यंदाही घागर उताणीच!

राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी सण- समारंभांवर अद्यापही बंधने कायम आहेत. दहीहंडी, गणेशोत्सवासाठी या सणांसाठी अवघे काही दिवस उरले असताना सणांसाठी निर्बंधांत सूट देण्याची मागणी करण्यात येत असली तरी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यंदाही दहीहंडीच्या सणाला परवानगी नाकारली आहे. आपल्या सरकारचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचविण्याला असल्याचे सांगत यंदाही दहीहंडीचा उत्सव होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथक आणि दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत स्पष्ट केले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचविण्याला आम्ही प्राधान्य दिले, हा संदेश जाऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधाचे सूर उमटले असून, भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर मनसेने ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र याच वेळी परवानगी नसल्याने आम्ही दहीहंडीचे आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत, असे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे.


यंदाही दहीहंडीचा उत्सव होणार नाही

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी साजरा केला जाणारा दहीहंडी हा सण संपूर्ण भारतात धुमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळी संपूर्ण भारतातील विविध ठिकाणे वेगवेगळ्या धार्मिक परंपरेनुसार दहीहंडी साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातच दहीहंडीचा उत्साह सर्वाधिक पाहायला मिळतो. दरवर्षी मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये मोठ्या संख्येने गोविंदा पथके सहभाग घेत असतात. अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते देखील मोठमोठ्या दहीहंडींचे आयोजन करत असतात. त्यामुळे दहीहंडीच्या या पारंपरिक उत्सवामध्ये आर्थिक उलाढाल देखील मोठी होत असते. मात्र, गेल्या वर्षी कोरोनामुळे दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गेल्या दीड वर्षापासून देशभरात कोरोना ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी सर्वच उत्सव रद्द करावे लागल्यामुळे गणेश मंडळांपासून ते दहीहंडी मंडळांपर्यंत सर्वांचीच निराशा झाली होती. गणेशोत्सव देखील मर्यादित स्वरुपात व फक्त घरगुती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदा कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर दहीहंडीला आणि इतर उत्सवांना काही प्रमाणात परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथकं आणि दहीहंडी उत्सव आयोजक यांच्यात दहिहंडीच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. दहीहांडीऐवजी मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांची होती. आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे. गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी. दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळे घेतील, अशी भुमिका गोविंदा पथकांनी घेतली होती. मात्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन यंदाही दहीहंडी उत्सव साजरा केला जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांना केले असून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली. ‘एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली तरी सरसकट परवानगी देता येणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आम्ही गोविंदा पथकांवर लक्ष कसे ठेवणार? यंत्रणांवर येणारा ताण पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केले आहे. 

महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा दोघांच्याही सोईस्कर भुमिका

बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण, आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारालाच प्राधान्यांने करावा लागेल. गेल्या दोन लाटांत जी बालके अनाथ झाली, ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्या, कुटुंबेच्या कुटुंबे अनाथ झाली. त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटांतील आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाहीतर, जगाचा अनुभवही कटू आहे. दोन डोस दिलेल्या देशांतही तिसर्‍या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशांत पुन्हा निर्बंध लावले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर मुख्यमंत्र्यांचा निर्णय अत्यंत योग्यच आहे. कारण दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्‍या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत अशा प्रकारचे कटू निर्णय घ्यावेच लागतात. मात्र अशा प्रकारचे निर्णय घेतांना केवळ सण किंवा उत्सवांच्यांच बाबतीत न घेता, राजकीय सभा, समारंभांनाही हेच निकष लावण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवायला हवेत. राज्यातील सर्वच पक्षांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी तितकीच धोकादायक आहे तितके सणवारांना होणारी! मात्र राज्यात राजकीय कार्यक्रमांना होणार्‍या गर्दीकडे नेहमीच कानाडोळा केला जातो. असा दुटप्पीपणा कितपत योग्य? याचेही उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे. पहिल्या लाटेवेळी अशाच प्रकारच्या राजकीय बेफिकरीमुळे दुसर्‍या लाटेला आमंत्रण मिळाले होते. तेंव्हाही सर्व सणवार, उत्सवांवर बंदी होतीच ना? तरीही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले. मात्र त्यातून देखील आपल्या नेत्यांनी काहीच बोध घेतला नाही. आताही मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीला परवानगी नाकारल्यानंतर मनसेने परस्पर दहीहंडीची घोषणा केली आहे. राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून सर्व निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. मात्र, धार्मिक स्थळे अद्याप बंद आहेत. त्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. आता दहीहंडी उत्सवावरुनही भाजपाने सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा दोघांच्याही सोईस्कर भुमिका चुकीच्याच आहेत.

Post a Comment

Designed By Blogger