सुसंस्कृत राजकारण कलंकित

महाराष्ट्रात मंगळवारी घडलेल्या घडामोडींमुळे राज्याचे सुसंस्कृत राजकारण कलंकित झाले आहे. वर्चस्वाच्या राजकारणात कोण जिंकले व कोण हरले? यावरुन भविष्यातही दावे-प्रतिदावे सुरुच राहतील मात्र या ‘राड्या’मुळे काय गमविले? याचे मुल्यमापन करणे जास्त महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या मुख्यमंत्र्यांबद्दलची एकेरी भाषा व केंद्रीय मंत्र्याला अटक दोन्ही बाबी समर्थनीय नाहीत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा राजकीय गदारोळ, नेमका कोणाच्या पथ्यावर पडेल, हे आज सांगणे कठीण आहे. मात्र या ‘राजकीय राड्या’मुळे गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंतचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. हा सर्व प्रकार घडल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते खूप दिवसांनंतर आक्रमक भुमिकेत पहायला मिळाले. राणेंच्या एका वक्तव्यामुळे शिवसेनेची मरगळ दूर झाली आहे. दुसरीकडे भाजपा विरोधकांना नामोहरण करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करतो, असा आरोप सातत्याने होतो आता तसाचा काहीसा प्रकार महाविकास आघाडी विशेषत: शिवसेनेने केल्याने याचा भाजपा फायदा उचलल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असल्याने पोलिसांची ही ‘पॉवर’फुल्ल भुमिका संशयाच्या भोवर्‍यात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मोजक्या शब्दातील प्रतिक्रीया वगळता यावर कुणीही फारसे भाष्य केले नाही. यात खूप काही दडलेलं आहे.एखाद्या स्क्रीप्ट प्रमाणे हायहोल्टेज ड्रामा 

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी हा ‘हीरक महोत्सवी’ स्वातंत्र्यदिन आहे, असे उद्गार काढले आणि शेजारील व्यक्तीने ‘अमृतमहोत्सवी’ असे लक्षात आणून देताच त्यांनी लगेच दुरुस्तीही केली. पण आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांच्याबाबत रोजच्या रोज बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हाती हे आयतेच कोलित आले! त्यानंतर महाड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांची जीभ घसरली. ‘देशाच्या स्वातंत्र्याविषयी असे अज्ञान बाळगणार्‍याच्या कानाखाली लगावली असती’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. येथेच वादाची ठिणगी पडली. एरव्ही मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करणार्‍या राणेसह त्यांच्या दोन्ही मुलांना शिवसेनेकडून फारसे प्रतिउत्तर दिले जात नाही. यावेळी मात्र शिवसेनेने प्रथमच आक्रमक भुमिका घेतल्याचे पहायला मिळाले. राणे यांच्या वादग्रस्त विधानाचे शिवसैनिकांमधून प्रतिसाद उमटणे स्वाभाविकच होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने जी काही पावले उचलली, तीही सर्वार्थाने अनुचितच होती. हा सर्व हायहोल्टेज ड्रामा एखाद्या स्क्रीप्ट प्रमाणेच सुरु होता. राणेंविरोधात एकाने पोलिसात तक्रार केल्यानंतर नाशिक पोलिसांनीही लगोलग सर्व कामे बाजूला ठेवून राणे यांच्या अटकेकरता धाव घेतात. खरे तर शिवसेनेच्या अन्य कोण्या जबाबदार नेत्याने त्यापुढचे सारेच काही टाळता कसे येईल, या दृष्टीने पावले उचलायला हवी होती. तसे केले असते तर सत्ताधारी या भूमिकेला ते साजेसे ठरले असते आणि उद्धव ठाकरे यांचीही प्रतिमा उंचावली असती. प्रत्यक्षात महाविकास आघाडीने पुढे राणे यांना अटक करण्यापर्यंत मजल मारली. खरेतर सत्ताधारी पक्षाला राजकीय उत्तर देता आले असते, मात्र सरकारने आपल्या हातातील कायद्याचा वापर करून, त्यांना पोलीसी खाक्या दाखवण्याने काय साधले, असाच प्रश्न आहे. या घटनेच्या आधीच्या घडलेल्या घडामोडींवर नजर टाकल्यास लक्षात येते की, भाजपाने शिवसेनेची राजकीय कंबर मोडण्यासाठी कोकणी वोटबँकेवर लक्ष केंद्रीत केलेले दिसते. कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून येणार्‍या ६० नगरसेवकांचा मुंबई महापालिकेत समावेश आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्यासारख्या महापालिका कोळून प्यायलेल्या नेत्याऐवजी भाजपने आगामी महापालिका निवडणुकीसाठी कर्णधार म्हणून राणेंच्या नावाची घोषणा केली. 

सुडाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु होण्याची शक्यता

याच पार्श्‍वभूमीवर केंद्रात नव्याने मंत्रिपद मिळालेल्या मंत्र्यांची भाजपने जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेचा हेतू केंद्र सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवणे व लोकांशी संवाद साधणे हा असल्याचे जाहीर केले होते. मात्र मुंबईतील यात्रेची सुरुवात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन करणार, असे सांगून राणे यांनी ही यात्रा राडा करण्याकरिता असल्याचे जणू सूतोवाच केले. त्याआधी कोकणात पूरग्रस्त भागाचा दौरा करतांना ‘मुख्यमंत्री गेला उडत’, असे विधान राणे यांनी केले होते. त्यामुळे राणे हे शिवसेनेला अंगावर घेण्याकरिता हेतूत: मुख्यमंत्र्यांचा शेलक्या शब्दांत वारंवार उल्लेख करीत होते, असेच दिसते. राणे यांची गेल्या चार दिवसांतील वक्तव्ये बघितली तर ती निव्वळ शिवसैनिकांना उचकायला लावण्यासाठीच केली जात होती, असे सहज म्हणता येते. खरे तर राणे यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हेच शिवसेनेसाठी योग्य ठरले असते. मात्र, चार दिवसांनी त्यांचा संयम सुटला, तोपर्यंत ठिक होते मात्र गृहमंत्र्यालयातील बडे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी मंथन करुन राणे यांच्यावरील कारवाईची रणनीती तयार केली आणि अमलातही आणली. यात राष्ट्रवादीची भुमिका महत्वाची आहे कारण गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे. राणेंना ताब्यात घेतल्यानंतर झालेली पोलिसांची कारवाई हा राणे यांच्या दृष्टीने एक खूपच छोटा विषय आहे. मात्र याचे मोठे परिणाम राज्याच्या राजकारणात उमटण्याची जास्त शक्यता आहे. या वादात कुणाच्या मते सेनेची तर कुणाच्या मते राणेंची सरशी झाली, असे दावे प्रतिदावे होत असले तरी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला मोठा धक्का लागला आहे. मुळात महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत प्रथेला तिलांजली देऊन वादग्रस्त विधाने करण्याची सर्वच पक्षांमध्ये अहमहमिका लागली आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी विधान केल्याने इतका गदारोळ झाला. मुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा योग्य नाहीच, या कुणाचेही दुमत नाही. मात्र हाच निकष अन्य मोठ्या नेत्यांबाबतीही लागू होतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौत का सौदागर, चोर म्हणत अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणे देखील योग्य नाही. अर्थात या विषयाकडे राजकीय चष्म्याने पाहिले जात असल्याने आरोप-प्रत्यारोपापलीकडे हाती काहीच लागणार नाही. मात्र राणे विरुध्द शिवसेना वादामुळे सुडाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु होण्याची जास्त शक्यता आहे.

Post a Comment

Designed By Blogger