महाराष्ट्र बंगालच्या वाटेवर?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष विकोपाला गेला. राजकीय वादाचे रुपांतर तोडफोड व हाणामारी पर्यंत गेले. आता हा वाद राजकीय पातळीसोडून वैयक्तीक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत घसरला आहे. यातच नारायण राणे यांनी काही जुन्या प्रकरणांना हात घालत गंभीर आरोप केले. आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितले? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकले. ही प्रकरणे मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे, असे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पटलवार करत, ज्यावेळी नारायण राणे इतरांवर आरोप करतात तेव्हा अंकुश राणेसारख्या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? कुठे झाली? हत्या केल्यानंतर कोणत्या गाडीत टाकले आणि जाळले याची कधी विचारपूस केली आहे का तुम्ही? असा आरोपही त्यांनी केला. या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्राचे सुसंस्कृत राजकारण पश्‍चिम बंगालच्या वाटेवर जातांना दिसत आहे.महाराष्ट्राचे राजकारण सभ्य व सुसंस्कृत

भाजप व तृणमूल काँग्रेसमधील रक्तरंजीत संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला आहे तर पश्‍चिम बंगालने त्याची दाहकता अनुभवली आहे. इतीहासाची पाने उलगडल्यास लक्षात येते की, पश्‍चिम बंगालचे राजकारण मुद्यांवर नव्हे तर गुद्यांवर लढले जात असल्याचे अनेक संदर्भ मिळतात. पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष आधी डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये होता. त्यावेळच्या काँग्रेस नेत्या आणि आताच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डाव्यांशी दोन हात करत डाव्यांच्या पोलादी बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. ममतांनी केंद्रातील सत्ताधीशांनाही नमवले. मात्र बंगाल बदनाम झाले ते निवडणूक हिंसाचाराने. ममतांच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारात, जाळपोळ, दंगली आणि हल्ल्यांत शेकडो कार्यकर्त्यांना जीव गमावावा लागला. सर्वाधिक हानी झाली ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची. बंगालमध्ये गेल्या चार वर्षांत २०१९ च्या लोकसभा निवडणूकपूर्व आणि नंतरच्या हिंसाचारापासून एप्रिल-मे मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १३० हून अधिक कार्यकर्ते ठार झाले. त्याआधी तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या उलट महाराष्ट्राचे राजकारण सभ्य व सुसंस्कृत मानले जाते. अर्थात महाराष्ट्रातही राजकीय संघर्ष अधून मधून उफाळून येत असला तरी त्याला मर्यादा असते. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण कधीच कलंकित झाले नाही. मात्र गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुडाचे राजकारणाचे प्रतिबिंब दिसू लागले आहे. याचा पहिला अध्याय बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांचा बंगला तोडतांना लिहिण्यात आला. मात्र कालांतराने हा वादळ शमले. मात्र आता महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा नारायण राणे व शिवसेनमधील वादामुळे ढवळून निघाले आहे. राज्याच्या राजकारणात शिवसेना-भाजपामध्ये जोरदार शाब्दीक युद्ध रंगले आहे. महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लावण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेनेत याचे तिव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणात नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान नारायण राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. 

राजकीय वादात राज्यासमोरील मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष

काही दिवस अगोदर  झालेली अटक व सुटकेनंतर नारायण राणे शिवसेनेवरील शाब्दिक हल्ले कमी करतील, असे वाटत असताना त्यांनी अधिकच तीव्र आणि वैयक्तिक टीका चालविली आहे. यावेळी त्यांनी एका अ‍ॅसिड प्रकरणाचा दाखला देत खळबळ उडवून दिली. नाव न घेता नारायण राणे यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगू लागली आहे. आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितले? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकले. ही प्रकरणे मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवले आहे. आमच्या वाटेला जाऊ नका, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला. दुसरीकडे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पटलवार करत, ज्यावेळी नारायण राणे इतरांवर आरोप करतात तेव्हा अंकुश राणेसारख्या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? कुठे झाली? हत्या केल्यानंतर कोणत्या गाडीत टाकले आणि जाळले याची कधी विचारपूस केली आहे का तुम्ही? असा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर तुमच्या मुलाने चिंटू शेखला ऑफिसात जाऊन गोळ्या घातल्या. त्याची कधी विचारपूस केली आहे का? असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. वैयक्तीक पातळीवर घरसलेल्या राजकीय आरोपांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होणार नाही, याचे भान देखील नेत्यांना राहिले नाही. या संघर्षाला मुंबई महापालिका निवडणुकीची देखील पार्श्‍वभूमी आहे. यामुळे निवडणुकीच्या वेळी हा वाद पुन्हा उफाळणार नाही? याची हमी कोण देईल? जेंव्हा राजकारणाची पातळी खालावते तेंव्हा सामान्या कार्यकर्त्यांच्या भावना भडकावून राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्यास सुरुवात होते. ती वेळ येऊ न देण्याइतकी राज्यातील जनता आणि नेतृत्व सुजाण आहे. या राजकीय वादात राज्यासमोरील मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसते. कोरोनावर नियंत्रण मिळवले असले, तरी त्यावर समाधान मानण्यासारखी परिस्थिती नाही. अजूनही राज्याचे अर्थचक्र पुरेशा गतीने सुरू झालेले नाही. ते सुरू करण्याला प्राधान्य कधी देणार? पाठोपाठ तिसर्‍या लाटेचे आव्हान मोठे आहे. अतिवृष्टी आणि महापूरग्रस्त भागातील शेतकरी मोडून पडला आहे. तीस टक्केे महाराष्ट्र पावसासाठी व्याकूळ आहे. याकडे सरकारचे प्राधान्याने लक्ष हवे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजकारण हा विषय चर्चेचा असला, तरी प्राधान्याचा निश्चितच नाही. महाराष्ट्र बंगालच्या वाटेवर जाणार नाही, याचे भान महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी ठेवायला हवे.

Post a Comment

Designed By Blogger