एकीकडे राज्य सरकार दहीहंडी व गणेशोत्सवावर बंधणे टाकाते, अर्थात ते पूर्णपणे चुकीचे देखील नाही. कारण अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. मात्र हेच निकष राजकीय कार्यक्रमांना का लावले जात नाहीत? हाच मोठा प्रश्न आहे. आताही राज्यातील मंदीरे खुली करण्यासाठी भाजपाने राज्यभरात आंदोलनं सुरु केली आहेत. मंदीरे अजूनही बंद आहेत, हे वास्तव असले तरी कुणाच्याही भक्तीभावात कमतरता आलेली नाही. त्या उटल याकाळात देवावरील विश्वास अजूनच दृढ झाला आहे. मात्र अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे कोरोना वाढण्याची शक्यताच अधिक आहे. याबाबतीत राज्य सरकारचे धरसोड धोरणामुळेच जास्त गोंधळ निर्माण होतो, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना केल्या असल्या तरी राज्य पातळीवर जा स्थानिक निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका पुढे ढकलण्याचा कोणताही विचार राज्य सरकारांचा नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक स्थानिक संस्था किंवा साखर कारखान्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि त्यानंतर कोरोनाची तीव्रता वाढली आहे. आगामी काळात कोरोना वाढणार नाही, याची शाश्वती कोण देईल? यासाठी राज्य सरकारने धरसोड धोरण न अवलंबता ठोस भुमिका घेण्याची आवश्यकता आहे. गत महिनाभरापासून अनलॉकची प्रक्रिया सुरु असतांना कोरोना प्रसाराचा वेग फारसा वाढला नाही, हा मोठा दिलासा असला तरी अजूनही बेफकरी करुन चालणार नाही. विशेषत: येणार्‍या सणासुदीच्या काळात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. दुसर्‍या लाटेच्या कालावधीमध्ये अनेक दुकाने दीर्घकाळ बंद असल्यानंतर ज्याप्रकारे जीवघेणी घुसमट सर्वच व्यावसायिकांची झाली होती तशा प्रकारची घुसमट पुन्हा होऊ नये असे वाटत असेल, तर सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger