टोकियो ऑलिम्पिक खासच

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिक खास ठरले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण पाच पदकांची कमाई केली आहे. मीराबाई चानू (रौप्य), रविकुमार दहिया (रौप्य), पीव्ही सिंधू (कांस्य), लव्हलिना बोर्गोहेन (कांस्य) भारतीय पुरुष हॉकी संघ (कांस्य) पदकांवर शिक्कामोर्तब केले आहे. २३ जुलैपासून सुरुवात झालेली ही स्पर्धा संपायला आता ३ दिवसांचा अवधी उरला आहे. दरम्यान अद्यापही भारताला आणखी पदके येण्याची आशा आहे. जर असे झाल्यास ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्याचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ६ पदके मिळवली होती. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येचा विक्रम मोडण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही जरी आनंदाची बाब असली तरी पदक तालिकेत भारत शेवटच्या पाच देशांमध्ये आहे. शेजारच्या चीनसह अनेक लहान देशांच्या पदकांवर नजर टाकल्यास भारत खूपच मागे आहे. आपल्या १२१ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात केवळ २८ पदके जिंकली, त्यापैकी ९ सुवर्णपदके आहेत. यापैकी आठ पदके एकट्या हॉकीमध्ये जिंकली गेली आहेत. एकट्या अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्सने आपल्या कारकिर्दीत  २८ ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. जी टोकियोपूर्वी भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात जिंकलेल्या एकूण पदकांइतकी आहेत. यावरुन ऑलिम्पिकमधील कामगिरीचे मुल्यांकन करता येते.४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम

दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही केवळ एक क्रीडास्पर्धा नसते तर एक वैश्विक उत्सव असतो. यंदा टोकियोे ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. यात पाच पदके भारताने जिंकली आहे. यंदाची सर्वात विशेष बाब म्हणजे, भारतीय महिला हॉकी संघाने मारलेली जोरदार मुसंडी आणि पुरुष हॉकी संघाने केलेली कामगिरी म्हणता येईल. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवले आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळाले आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणार्‍या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे. उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढ्य जर्मनीला पराभूत केले. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणार्‍या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले. भारत १९०० पासून आॅलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहे. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ८ रजत आणि १५ कांस्य पदके  पटकावली आहेत. 

हॉकीचा दबदबा 

१९२८ मध्ये भारताच्या हॉकी संघाने अमस्टरडॅममध्ये पहिल्यांदा सुवर्ण पदक पटकावले होते. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा वैयक्तिक पदक पटकावले. कुस्तीपटू खाशबा दादासाहेब जाधव यांनी कांस्य पदक पटकावले होते. नंतरच्या काळात हॉकीचा दबदबा राहिला. १९९६ मध्ये अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत लिएंडर पेसने टेनिसमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले. २००० साली सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टींग स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले होते. २००४ अँथेस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोर यांनी मेन्स डबल ट्रॅप शूटींगमध्ये रजत पदक पटकावले होते. त्यानंतर २००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राने पहिले सुवर्ण पदक पटकावले. त्याचवर्षी सुशील कुमारने कुस्तीत भारताला कांस्य पदक पटकावून दिले. तसेच बॉक्सिंगमध्ये विजेंद्र सिंहने कांस्य पदक पटकावले. २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी केली. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ६ पदके जिंकली होती. विजय कुमारनं पुरुष गटातील जलद पिस्टल फायरिंग स्पर्धेत रजत पदक, गगन नारंगने १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक , सुशील कुमारने फ्रिस्टाइल ६६ किलो वजनी गटात रजत पदक, योगेश्वर दत्तने फ्रिस्टाइल प्रकारात ६० किलो वजनी गटात कांस्य पदक, तसेच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉक्सर मेरी कमने कांस्य पदक मिळवले होते. २०१६ च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताच्या पदरी फक्त दोन मेडलची भर पडली. महिला फ्रिस्टाइल ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवले. तर पीव्ही सिंधुने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रजत पदक पटकावले. 

क्रिकेट वगळता अन्य खेळाडूंकडे दुर्लक्ष!

टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचे कौतूक करावे तितके कमीच आहे. भारतात क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांमध्ये कोणालाही विशेष रस नाही हे वास्तव आहे. पाश्चिमात्य देशांनी नेहमीच ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर वर्चस्व राखले आहे. यामुळे अन्य देश ऑलिम्पिकमध्ये पदांची लयलूट करतात. ऑलिंम्पिकसारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारताच्या अपयशासाठी पूर्णपणे खेळाडूंनाच दोषी ठरवता येणार नाही. यास भारतीय क्रीडा क्षेत्रातील गंभीर त्रुटी कारणीभूत आहेत. प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, आपल्या देशात सर्वाधिक महत्व क्रिकेटलाच दिले जाते त्या तुलने अन्य खेळांना दुय्यम दर्जा मिळतो. परिणामी अन्य खेळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी झगडण्यापासून सुरुवात होते. शालेय पातळीवर क्रीडा क्षेत्राला अजूनही पाहिजे तसे प्रोत्साहन मिळत नाही. क्रीडा संघटनांमधील राजकारण व त्यावर पकड मिळविण्यासाठी होणारा राजकीय हस्तक्षेप हा खेळाचा दर्जा संपवितो, असा आजवरचा अनुभव आहे. अनेक खेळांना प्रायोजकत्व मिळत नाही व सरकारदेखील त्याला अपेक्षित मदत करत नाही, अशा अनेक अडथळ्यांची शर्यत खेळाडूंना पार करावी लागते. क्रिकेट वगळता अन्य खेळाडूंकडे दुर्लक्ष केले जात असले तरी ऑलिंम्पिकसारखी मोठी स्पर्धा आली की खेळाडूंकडून पदाकांची अपेक्षा ठेवली जाते. अपेक्षांच्या या ओझ्याखाली अनेक खेळाडूंना त्यांचा नैर्सर्गिक खेळ करता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर पदके जिंकणार्‍या सर्व खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन.

Post a Comment

Designed By Blogger